मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या प्रकल्पाचे प्रमुख संपादक पोलॉक यांना हटवण्यासाठी काही विद्वानांनी केलेला खटाटोप व्यर्थ होता..
काहीही बोला पण रेटून बोला, वस्तुस्थितीचा कितीही विपर्यास करा पण दुसऱ्याचा कमीपणा दाखवून द्या, अशी पद्धत आजघडीला सर्वत्र बोकाळते आहे. विद्येचे क्षेत्रही त्यास अपवाद राहू नये, हे अधिक चिंताजनक.
पुण्याच्या भारतीय चित्रवाणी व चित्रपट संस्थेवर- एफटीआयआयवर- कुणा गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार सरकारला होते आणि आहेत. तसे आणि तितकेच अधिकार, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठ छापखान्यातील मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या प्रकाशन प्रकल्पाचे प्रमुख संपादक कोण असावेत हे ठरवण्याबाबत रोहन मूर्ती यांना आहेत. हे रोहन मूर्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे चिरंजीव आणि इन्फोसिसच्या नेतृत्वाऐवजी अन्य गोष्टींत- यात संगणकभाषाही आल्या- रस असणारे उद्योजक. त्यांच्या ५२ लाख डॉलरच्या देणगीतून मूर्ती क्लासिकल लायब्ररी हा अभिजात आणि कॉपीराइटमुक्त भारतीय ग्रंथांच्या मूळ भाषेतील संहितेसह इंग्रजी अनुवादांच्या पुस्तकांचा प्रकल्प सुरू झाला. या ४० ग्रंथांचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रकल्पाचे प्रमुख संपादक शेल्डन पोलॉक हे असून आतापर्यंत किमान नऊ पुस्तके प्रकाशितही झाली आहेत. हे सारे होत असताना भारतातील १३२ नामवंत विद्वान गप्प होते. अलीकडेच जेएनयूमधील विद्यार्थीनेता कन्हैया कुमार याला जामीनही न देता अडकवून ठेवणे आणि त्या निमित्ताने वकिली गुंडगिरीचे प्रदर्शन न्यायालयाच्या आवारातच होणे या प्रकारांबद्दल जे पत्रक जगभरच्या विद्यापीठकर्मीनी इंटरनेटवरून प्रसृत केले, त्यावर या शेल्डन पोलॉक यांचीही स्वाक्षरी असल्याने ते १३२ भारतीय विद्वान खवळले आणि त्यांनी थेट ‘पोलॉक हटाव’ मोहीम सुरू केली- तीदेखील इंटरनेटवरच. म्हणजे एरवी पोलॉक चालले असते, पण जेएनयू प्रकरणात पोलॉक विरुद्ध बाजूला आहेत म्हणून ते नकोत. त्यांच्या राजकीय मतांना विरोध आहे, म्हणून त्यांच्याकडे पद वा जबाबदारी नको. एफटीआयआयवर नेमले गेलेले गजेंद्र हे सरकारधार्जिणे असल्याची बाब उघड होतीच. पण ही नियुक्ती सरसकट नियमबाह्यच असती, तर उचित पीठाकडे दाद मागून चिवटपणे कागदोपत्री लढाई लढता आली असती. तसे करण्याआधीच आणि गजेंद्र पदाची सूत्रे स्वीकारण्याआधीच, केवळ हा सरकारधार्जिणा माणूस पदावर नको म्हणून विद्यार्थ्यांनी संप पुकारला. तो कैक दिवसांनी अपेशी होऊन संपला. ती लढाई विचारांची नव्हती. असाच हुच्चपणा आपल्या १३२ विद्वानांनी केला. केवळ राजकीय मते पटत नाहीत म्हणून खुसपटे काढणे सुरू केले आणि शेल्डन पोलॉक यांना पदावर ठेवू नका, असे तीन-चारदा आडून आडून सुचवणारा अर्ज इंटरनेटवर फिरवला. नावगाव नसलेल्या १४६०० हून अधिक जणांचा – किंवा तेवढय़ा संख्येच्या ईमेल खात्यांचा – या मागणीस पाठिंबाही मिळाला, पण असल्या शक्तिप्रदर्शनापुढे रोहन मूर्ती बधले नाहीत. शेल्डन पोलॉक हेच प्रमुख संपादकपदी राहतील आणि हार्वर्ड विद्यापीठ छापखान्याच्या सहकार्याने आमचा प्रकल्पही सुरूच राहील, हे त्यांनी स्पष्ट केले. एवढय़ाने हे प्रकरण संपायला हवे होते. तसे झालेले नाही.
