मोठय़ा प्रमाणावर निर्वासितांच्या लोंढय़ास तोंड द्यावे लागत असताना युरोपीय खंडातील देश त्यातून सुटू पाहत आहेत. युरोपीय महासत्तांनी एके काळी केलेल्या पापाचा भस्मासुर त्यांच्यावरच असा उलटला असताना निर्वासितांना सामावून घेण्यातच पापमुक्तीची थोडीफार शक्यता शिल्लक आहे.
आज, मंगळवार, १५ सप्टेंबर मावळेल त्या वेळी युरोपातील हंगेरी आणि सर्बयिा या दोन देशांतील सीमारेषा कडीकुलपाने बंद होईल. त्याच वेळी पलीकडील दुसरा सुखासीन देश डेन्मार्क आणि जर्मनी यांतील सुलभ रेल्वे सेवादेखील बंद झालेली असेल. हे होत असताना ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांच्यातील रेल्वे सेवा आजपासून पुनरुज्जीवित होईल. मात्र ऑस्ट्रियामधून जर्मनीतील म्युनिकशी जोडणारी रेल्वेवाहिनी बंदच असेल. या सगळ्यांमागील कारण आहे पश्चिम आशियातील विदग्ध देशांतून असहायांचा, निराश्रितांचा प्रचंड प्रमाणात युरोपात येत असलेला निर्वासित लोंढा. अलीकडच्या काळात यात भयावह गतीने वाढ झाली असून संत्रस्त देशांतील माणसे नेसत्या वस्त्रानिशी मिळेल त्या मार्गाने देश सोडून युरोपात शिरकाव करताना दिसतात. भौगोलिकदृष्टय़ा पाहिल्यास युरोपातील ग्रीस वा टर्की यांच्यासारखे देश आणि पश्चिम आशियातील समुद्रकिनारे यांच्यात फार अंतर नाही. परंतु ते फक्त कागदावर. प्रत्यक्षात पाहू गेल्यास खुष्कीच्या मार्गाने हे अंतर कापण्याची सोय नाही. तो प्रवास खूपच मोठा. पण त्याच वेळी समुद्रमाग्रे मात्र हे अंतर अगदीच किरकोळ. हीच सोय अनेक आफ्रिकी देशांनादेखील आहे. टय़ुनिशिया, अल्जिरिया आदी देशांच्या किनाऱ्यांवरून उत्तरेकडे जलमाग्रे गेल्यास युरोपातील एखाद्या तरी देशाच्या सीमा लागतात. मग तो देश इटली असेल वा स्पेन. म्हणजे पश्चिम आशिया आणि आफ्रिका या दोन्ही अस्वस्थ खंडांसाठी युरोपीय देश नजीकचे असून परिणामी युरोपीय खंडास मोठय़ा प्रमाणावर निर्वासितांच्या लोंढय़ास तोंड द्यावे लागत आहे. एका आकडेवारीनुसार यंदाच्या जानेवारीपासून पुढच्या आठ महिन्यांत या देशांतून साडेतीन लाख निर्वासित युरोपीय देशांच्या आश्रयास आले असून या प्रवासात २,७०० जणांना प्राण गमवावे लागले. साध्या रबरी होडय़ा, लाकडी तराफे आदी मिळेल त्या मार्गाने हे निर्वासित युरोपीय देशांच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या प्रवासाच्या अंगावर काटा आणणाऱ्या कथा हा सध्या युरोपीय माध्यमांतील चच्रेचा विषय आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर जिवावर उदार होऊन जगण्यासाठी निघालेला समुदाय हे मानवतेवरील आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट असून त्यातून बाहेर कसे पडायचे या चिंतेने अनेक युरोपीय देशांची झोप उडाली आहे. युरोपातील जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आदी देशांत या निर्वासितांना सामावून घेण्याची काही प्रमाणात क्षमता असली तरी डेन्मार्क वा हंगेरीसारख्या लहान देशांत हा अतिरिक्त भार सामावून घेण्याची क्षमता नाही. काही लाखांचीच लोकसंख्या असलेल्या या देशांत काही हजारांनी हे निर्वासित आले तर त्या देशांच्या अर्थव्यवस्था कोसळतील अशी परिस्थिती आहे. त्यात पुन्हा धर्म हा मुद्दा. त्याचमुळे काही देशांनी पश्चिम आशियातील इस्लामी निर्वासितांना स्थान देण्यास नकार दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे हे भिन्नधर्मीय आमच्या देशात आले तर जगण्याचा सगळाच तोल बदलेल. अशा तऱ्हेने एरवी तिसऱ्या जगास नीतिमत्ता शिकवणाऱ्या युरोपीय देशांची नतिक मूल्ये या संकटाच्या निमित्ताने तपासली जाणार असून या निर्वासितांना आश्रय देण्याखेरीज युरोपीय देशांसमोर अन्य पर्याय नाही. परंतु त्याच वेळी युरोपीय महासत्तांनी एके काळी केलेल्या.. आणि अजूनही करीत असलेल्या.. पापाची ही फळे असून ती भोगल्याखेरीज युरोपची सुटका नाही.
