scorecardresearch

गीत नहीं गाता हूँ..

जनसंघाचे आणि नंतर भाजपचे अध्यक्षपद अटलबिहारींकडे आले

गीत नहीं गाता हूँ..

स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्याही आयुष्यावर प्रेम असलेला रसरशीतपणा हे वाजपेयी यांचे सर्वावर पुरून उरणारे वैशिष्टय़ होते..

दीर्घायुष्याच्या शापाला विस्मरण हा उ:शाप असतो. अटलबिहारी वाजपेयी यांना तो लाभला. आवर्जून स्मरणात ठेवावे असे वर्तमान आटू लागले असेल तर अशा वेळी विस्मरणात जाणे निदान त्या व्यक्तीसाठी तरी सुखाचे असते. त्या अर्थाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गेली काही वर्षे हे विस्मरणाचे सुख भोगत होते. गुरुवारी त्यातूनही त्यांची सुटका झाली. वाजपेयी गेले. त्यांच्या निधनाने देशातील प्रत्येकास वातावरणात मुळातच तुटवडा असलेले मांगल्य काही अंशाने कमी झाले, असेच वाटेल. असे भाग्य फारच कमी जणांच्या वाटय़ास येते. असे काय होते वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वात?

वाजपेयी यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला त्या वेळी ते समाजकारण मानले जात होते. त्यात नेतृत्व करू पाहणारे सामान्य माणसासारखेच होते आणि त्यांना आपल्यातलेच मानण्याची सामान्यांतही प्रथा होती. कोणा कार्यकर्त्यांच्या घरात चटईवर अशा राजकारण्याने एखादी रात्र काढणे हे अजिबात अप्रूप नव्हते. सत्ताकारण, त्यानिमित्ताने येणारी बीभत्स स्पर्धा आणि या साऱ्यास लागणारी संपत्ती यांचा शिरकाव राजकारणात व्हायचा होता. काही एक निश्चित विचारधारेने आपणास हा समाज घडवायचा आहे आणि मूर्ती घडवताना कलाकारास जे कष्ट पडतात तेच आपलेही भागधेय आहे, असेच हे समाजकारणी मानत तो हा काळ. श्यामाप्रसाद मुखर्जी, राममनोहर लोहिया, नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय, अच्युतराव पटवर्धन अशी अनेक बुद्धिजीवी मंडळी समाजकारण करीत होती तो हा काळ. १९४२ चा चलेजावच्या लढय़ाचा परिणाम दिसू लागला होता, स्वातंत्र्याचा प्रसन्न पहाटवारा वाहत होता तो हा काळ. महात्मा गांधी हयात होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल जोमात होते तो हा काळ. हे सारे मोहित करणारे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरात महाविद्यालयीन खिडकीतून जगाकडे पाहणाऱ्या अटलबिहारींना या सगळ्याने खुणावले नसते तरच नवल. त्यांचे वडील शिक्षक आणि कवी. आसपासचे वातावरण हे असे काही तरी आपण करायला हवे, असे वाटायला लावणारे. ग्वाल्हेरात त्या वेळी आर्य समाजाचा जोर होता. वाजपेयी आर्य समाजात दाखल झाले. पुढील आयुष्यात आपल्याशी संबंधित नसलेल्या कोणत्याही विचारधारेविषयी एक प्रकारचे ममत्व वाजपेयींच्या स्वभावात कायम दिसत राहिले त्याचे मूळ या आर्य समाजी संस्कारात असावे. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील पौगंडावस्थेत होता. तारुण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या अटलबिहारींना संघानेही खुणावले. ते दोन्ही संघटनांत सक्रिय होते. संघाने त्यांना पुढे संधी दिली. अटलबिहारींचा आर्य समाज सुटला. नेतृत्वादी प्रशिक्षणादरम्यान संघाने वाजपेयी यांना उत्तर प्रदेशात धाडले. देशाचे स्वातंत्र्य एकदोन वर्षे दूर होते. अशा भारित वातावरणात सुरू झालेली वाजपेयी यांची समाजजीवन यात्रा गुरुवारी संपली.

