सेतू बांधा रे..

१९६४ मध्ये टोक्योतच ऑलिम्पिक झाले, तेव्हा भारताने पाकिस्तानला पहिल्यांदा हरवून सुवर्णपदक जिंकले.

सामन्याच्या अटीतटीत मोक्याचे क्षण आत्मसात करायला आपण सरावलो हे पुरुष संघाने दाखवून दिले आणि महिलांचा संघ त्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे..

रिओ २०१६ ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांचा हॉकी संघ आठव्या स्थानावर राहिला होता, तर महिलांचा संघ बाराव्या स्थानावर म्हणजे तळाला! ती परिस्थिती पाहता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुष संघ तिसऱ्या स्थानावर आणि महिला संघ चौथ्या स्थानावर येणे ही प्रगतीच. पण देशभर केवळ हॉकीच्या नावे सध्या जो जल्लोष सुरू आहे, तो केवळ काही स्थानांच्या प्रगतीमुळे नव्हे. त्या जल्लोषाला दीर्घ आणि निराशागडद कालखंडाची पार्श्वभूमी आहे. पुरुषांनी ४१ वर्षांनंतर हॉकीत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले, त्याला सुवर्णझळाळी नसली तरी कांस्यपदकाच्या त्या तांबूस रंगाचे मोलही कमी नाही. महिला तर कधी उपान्त्य फेरीपर्यंत आल्याच नव्हत्या, त्यामुळे त्यांच्यासाठी तर ही अद्भुत नवलाईच. पुरुषांच्या बाबतीत १९८० मधील मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकालाही म्हणावी तशी लकाकी नव्हती. याचे कारण अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांनी त्या स्पर्धेवरच बहिष्कार टाकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, पश्चिम जर्मनी आणि मुख्य म्हणजे पाकिस्तान अशा तत्कालीन प्रबळ हॉकी संघांची उपस्थिती तेथे नव्हती. हे संघ खेळते, तर आपल्याला पदक मिळण्याची शक्यता अत्यल्प होती असे या खेळातील जाणकार आजही सांगतात. १९६४ मध्ये टोक्योतच ऑलिम्पिक झाले, तेव्हा भारताने पाकिस्तानला पहिल्यांदा हरवून सुवर्णपदक जिंकले. ती भारताची आजवरची ऑलिम्पिकमधील शेवटची अस्सल सर्वोच्च कामगिरी. त्यानंतर टोक्योमध्येच भारतीय हॉकीच्या पुनरुत्थानावर शिक्कामोर्तब होत आहे हा मात्र सुखद योगायोग!

या पुनरुत्थानाची गरज होती. कारण दर चार वर्षांनी ऑलिम्पिकच्या निमित्ताने हॉकीतील अपयशाच्या नावाने व्यक्त होणारे आवंढे आणि शोकात्म कढ हॉकीपटूंच्या एका पिढीला विचलित करू शकले नाहीत आणि मोजके राजकीय नेते व त्याहूनही कमी पुरस्कर्ते इतक्या फुटकळ भांडवलावर, ‘सुवर्णयुग’ वगैरे परीकथांच्या स्वप्नात न गुरफटता या पिढीने दररोज नवीन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध नवी उमेद, नवी तयारी आणि नवी आशा ज्वलंत आणि जिवंत ठेवली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपान्त्यपूर्व फेरीतील महिला हॉकी संघाचा विजिगीषू खेळ किंवा जर्मनीविरुद्ध कांस्यपदकासाठीच्या लढतीत पुरुष हॉकी संघाने दाखवलेली बेडर भूक भारतीय हॉकीप्रेमींच्या किमान चार पिढय़ांनी तरी पाहिलेली नसेल. ‘सुवर्णयुगा’तील बहुतेक विजय हास्यास्पद एकतर्फी होते. आधुनिक युगात तर विजय सोडाच, पण प्रत्येक गोलसाठी झगडावे लागते. हॉकीपटूंच्या कामगिरीकडे इतिहासाचा चष्मा काढून पाहावे लागेल. तसे झाल्यास ही कामगिरी अधिकच अभिमानास्पद वाटू लागेल.

