आभासी दुनियेची माध्यमे मनाला मोहवत असतात, त्यामध्ये गुरफटून जाऊ नका, असे सांगितले जातच असते. तरीही त्यामध्ये रमण्याची ओढ अनावरच असते. या दुनियेचा पसारा आता आभास हेच वास्तव वाटावे, एवढा वाढतो आहे. म्हणूनच या दुनियेने व्यवहाराचे माध्यमच नव्हे, तर चलनही उपलब्ध करून दिले आहे.
फार पूर्वी, जेव्हा संगणक वगरे शब्ददेखील कल्पनेच्या कोशात दाखल झालेले नव्हते, तेव्हा आणि त्याआधीही ही दुनिया अस्तित्वात होती. खरे म्हणजे, अस्तित्वात असणे हा शब्द या दुनियेसाठी योग्यच नाही. तरीही या दुनियेचे अस्तित्व हे वास्तवच होते. या दुनियेचे नाव, आभासी दुनिया.. तेव्हा या दुनियेची माध्यमे वेगळी आणि मर्यादित होती. तरीही त्यांपकी काही माध्यमे सरसकट प्रत्येकाला उपलब्धही होती. स्वप्न हे या दुनियेचे तेव्हाचे आवडते माध्यम. फार पूर्वी या दुनियेची सफर करण्यासाठी केवळ स्वप्नावर स्वार व्हावे लागत असे. एखाद्या निद्रिस्त क्षणी, एखाद्या स्वप्नाने हात जोडून समोर उभे राहावे आणि ‘तुला हवे ते माग’ असा वर द्यावा, मग त्याच स्वप्नावर स्वार होऊन, जिथे जागेपणी पोहोचणेच काय, कल्पनेतदेखील वावरणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी स्वच्छंद विहार करून अतृप्ताचाच मनसोक्त आस्वाद घ्यावा आणि त्या निद्रिस्त क्षणाला जाग येताच पुन्हा वास्तवाच्या विश्वात वावरण्यास सज्ज व्हावे, ही तर तेव्हापासूनची जगरहाटीच होती. त्यामुळे, आभासी दुनिया हे काही अप्रूप नव्हते. त्या काळातही कुणी तरी सांगायचे, की आभासी दुनिया वगरे काही नसते. तो केवळ भ्रम असतो. पण असे म्हणणारेदेखील निद्रावस्थेत का होईना, कधी ना कधी या दुनियेची सर करून वास्तवाच्या दुनियेत परतलेले असतच. त्यामुळे आभासी असे या दुनियेचे नाव असतानाही, ही दुनिया म्हणजे एका विशिष्ट मनोवस्थेचे वास्तवच होते. आजही आहे. त्या दुनियेची क्षितिजे आता तर अधिकच विस्तारली आहेत. पूर्वीच्या काळी काही उदाहरणे, दृष्टान्ताच्या माध्यमातून या विश्वाचे वर्णन केले जात असे. ही दुनिया केवढी जगड्व्याळ आहे, हे सांगितले जात असे. कुणी त्याला माया म्हणत असत. माया म्हणजे मिथ्या. आभास हा कधीच सत्य नसतो, तो थेट, प्रत्यक्ष अनुभवता येत नाही असा छातीठोक दावाही त्या काळी केला जात असे. जी केवळ माया असते, त्याचा मोह धरू नका असे उपदेश मात्र तेव्हाही केले जात होते. मनोवस्थेचा तो काळ आणि त्याच अवस्थेचे आजचे वर्तमान यांमधील हा एक समान धागा.. आजही, या आभासी दुनियेची माध्यमे मनाला मोहवत असतात, त्यामध्ये गुरफटून जाऊ नका, असे सांगितले जातच असते. तरीही त्यामध्ये रमण्याची ओढ अनावरच असते. मात्र, माया असली, तरी ती कधीच सत्य नसते, हे विधान मात्र काळाच्या ओघाने असत्य ठरविले आहे. उलट, माध्यमविस्तारामुळे अलीकडे वास्तवाच्या दुनियेत माणूस जेवढा काळ घालवितो, त्याहूनही अधिक काळ या आभासी दुनियेत रमण्याचा आनंद सध्या उपभोगत आहे. पूर्वी जेव्हा माध्यमे मर्यादितच होती, तेव्हा कदाचित केवळ निद्रावस्थेतील स्वप्नावर स्वार होऊनच या दुनियेची सफर शक्य होती. आता वर्तमानात या दुनियेच्या सफरीसाठी माध्यमांची एवढी रेलचेल झाल्याने, जागेपणीदेखील या दुनियेत स्वत:ला हरवून जाण्याची सोपी सोय सहज उपलब्ध झाली आहे..