ते का झाले नाही, याची कारणे त्या १३२ विद्वानांनी पाठिंबा दिलेल्या पत्रकातच सापडतात. दुराग्रह आणि न्यूनगंडातून येणाऱ्या बढाया यांना थारा देऊ नये, या साध्याशा विचारापासून या १३२ पैकी अनेक विद्वान किती योजने दूर आहेत, याची मोजदादही त्या पत्रकाच्या आधारे करता येते. ती जिज्ञासूंनी जरूर करावी. मात्र १३२ पैकी अनेक जण हे आपापल्या क्षेत्रांत तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात, हेही ध्यानात ठेवावे. इतका विचार केल्यास या विद्वानांनी शेल्डन पोलॉक यांच्याबद्दल केलेला खटाटोप केवळ क्षुद्र नसून चिंताजनकही का आहे, हे लक्षात येईल. काहीही बोला पण रेटून बोला, वस्तुस्थितीचा कितीही विपर्यास करा पण दुसऱ्याचा कमीपणा दाखवून द्या, अशी पद्धत आजघडीला राजकारणामार्गे सर्वत्र बोकाळते आहे. विद्येचे क्षेत्रही त्यास अपवाद राहू नये, हे अधिक चिंताजनक. पोलॉक यांना नालायक ठरवण्याच्या नादात या विद्वानांनी असत्यकथनाचा आधार घेतला हे गंभीर आहे. ‘इंग्रजी शिक्षणपद्धती भारतात रुजवणारा मेकॉले आणि जर्मन विचारवंत मॅक्स वेबर या दोघांचे विचार पोलॉक महाशय पुढे दामटत असतात म्हणून तेही भारतद्वेष्टे’ अशी वाचकांची समजूत करून देण्यासाठी या पत्रकाने, पोलॉक यांनी साकल्याने विचार करण्यासाठी ज्या दोन्ही बाजू मांडल्या, जे खंडनमंडन केले, त्यापैकी फक्त खंडनातील काही विधानांचा आधार घेतला आहे. वस्तुत: पोलॉक यांनी वारंवार हेच सांगितले की, भारतातील – किंबहुना दक्षिण आशियातील- हे विद्यापीठीय पापच. ते या विद्वानांनी केले. पोलॉक यांच्यावरील ही जाहीर टीका एकांगी ठरेल किंवा कसे, याची तमा आपल्या विद्वानांनी बाळगूच नये हे दु:खद आहे. पोलॉक हे साक्षेपी अभ्यासक आहेत. त्यांचे म्हणणे असे की, संस्कृत कोणी शिकावे आणि संस्कृत ग्रंथाध्ययन करणाऱ्यांनी आणखी काय शिकावे यावर मर्यादा येत गेल्याने संस्कृत भाषेचा प्रसार मंदावला. मोगल आक्रमणासारखी कारणे अर्थातच ते नमूद करतात, पण त्यांचा भर आहे तो त्याही प्रतिकूल स्थितीत संस्कृतच्या प्रसारासाठी प्रयत्न का झाले नाहीत, यावर. ‘डेथ ऑफ संस्कृत’ या निबंधात ही खंत नेमकेपणाने आली आहे. साक्षेपी पोलॉक यांनी वेळोवेळी नमूद केलेला दुसरा आक्षेप असा की, ज्ञान संस्कृतातच होते असे मानण्याचे कारण नाही. प्राचीन वा सोळा-सतराव्या शतकापर्यंतच्या संस्कृतेतर भाषांमध्येही ज्ञान होतेच. त्यातले काही परंपरांनी टिकले. परंतु मुख्य धारा संस्कृतधार्जिणीच राहिली. या दोन आक्षेपांमुळे पोलॉक वा त्यांच्याशी सहमत असलेले विद्वान हे काही भारतीय विद्वानांना