पण यासाठीच थोडे इतिहासाचे अवलोकन आणि आकलन आवश्यक. ऑलिम्पिक हॉकीतील आठ सुवर्णपदके भारतासाठी गौरवास्पद ठरतात. त्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अर्थातच मेजर ध्यानचंद आणि त्यांचे साथीदार. हा खेळ ब्रिटिशांनी भारतात आणला, पण क्रिकेटइतकाच भारतीयांनी आत्मसात केला. एक ठळक फरक मात्र होता. ब्रिटिशांप्रमाणेच येथीलही सरंजामी मंडळींनी क्रिकेटला अधिक जवळ केले. उलट निम्न आर्थिक स्तरातील विशेषत: उत्तर भारत व हरयाणा-पंजाब पट्टय़ातील मंडळींचा ओढा हॉकीकडे अधिक दिसून येई. गावाबाहेरील एखाद्या मैदानात दिवसभर नोकर-चाकरांच्या बडदास्तीत जेवण, चहाचा आस्वाद घेत खेळणे ज्यांना मानवले आणि परवडले तो वर्ग क्रिकेटकडे वळला. दिवसभरातील शेतातली कामे आटोपून किंवा सैन्याच्या नोकरीतील सकाळच्या कवायती वगैरे संपवून दीड-दोन तासांचाच फावला वेळ ज्यांच्या नशिबी होता, तो वर्ग मात्र प्रामुख्याने हॉकीकडे वळला. हॉकी हा फुटबॉलसारखाच अस्सल मैदानी खेळ. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान मोठे लागते पण सतत धावपळ करावी लागते; असा तो मैदानी खेळ नव्हेच. हॉकीत धावण्याच्या जोडीला हॉकी स्टिक बाळगण्याची आणि वळवण्याची कलात्मकता येते. त्या नजाकतीत भारतीय ‘नेटिव्ह’ गोऱ्या युरोपियनांपेक्षा तेव्हा सरस ठरले. हा खेळ आणि त्यातील मक्तेदारी भारताने आपलीशी केली. १९२८, १९३२, १९३६ या स्वातंत्र्यपूर्व ऑलिम्पिक स्पर्धा, तसेच १९४८, १९५२, १९५६ या स्वातंत्र्योत्तर स्पर्धात हॉकीची सुवर्णपदके जिंकली. १९४० आणि १९४४ या दोन वर्षी दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिम्पिकच भरवले गेले नव्हते. म्हणजे सहा अजिंक्यपदे सलग स्पर्धामध्ये होती. नंतरच्या १९६४ आणि १९८० या उर्वरित दोन सुवर्णपदकांचा उल्लेख वर आलाच आहे. पाकिस्तान भारतापासून अलग झाल्यानंतर भारताच्या एकछत्री हॉकी-वर्चस्वाला धक्के बसू लागले. १९७२ नंतर हॉकी हा खेळ नैसर्गिक हिरवळीकडून कृत्रिम हिरवळीकडे वळला आणि भारताला १९७५ मधील जगज्जेतेपद आणि १९८० मधील ऑलिम्पिक अजिंक्यपद वगळता स्पर्धा विजयासाठी झगडावे लागू लागले. १९८६च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ तळाला राहिला. २००८ मधील बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपण पात्रही ठरू शकलो नाही. १९८२ मध्ये आशियाई स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला दिल्लीत ७-१ अशी धूळ चारली. १९८३ मध्ये आपण अनपेक्षितरीत्या क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्यातून मोठा चाहतावर्ग हॉकीकडून क्रिकेटकडे वळला तो कायमचाच.

मुंबईतील वांद्रे, पुण्यात खडकी-दापोडी, कर्नाटकात बेंगळूरु, ओडिशा-झारखंडमधील आदिवासी पट्टे, भोपाळ-लखनऊ आणि अर्थातच पंजाब येथे हॉकी लोकप्रिय होते. पुढे केवळ पंजाब आणि ओडिशा ही राज्येच हॉकीची आश्रयस्थाने म्हणून शिल्लक राहिली. त्यातही पंजाबपेक्षाही ओडिशाचे आणि तेथील मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे आभार मानणे यथोचित. सहारा कंपनी विस्कटल्यानंतर हॉकीला पाठिंबा देण्यासाठी पुरस्कर्तेच येईनात अशा वेळी पटनाईक यांनी पुढाकार घेऊन देशातील हॉकीला संपूर्ण बुडू दिले नाही. केपीएस गिल यांच्यासारख्यांनी हॉकी हा खेळ म्हणजे पंजाबची मक्तेदारी मानला. त्यामुळे हॉकी महासंघाचे आधिपत्य सांभाळतानाची त्यांची धोरणे नेहमीच एकसुरी आणि कालबा राहिली. ती चूक पटनाईक यांनी केली नाही. ते हॉकी महासंघाचे आधिपत्य घेण्याच्या फंदात पडले नाहीत. त्याऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा ओडिशात निर्माण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. हल्ली अत्याधुनिक, जागतिक वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या क्रीडा सुविधा आणि संकुले केवळ एकाच राज्यात उभारण्याची प्रवृत्ती प्रबळ असताना, नवीन पटनाईक यांनी ओडिशातील सुविधांची कवाडे देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंसाठीही खुली केली. अशा नि:स्पृह धोरणांमुळेच खेळाचा विकास होत असतो.

तो होत आहे याच्या खुणा टोक्योत दिसून आल्या. हॉकीच्या बाबतीत अव्वल तीन-चार संघांच्या दर्जामध्ये फार तफावत नसते. त्या दिवशी जो संघ सर्वाधिक शारीरिक कस आणि मानसिक कणखरपणा दाखवतो तो जिंकतो. असे मोक्याचे क्षण आत्मसात करायला आपण सरावलो हे पुरुष संघाने दाखवून दिले आणि महिलांचा संघ त्या दिशेने आश्वासक वाटचाल करत आहे. एखाद्या खेळाची लोकप्रियता कितीही असली आणि पुरस्कर्त्यांचा पाठिंबा कितीही असला तरी एखाद्या दिवशी मैदानात काही तरी असामान्य, अपेक्षाबाह्य़ करून दाखवावे लागतेच. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने ते करून दाखवले. ‘सुवर्णयुगा’ला मागे टाकून आमूलाग्र बदललेल्या हॉकीच्या खेळात तशी कामगिरी कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने करून दाखवली आहे. यापुढे दोन्ही हॉकी संघ केवळ पहिल्या पाचात येण्यासाठी नव्हे, तर पदक जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरणार आणि तशी अपेक्षा त्यांच्याकडून बाळगली जाणार हे नक्की. आत्मविश्वास आणि आनंदाचे हे सेतू भविष्यातील विजेतेपदांपर्यंत बांधत राहणे आवश्यक आहे. स्मरणरंजनाची कास सोडूनच ते शक्य होते हेही यानिमित्ताने दिसून आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta editorial on spirited hockey performance of india in tokyo olympics zws

Next Story
अग्रलेख : चांदणे शिंपीत जा..
ताज्या बातम्या