जग जसजसे प्रगत होत गेले, तसतशा माणसाच्या जाणिवाही प्रगल्भ होत गेल्या. वास्तवाशी स्वत:ला जोडण्याची इच्छा वाढत गेली. पण प्रत्येकालाच ते साध्य होत नव्हते, तरीही ते स्वीकारण्याचीही तयारी नव्हती. आभासी दुनियेची माध्यमे स्वप्नापासून पुढे सरकत रुपेरी पडद्यावर दाखल झाली, तेव्हा अशा मनोवस्थांना आणखी बरे वाटू लागले. वास्तवाच्या दुनियेतील हरवलेल्या, स्वप्नातदेखील न सापडलेल्या अशा अनेक दुर्मीळ क्षणांचा सहवास मिळवून देण्याचे काम रुपेरी पडद्यावरच्या आभासी दुनियेने केले. या क्षणांच्या संगतीने भारावलेल्या मनांना जागेपणीच आभासी दुनियेची सफर करण्याचे एक साधन रुपेरी पडद्यावरून मिळाले. अशा तऱ्हेने, आभासी दुनिया वास्तवाच्या दिशेने पुढे पुढे सरकतच राहिली. एक ना एक दिवस ती वास्तव जगाची जागा व्यापणार, हे मात्र तेव्हादेखील कुणाच्या लक्षातच आले नाही. किंबहुना, आभासी दुनियेने वास्तवाचे जग व्यापले तरी काहीच फरक पडणार नाही अशीच जणू तेव्हाची धारणा असावी. तसेच घडतही गेले. आता या आभासी दुनियेने वास्तवाचा प्रत्येक क्षण व्यापून टाकला आहे. हातातील मोबाइलच्या चिमुकल्या पडद्यापर्यंत ही दुनिया पोहोचली आणि वास्तविक जगण्याच्या प्रत्येक क्षणावर जणू या दुनियेने कब्जा केला. या दुनियेतलं जगणं तर वास्तवापेक्षा सुखकारक आहे, असेही वाटू लागले. कारण दळणवळणाची माध्यमे आणि संवादाची साधनेही या दुनियेने विस्तृत केली. भौतिकदृष्टय़ा शेकडो मल अंतरावर असलेल्या कुणाशीही थेट भेट आणि प्रत्यक्ष संवाद या आभासी दुनियेने साध्य करून दिला. जेव्हा एखादी गोष्ट प्रत्यक्ष, जागेपणी आणि पूर्णपणे भानावर असताना, डोळ्यादेखत करता, पाहता आणि अनुभवताही येते, तेव्हा त्या गोष्टीला आभास असे म्हणताच येत नाही. उलट तेच वास्तव होऊन जाते. त्या अर्थाने, आजच्या आभासी दुनियेने वास्तवाचे स्थान घेतले आहे. म्हणजे, आभासी म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, तेच तर आता वास्तव होऊन बसले आहे..
केवळ संवादच नव्हे, तर व्यवहाराचे साधनही जेव्हा या माध्यमाने सोपे करून दिले. सणासुदीचा आनंद, सुखदु:खाच्या साऱ्या क्षणांना सोबत, स्नेहाचे नवनवे धागे, संवादाची सारी साधने आणि व्यवहाराचे विश्वदेखील या दुनियेने माणसासाठी खुले केले आहे. पूर्वी ज्याचे वर्णन केवळ चमत्कार म्हणून केले जायचे, ते सारे या दुनियेने सत्यात आणून उभे केले आहे. म्हणूनच दगदगीच्या आणि धावपळीच्या जगण्याला या विश्वाने एक आल्हाददायक दिलासा दिला आहे. या विश्वाला एक जागतिक भाषादेखील आहे. हातातल्या मोबाइलच्या पडद्यावरील संदेशपेटीत ती भाषा बोलकी होते आणि मनांना जोडते. सणासुदीच्या दिवसांच्या आनंदाला ही भाषा अधिक बहार आणते, तर उदास, दु:खी क्षणांना ही भाषा आपुलकीच्या भावनेने कुरवाळते. या भाषेला लिपीची बंधने नाहीत. स्माइली हे समर्पक नाव आभासी दुनियेच्या विश्वव्यापी वर्तमानाने सहज स्वीकारले आहे.
आपणही सध्या सणाच्या आनंदावर स्वार आहोत. एका बाजूला पारंपरिक आनंदाची उधळण सुरू आहे. फटाके, फराळाबरोबरच, आपल्या माणसांना भेटण्याचा, नवी माणसे जोडण्याचा आणि नव्या मनांशी नाती जोडण्याचा हा सण साजरा करताना, वास्तवाच्या दुनियेतील घडय़ाळाच्या काटय़ाशी मेळ साधणे शक्य होत नसल्याने अपरिहार्यपणे आभासी दुनियाच मदतीला धावून आली आहे. दिवाळीच्या शुभेच्छापत्रांची जागा या दुनियेतील व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांच्या मेसेज बॉक्समधील रंजक, कल्पक आणि सुखद संदेशांनी घेतली आहे. आता तर या दुनियेत आवाजाची जादूही दाखल झाली आहे. एखादा संदेश सहजपणे चलच्चित्रासह आपल्या आवाजात आपल्या सुहृदाला तत्क्षणी पोहोचविण्याची जादू या आभासी दुनियेनेच वास्तवात आणली आहे. या दुनियेचा पसारा आता आभास हेच वास्तव वाटावे, एवढा वाढतो आहे. म्हणूनच या दुनियेने व्यवहाराचे माध्यमच नव्हे, तर चलनही उपलब्ध करून दिले आहे. घरबसल्या, कोणताही क्षण वाया न घालविता वास्तवात उतरविणारे व्यवहार जर याच दुनियेने साध्य करून दिले असतील, तर त्याला आभासी दुनिया तरी कसे म्हणायचे?..
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2015 रोजी प्रकाशित
निर्मळ आभास निराभास..
आभासी दुनियेची माध्यमे मनाला मोहवत असतात, त्यामध्ये गुरफटून जाऊ नका, असे सांगितले जातच असते.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 14-11-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The online virtual world