पराभवाचे विश्लेषण होऊ शकते; पण हरल्याचे नुसते दु:खच करणे हे जिंकल्याच्या उन्मादाइतकेच निर्थक..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारताकडे चमकदार खेळाडू आहेत, पण न्यूझीलंडकडे संघ आहे’ हे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या पराभवाचे ‘बीबीसी’ने केलेले समीक्षण यथार्थ ठरते. ‘संभाव्य विजेता’ म्हणून गणल्या गेलेल्या भारताचा उपांत्य फेरीतील पराभव लाखो क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक असले तरी या पराभवाच्या वेदना विसरून तो का झाला, याचा विचार व्हायला हवा. वास्तविक न्यूझीलंडकडे विश्वचषकाचा दावेदार म्हणून कधीही पाहिले गेले नाही. कारण हा संघ विश्वचषकात बऱ्याचदा चांगला खेळतो, पण त्यांना आजवर कधीही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आतापर्यंत सहापैकी एकच उपांत्य फेरीची लढत त्यांनी जिंकलेली आहे. दुसरे म्हणजे, यापूर्वी दोन उपांत्य लढतींमध्ये (वि. श्रीलंका, १९९६ आणि वि. ऑस्ट्रेलिया, २०१५) आपण तुल्यबळ किंवा अधिक बलवान संघांविरुद्ध पराभूत झालो होतो. त्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ हा कमकुवत होता हे कोणी अमान्य करणार नाही. पण आपल्या तुलनेत महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी जीव ओतला आणि तो जिंकून दाखवला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ‘संपूर्ण स्पर्धेत केवळ ४५ मिनिटेच आम्ही खराब खेळ केला आणि त्याचा फटका आम्हाला बसला,’ अशी मीमांसा भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर केली. ती दु:खभावना म्हणून ठीक. पण परीक्षा ही अशीच असते, हे सत्य नव्हे काय? वर्षभर कितीही मरमर अभ्यास केला तरी मूल्यमापन होते ते तीन तासांत काय लिहिले जाते, यावरच. तेव्हा या महत्त्वाच्या परीक्षेत आपली उत्तरपत्रिका इतकी कोरी का राहिली, याचा विचार व्हायला हवा. तो करताना ‘बीबीसी’ने केलेले निदान अचूक ठरते.

आपण २०१५ च्या विश्वचषकापासून महत्त्वाच्या स्पर्धाची किमान उपांत्य फेरी गाठलेली आहे. ऑस्ट्रेलियात २०१५ मध्ये उपांत्य फेरी, भारतात २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरी, इंग्लंडमध्ये २०१७ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अंतिम फेरी आणि आता उपांत्य फेरी. पण तरी यांपैकी एकही स्पर्धा आपण जिंकू शकलेलो नाही. विश्वविजयी, दिग्विजयी संघाची ही लक्षणे नव्हेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्डाच्या झेंडय़ाखाली खेळणाऱ्या सर्वाधिक प्रतिभावान क्रिकेट संघाकडून यापेक्षा अधिक अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही! एरवी दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघांना आपण अवसानघातकी किंवा ‘चोकर्स’ म्हणून हिणवतो. सलग चार स्पर्धामध्ये बाद फेरी गाठूनही अजिंक्य ठरू न शकलेल्या आपल्या संघालाही इतर देशांतील आजी-माजी खेळाडू, समीक्षक, चाहते त्याच नावाने हिणवू लागल्यास त्यास अयोग्य म्हणता येईल काय? यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेला भारतीय संघ गोलंदाजीच्या आघाडीवर उत्कृष्ट होता. म्हणूनच त्यांची संभाव्य विजेत्यांमध्ये गणना होत होती. तरीही काही मूलभूत प्रश्न आपण अनुत्तरित ठेवले होते. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, या कळीच्या प्रश्नावर – आपले पहिले तीन फलंदाजच दमदार खेळून खालच्या फळीवर दडपण येऊच देणार नाहीत, असे उत्तर दिले गेले. त्या उत्तरातील फोलपणा उपांत्य फेरीच्या सामन्यात ठळकपणे अधोरेखित झाला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल भारताची दोन अंकी धावसंख्या फलकावर लागण्याआधीच तंबूत परतले. चौथ्या क्रमांकावर जो खेळायला आला, तो दिनेश कार्तिक जत्रेत हरवलेल्या बालकासारखा भासला. कारण गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो स्थिरावू शकलेला नाही. या स्थानासाठी अनुभव आणि तंत्र या दोन्ही बाबतींत सरस असलेले फलंदाज दोन. पहिला अजिंक्य रहाणे, जो सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे आणि दुसरा अंबाती रायुडू, जो संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून वारंवार दुर्लक्ष झाल्यामुळे विमनस्कावस्थेत नुकताच निवृत्त झाला! अशी विचित्र स्थिती निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, भारतीय संघातील निवड ही बऱ्याचदा विराट किंवा प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मर्जीनुरूप होते. म्हणूनच सुरुवातीला चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड झाली होती, जो ना फलंदाजी करू शकतो ना गोलंदाजी. सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर त्याच्या जागी एखादा सलामीवीर न पाठवता ऋषभ पंतला धाडले गेले, कारण तो मर्जीतला आहे. त्यावरही कडी म्हणजे, विजय शंकर जायबंदी झाल्यानंतर त्याच्या जागी मयांक अगरवालला पाठवले गेले. पण तो एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही!