वाजपेयी यांच्या समाजकारणाची सुरुवातच झाली दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बोट धरून. उपाध्याय संपादक असलेल्या नियतकालिकांसाठी वाजपेयी बातमीदार होते आणि नंतर मुखर्जी यांचे सहायक. त्या वेळी पत्रकार आणि कार्यकर्ता यांत अंतर नसे. त्यामुळे वाजपेयी दोन्हीही भूमिका सहज निभावू शकले. त्यांच्या समाजकारणास ठोस राजकीय वळण मिळाले महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली. साहजिकच संघविचाराने प्रेरित संबंधितांना नवा अवतार घ्यावा लागला. त्यातून भारतीय जनसंघाचा जन्म झाला. वाजपेयी त्याच्या काही मूळ संस्थापकांतील एक. सुरुवातीलाच त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. याच पक्षाचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जेव्हा काश्मिरात उपोषण केले तेव्हा त्यांच्यासमवेत अटलबिहारी होते. त्या आंदोलनादरम्यान मुखर्जी यांचे निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनी, १९५७ साली, अटलबिहारी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. साहित्य, कला, संस्कृती यांचे प्रेम रक्तातूनच आलेले. त्यास संघाच्या शिबिरांतून मिळालेल्या वक्तृत्व प्रशिक्षणाची जोड मिळाली. अटलबिहारी फुलू लागले. त्यांच्या या उमलण्याची पहिली दखल घेणारे होते पंडित जवाहरलाल नेहरू. राजकीय प्रतिस्पध्र्यास वैरी मानण्याचा प्रघात पडायच्या आधीचे हे दिवस. त्यामुळे वाजपेयींच्या वक्तृत्वाची पंडितजींनी मुक्तकंठाने स्तुती केली आणि हा मुलगा उद्या देशाचे नेतृत्व करेल, अशी भविष्यवाणी उच्चारली.

ती तंतोतंत खरी ठरली. पुढे जनसंघाचे आणि नंतर भाजपचे अध्यक्षपद अटलबिहारींकडे आले. भाजपचा झालेला प्रसार, औटघटकेचे पहिले पंतप्रधानपद, पुढे आलेले सरकार वगैरे सर्व तपशील हा इतिहासाचा भाग आहे. पण वाजपेयी त्या सनावळ्यांच्या इतिहासापेक्षा अधिक काही आहेत आणि ते समजून घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. याचे कारण वाजपेयी केवळ व्यक्ती नाही. ती हळूहळू नष्ट होत असलेली एक सर्वसमावेशी भारतीय प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीत प्रतिस्पध्र्याशी दोन हात करायचे असतातच. पण त्याच्या जिवावर उठायचे नसते. सर्व मंगल ते ते सर्व आपले आणि विरोधक मात्र अमंगलाचे धनी असे मानायचे नसते. त्याचमुळे १९७४ साली इंदिरा गांधी यांनी जेव्हा पहिल्यांदा अणुस्फोट केला तेव्हा त्याचे समर्थन करणाऱ्यांत वाजपेयी आघाडीवर होते. एके काळी ज्या इंदिरा गांधी यांचे वर्णन वाजपेयी यांनी गूंगी गुडिया असे केले होते त्याच इंदिरा गांधी यांची बांगलादेश युद्धातील कामगिरी पाहून वाजपेयी यांनी त्यांना दुर्गेची उपमा दिली. पंतप्रधानपदी असताना काँग्रेसशासित मध्य प्रदेशाने दुष्काळी मदतीची मागणी केली असता आणि स्थानिक भाजपने अशी मदत देऊ नये अशी भूमिका घेतलेली असतानाही वाजपेयी यांनी स्वपक्षीयांकडे दुर्लक्ष करून मध्य प्रदेशास मदत देऊ केली. वर, असल्या विषयावर राजकारण करू नये, असा पोक्त सल्ला स्वपक्षीयांना त्यांनी दिला. कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना संयुक्त राष्ट्र संघात भारताची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी अटलबिहारी यांना पाठवले होते. आणि ती भूमिका साकारत असताना आपल्या देशातील सरकारविरोधात परदेशी भूमीत वाजपेयी यांनी टीकेचा एक शब्ददेखील काढला नव्हता. या शिकवणुकीचा पुढे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनाच विसर पडला, हे दुर्दैव आणि ही बाब अलाहिदा. पण वाजपेयी हे अशा उमदेपणाचे प्रतीक होते. स्वत: पंतप्रधानपदी असताना काही कारणांनी अमेरिकेचा दबाव वाढतो आहे असे दिसल्यावर त्यांनी त्या महासत्तेविरोधातील वातावरणनिर्मितीसाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हरकिशनसिंग सुरजित यांची मदत घेतली. अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्याआधी वाजपेयी यांनी सुरजित यांना जातीने भोजनास बोलावून आप की आवाज अमेरिका तक गूंजनी चाहिए, अशी मसलत दिली. याच पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत शरद पवार यांच्या क्षमतांचा आदर ठेवत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याचे औदार्य वाजपेयी यांच्या ठायी होते. आणीबाणीत अन्य अनेक नेत्यांप्रमाणे त्यांनाही तुरुंगवास घडला. पण पुढच्या राजकारणात इंदिरा गांधी यांचा त्यांनी दुस्वास केला असे कधी घडले नाही. इंदिरा चिरंजीव संजय याने मारुती मोटार प्रकल्पाचा घाट घातला आणि त्याचे जे काही झाले तेव्हा ‘अब तो माँ रोती है’, अशी कोटी वाजपेयी यांनी केली. पण त्यांच्याशी कधी बोलणे टाकले असे झाले नाही.