या पापाची बीजे दडली आहेत १९२८ साली झालेल्या करारात. त्यास रेड लाइन अ‍ॅग्रीमेंट असे म्हणतात. अक्राळविक्राळ पसरलेले ऑटोमन साम्राज्य लयास जाण्याचा काळ आणि पश्चिम आशियाच्या वाळवंटात खनिज तेल सापडण्याचा काळ यांत फार अंतर नाही. या तेलावरील मालकीसाठी अनेक अमेरिकी, फ्रेंच, डच आणि ब्रिटिश कंपन्यांत साठमारी सुरू होती. त्याआधी जन्माला आलेल्या टíकश पेट्रोलियम कंपनीस या तेल उत्खननाचे हक्क होते. या कंपनीत ब्रिटिशांचा लक्षणीय वाटा होता. पहिल्या महायुद्धास तोंड फुटत असताना त्यांनी तो अँग्लो पíशयन ऑइल कंपनीकडे हस्तांतरित केला. पुढे टर्कीच्या अमिराने बगदाद, मोसुल आदी परिसरांत तेल उत्खननाचे अधिकार या कंपनीस दिले. पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांनी या कंपनीतला आपला वाटा फ्रेंचांकडे वर्ग केला. एव्हाना अमेरिकी कंपन्या सामथ्र्यवान झाल्या होत्या. त्यांचा विचारच या देवाणघेवाणीत झाला नाही. परिणामी तगडय़ा अमेरिकी कंपन्या नाराज झाल्या. यातूनच पुढे मतभेद झाले आणि ते मिटवण्याचा प्रयत्न म्हणून हा लाल रेषा करार झाला. झाले असे की चच्रेच्या टेबलावर या विविध देशीयांत ऑटोमन साम्राज्याच्या कोणत्या भागावर दावा सांगायचा यावर एकमत होईना. त्या वेळी या चच्रेत सहभागी असलेल्या आणि टíकश पेट्रोलियम कंपनीत समभाग असलेल्या कालोस्त गुलबेंकीन या व्यापाऱ्याने समोरचा नकाशा ओढला आणि त्यावर लाल रेषा ओढून त्यातील प्रदेशांची वाटणी करून टाकली. सीरिया, अल्जिरिया आदी भाग फ्रान्सकडे गेले तर इराक, जॉर्डन आदी प्रदेशांवर ब्रिटनचा अंमल सुरू झाला. तेलसंपन्न सौदी अरेबियावर अमेरिकेने आपली पकड बसवली. अशा तऱ्हेने या बडय़ा देशांनी स्थानिक भावभावनांचा कोणताही विचार न करता हे देश गिळंकृत केले. पुढे पाश्चात्त्य देशांनी अफाट औद्योगिक प्रगती साधली ती याच गुलाम देशांतील खनिज तेलाच्या जोरावर. अमेरिका, फ्रान्स, इटली, हॉलंड, इंग्लंड आदी देशांतील तेल कंपन्या गबर झाल्या त्या याच देशांतील तेलावर. या कंपन्यांनी जगावर राज्य केले. अडथळे आणणारी सरकारे पाडली, उलथून पाडली वा भ्रष्ट मार्गाने कहय़ात ठेवली. हे सर्व करीत असताना या तेलसंपन्न देशांतील नागरिकांच्या भल्यासाठी या बडय़ा देशांनी काहीही केले नाही. या देशांतील राज्यकत्रे तेल कंपन्यांच्या तालावर नाचत आपले भले करून घेत असताना त्या देशांतील नागरिक मात्र तसेच भुकेकंगाल राहिले. देशाचे शासक गबर श्रीमंत आणि प्रजा मात्र पोटाची खळगी भरण्यासही मोताद अशीच स्थिती कित्येक वष्रे होती. ती आता पालटली. कारण आता तेल पूर्वीइतके दुष्प्राप्य नाही आणि पश्चिम आशियातील तेलावरच विकसित देशांची गुजराण होते असेही नाही. जगात अनेक ठिकाणी सापडू लागलेले नसíगक वायूचे साठे आणि नव्याने उदयास आलेले फ्रॅकिंग तंत्रज्ञान यांमुळे तेल आता बख्खळ निघते. त्याचमुळे त्याचे भाव आता पडू लागले असून तेलावर संसार अवलंबून असणारे देश चिंतित आहेत. या दोन टोकांच्या अवस्थांतून पश्चिम आशिया संक्रमण करीत असताना बडय़ा देशांनी तेथील अनेक देशांतील सत्ता उलथून पाडल्या. परंतु त्याच वेळी पर्यायी व्यवस्था उभारून देण्याची मात्र खबरदारी घेतली नाही. इराकमधून सद्दाम हुसेनचे उच्चाटन झाले, लिबियातून कर्नल मुअम्मर गडाफी गाडला गेला, सीरियातील असाद कुटुंबीयांच्या विरोधकांना रसद पुरवण्याच्या नादात अत्यंत टोकाची भूमिका घेणारे पोसले गेले. परिणामी या सर्वच देशांत अंदाधुंद परिस्थिती असून त्या देशांतील व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात त्या त्या देशातील टिनपाट राज्यकर्त्यांनी नागरिकांचे दमन चालवले असून त्यांना कोणीही वाली राहिलेला नाही. त्याचमुळे हजारोंच्या संख्येने हे नागरिक परागंदा होऊ लागले असून त्यांच्याकडे असलेल्या साधनांचा अभाव लक्षात घेता युरोपखेरीज त्यांना आश्रयासाठी जवळचे दुसरे स्थान नाही.
तेव्हा युरोपच्या भूमीवर जे काही घडत आहे ते अशा तऱ्हेने युरोपीय देशांनी इतके दिवस चालवलेल्या पापाचीच ही परिणती आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी पश्चिम आशियाचे तारुण्य उपभोगले. प्रसंगी ओरबाडले. तेव्हा आता गलितगात्र झालेल्या या देशांतील नागरिकांवर दयाघनाकडे पाहत.. का तुटले चिमणे घरटे.. म्हणायची वेळ आली असली तरी त्यांना या वार्धक्यात वाऱ्यावर सोडणे हे युरोपचे दुसरे पाप ठरेल.