अप्रिय आहेत. अभ्यासकी क्षेत्रात प्रिय-अप्रियतेचा संबंध नसतो, पण जिथे संस्कृतप्रसाराच्या निराळय़ा वाटा शोधून काढण्यात आपले सर्वाचे पूर्वज कमी पडले हेच मान्य करायचे नाही, तिथे ही अप्रियता वास करते. पोलॉक यांनी आजवर मांडलेल्या आक्षेपांना, जेथल्या तेथे साधार उत्तरे देणे आणि त्यासाठीचे संशोधन विस्तारत नेणे हा मार्ग कोणीही घेतला नाही, त्याची भरपाई आता पोलॉक यांच्या नियुक्तीबद्दल ‘तीव्र नापसंती’सदृश विधाने करून कशी काय होणार? ज्या-त्या वेळी साधार उत्तरे द्यायची, तर पोलॉक यांनी हे आक्षेप का घेतले, त्यामागे त्यांचे संशोधकीय आधार कोणते आहेत याकडे पाहावे लागले असते. ते करायचे नाही, म्हणून पोलॉक यांना सूचक शब्दांत भारतद्रोही ठरवण्यापर्यंत या हटाववादी विद्वानांची मजल गेली आहे. पोलॉक यांना हटवा, प्रकल्पच अमेरिकेत न ठेवता भारतात आणा अशा मागण्या आडून वा थेट करून झाल्यावर, ‘घातक परिणाम टाळा’ अशा शब्दांत हे पत्रक संपते. यातले घातक म्हणजे िहसक परिणाम असे या विद्वानांना सुचवायचे नसावे, असे मानण्यास जागा आहे.
पोलॉक यांच्याआधी २०१० साली- म्हणजे काँग्रेसच्या राज्यात- वेंडी डॉनिजर या संशोधिकेच्या ‘ऑन हिंदुइझम’ या पुस्तकालाच हटविण्याचे प्रयत्न झाले. पेंग्विन बुक्स इंडियातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकावर दीनानाथ बत्रा या संघपरिवाराशी संबंधित संस्थांच्या माजी अध्यक्षांनी ते केले होते. पेंग्विन प्रकाशनाला त्यांनी खरमरीत कायदेशीर नोटीस पाठविली आणि पेंग्विननेही पुस्तकाची अख्खी आवृत्ती कचऱ्यात घातली. त्यानंतर २०१२ साली – म्हणजे पुन्हा काँग्रेसच्याच काळात- ए के रामानुजन यांचा ‘थ्री हंड्रेड रामायणाज’ हा लेख दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या पूरक अभ्यासक्रमातून हटविला. हे सारे अभ्यास, संशोधन, विद्यापीठ अशा क्षेत्रांत घडत होते. त्यामुळे सहिष्णुता वगैरेबद्दल गळे काढण्यापेक्षा दबाव येतो तर त्याचा प्रतिकार का होत नाही, याची चर्चा झाल्यास अधिक बरे. तो प्रतिकार अत्यंत शांतपणे, एका नकारानिशी रोहन मूर्ती यांनी केला. दुसरीकडे, वेंडी डॉनिजर यांचेही तेच पुस्तक आता अलेफ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले. तिसरीकडे, थ्री हंड्रेड रामायणाज हा लेख इंटरनेटद्वारे आता इंग्रजीखेरीज हिंदीतही उपलब्ध आहे.
ही लक्षणे दबाव आणणाऱ्यांच्या पराभवाचीच असल्याचा आनंद अजिबात नाही. सुजाण समाजाकडून असे पराभव आणखी वारंवार होऊ शकतात. तूर्तास हटाववादय़ांचा हुच्चपणा उघड पडतो आहे, हेही ठीकच म्हणायचे.