राजकारणातच असे नाही. पण वैयक्तिक आयुष्यातही काही असे नशीबवान असतात की इतरांच्या प्रयत्नांमुळे ते यशस्वितेचे धनी होतात. वाजपेयी असे होते. भाजपच्या विस्तारासाठी जिवाचे रान केले त्यांचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांनी. पण पंतप्रधानपद ते भारतरत्न हे सगळे गौरव वाजपेयींना मिळाले. हे त्यांच्या सहिष्णू प्रतिमेने झाले. टोकाची भूमिका घेणारे या देशात बहुसंख्यांना स्वीकारार्ह नसतात. ते यशस्वी झाले तरी ते यश तात्पुरतेच असते. वाजपेयी यांच्याविषयी आज सर्वदूर प्रेम आणि आदर आहे तो त्यांच्या या सहिष्णुतेमुळे. काही मुद्दय़ांवर त्यांची सहिष्णुता ही अतिसहनशीलता मानली गेली. बाबरी मशीद आणि गुजरात दंगली हे त्याचे उदाहरण. त्यावेळचे वाजपेयी यांचे राजकारण वा त्याचा अभाव हा त्यांच्या कारकीर्दीतील आनंददायी भाग नसेल.

वाजपेयी कवी होते आणि त्यांची कविता सच्ची होती. ते पद्य नव्हते. कविता मुझे विरासत में मिली, असे ते म्हणत. ती त्यांची खरी सोबती. राजकारणाच्या धकाधकीतून आपले आवडते स्थळ असलेल्या मनालीत जाऊन बसावे आणि काव्यशास्त्रविनोदाचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची वृत्ती. ते कायम जीवनाभिमुख होते. त्यामुळे पूर्णवेळ प्रचारकास अस्पर्श असलेले विषय त्यांना कधी वर्ज्य नव्हते. या सगळ्यामुळे त्यांच्या स्वभावात एक उमदेपणा होता. कोणत्याही भूमिकेत ते असोत. हा उमदेपणा त्यातून पुरून उरे. छोटे मन से कोई बडा नहीं होता असे ते एका कवितेत म्हणतात तेव्हा ती केवळ कवितेतील ओळ नसते. ते त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. हे प्रभु.. मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ हे त्यांचे प्रामाणिक मत. त्यांच्या कवितेचे दोन भाग आहेत. एका भागात संघ प्रचारकांचा असतो तसा राष्ट्रउभारणीचा आशावाद त्यातून दिसतो. आओ फिर से दिया जलाए.. अशी कविता मग वाजपेयी लिहितात. पण मध्येच त्यांच्यातला खरा कवी जागा होतो, तो त्यांच्यातील स्वयंसेवकास दूर करतो आणि म्हणतो : कौरव कौन, कौन पाण्डव, टेढा सवाल है। दोनों ओर शकुनि का फैला कूट जाल है.. या कवितेने त्यांना नेहमीच उत्कट, ताजे ठेवले. त्यामुळे गीतरामायणाचा रौप्य, सुवर्ण महोत्सव असो किंवा सावरकरांची पुण्यतिथी असो. वाजपेयींना ऐकणे अवर्णनीय आनंददायी असे. साहित्यिकांना लाजवेल अशी त्यांची वाणी होती. डोळ्यांची फडफड, तिरपी मान आणि बोलण्याच्या प्रपातात मधेच गर्भित स्तब्धता. वाजपेयी यांचे प्रत्येक भाषण हा एक आविष्कार असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखा. रसरशीत. स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्याही आयुष्यावर प्रेम असलेला हा रसरशीतपणा हे वाजपेयी यांचे सर्वावर पुरून उरणारे वैशिष्टय़.

वयोपरत्वे येणाऱ्या व्याधींनी जर्जर झाल्याने त्यांचा हा रसरशीतपणा लुप्त झाला आणि पाठोपाठ वाजपेयीदेखील सार्वजनिक जीवनातून दिसेनासे झाले. मोदी सरकारच्या काळात २०१५ साली भारतरत्न पुरस्काराचा स्वीकार करताना दिसले ते वाजपेयींचे शेवटचे दर्शन. नंतर ते आपल्या मठीतून बाहेर पडले नाहीत.

योग्यच केले त्यांनी. वातावरणाच्या पट्टीशी आपला स्वर लागत नाही हे लक्षात आल्यावर असे मिटून घेणेच शहाणपणाचे. अन्यथा छोटे मन से कोई बडा नही होता.. यासारख्या आपल्याच ओळी अंगावर येऊ लागतात. पण वाजपेयी त्यापासून वाचले. विस्मरणाने त्यांची सुटका केली. गीत नया गाता हूँ.. असे एके काळी वाजपेयी म्हणाले होते खरे. पण त्यांची अवस्था..

बेनकाब चेहरे है, दाग बडे गहरे है,

अपनों के मेले मे मीत नही पाता हूँ..

गीत नही गाता हूँ..

अशी बनली. आता ते या सगळ्यापल्याड गेले. या सभ्य, सुसंस्कृत, शालीन व्यक्तिमत्त्वास लोकसत्ता परिवाराची आदरांजली.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या