रोहित शर्माने या स्पर्धेत विक्रमी पाच शतके झळकावली. पण त्यात किती वेळा त्यास सुरुवातीलाच जीवदान मिळाले, ते त्याची वारेमाप स्तुती करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्याच्या फलंदाजीची तटबंदी कशाने भेदता येते हे दिसून आले होते. आधीच्या सामन्यातील शतकांमुळे या उणिवा झाकल्या गेल्या. पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असलेल्या न्यूझीलंडने बरोबर त्याचा फायदा उचलला. के. एल. राहुल याचेही तेच. त्याच्या फलंदाजीतील भगदाड अनेकदा तसेच असते. जड पायांनी खेळणाऱ्या राहुलचे वैगुण्य अचूक हेरून न्यूझीलंडने त्यालाही सापळ्यात अडकवले. रोहित आणि राहुल हे दोघेही त्यात अलगद अडकले. हवेतून वळणारे किंवा स्विंग चेंडू खेळता न येण्याची या दोघांची मर्यादा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खुबीने उघडी पाडली. खरे तर ही वेळ इंग्लिश वातावरणात कधी ना कधी येणार हे कोहली-शास्त्री जोडीने ताडायला हवे होते. तसेच महेंद्रसिंग धोनीच्या हालचाली मंदावल्या आहेत, तरीही त्याच्या फलंदाजीक्रमाविषयी मतक्य नव्हते. अखेपर्यंत तो अर्धशतक झळकावूनही चाचपडतच राहिला. अनुभव आणि पूर्वपुण्याई हे गुण धोनीने तो कर्णधार असताना फारसे विचारात घेतले नव्हते. सचिन-राहुल-लक्ष्मण या महान फलंदाजांच्या क्षेत्ररक्षणातील हालचाली मंद असतात, असे त्याने एकदा अप्रत्यक्षरीत्या सूचित केले होते. तो निष्ठुर न्याय त्याच्या बाबतीतही लावण्याचे धाडस कोहली-शास्त्रीला का दाखवता आले नाही?

अखेरीस निवासी आणि अनिवासी भारतीयांच्या वेडगळ क्रिकेट प्रेमाविषयी. भारतीय संघ हरला, त्याच दिवशी तिकडे इटलीमध्ये जागतिक विद्यापीठ स्पर्धेत भारताच्या द्युती चंदने १०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ओडिशाच्या या मुलीने स्वित्र्झलड, जर्मनीच्या मातब्बर प्रतिस्पध्र्याना धूळ चारली. काही दिवसांपूर्वी पोलंडमधील स्पर्धेत २०० मीटर धावण्याच्या प्रकारात हिमा दासने सुवर्णपदक जिंकले. परंतु त्यापेक्षा भारताचा बांगलादेशावरील क्रिकेट-विजय देशभरात अधिक साजरा झाला! वास्तविक दोन मुलींनी अ‍ॅथलेटिक्समधील जागतिक स्पर्धात भारताला सुवर्णपदके जिंकून देणे ही कर्तबगारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कामगिरीपेक्षा उजवी ठरते. अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कुस्ती, बॉक्सिंग या खेळांमध्येही भारताच्या ग्रामीण, निमशहरी भागांतून दिग्विजयी खेळाडू निर्माण होत आहेत आणि जागतिक स्तरावर चमकत आहेत. त्यांची जराही दखल घ्यावीशी आपणास वाटत नाही. याउलट क्रिकेटमधील हारजितीची चर्चा इतर सर्व राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून सुरू असते आणि तीत सर्वोच्च पदावरील व्यक्तीदेखील सहभागी होतात. क्रिकेटचे हे भूत उतरवणे गरजेचे आहे.

त्यासाठी जवळपास मनोरुग्ण वाटावेत असे वागणाऱ्या आपल्या प्रेक्षकांनाही आवरावे लागेल. या विश्वचषकात भारतीय प्रेक्षकांचे वर्तन पाहून कोणाही विचारी व्यक्तींची मान शरमेने खाली गेली असेल. क्रिकेट हा फक्त एक खेळ आहे आणि खेळाच्या चष्म्यातूनच त्याकडे पाहायला हवे. पण आपण त्याला ‘धर्म’ मानतो आणि त्या न्यायाने क्रिकेटपटूंना देव. तेव्हा सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांचे वर्तन म्हणजे या ‘धर्म’भोळ्यांचा धिंगाणाच होते. आपल्या या अतिरेकामुळे आपल्या संघालाही आपण जणू जिंकलोच असे वाटू लागण्याचा धोका आहे, याचेही भान या उन्मादलेल्या प्रेक्षकांना राहिले नाही. खेळातील विजयाच्या भावनेने उत्साहित होणे ही मानवी प्रकृती. पण विश्वचषकाच्या सामन्यांत आपल्या प्रेक्षकांचे वर्तन हे विकृतीकडे झुकणारे होते. प्रकृती ते विकृती हा प्रवास किती घातक, ते या पराभवातून दिसले. आता तरी आपल्या क्रिकेट‘भक्तां’चे डोके ठिकाणावर येईल ही आशा.

Web Title: Loksatta editorial on india lost against new zealand in the world cup 2019 zws
First published on: 12-07-2019 at 01:51 IST