परवा मोठीच गंमत झाली! अगदी महामोठी! महानेता वा महानायकाएवढी!! म्हणजे त्याचे असे झाले की परवा मराठी माणसांची चुलत संघटना जी की मनसे, तिच्या चित्रपट शाखेच्या वर्धापनदिनानिमित्ताने मुंबईत एक छोटासा महामेळावा झाला. आता कोणताही पक्ष जन्मास आला आणि त्याचा अगदीच जनता पक्ष नाही झाला, की त्याचा वाढदिवस होतोच. त्यासाठी वाढच व्हावी लागते, अशी काही आचारसंहिता नसते! अर्थात तसा काही नियम असता, तरी त्याचे खळ्ळखटॅक होण्यास आपल्याकडे असा कितीसा अवधी लागतो? तर सालाबादप्रमाणे यंदाही मनसेच्या चित्रपट शाखेचा मेळावा झाला. तेव्हा त्यात काही गंमत नाही. खरी जम्माडीगंमत ही होती, की या मेळाव्यास चक्क तीन-तीन महा-व्यक्ती उपस्थित होत्या. त्यातली एक अर्थातच मराठी माणसांचे महानेते पृथ्वीराजमान्य राजेश्री राजसाहेब ठाकरे. दुसरी व्यक्ती होती स्वयंघोषित नाचाचे महागुरू मा. सचिन पिळगावकर आणि तिसरी मोठय़ा व छोटय़ा पडद्यावरील महानायक महामहीम अमिताभ बच्चन. तसे पाहता महानेते राज ठाकरे यांची कोणतीही सभा म्हणजे खाशी गंमतच असते. ते जरी कायम रागावलेले दिसत असले, तरी ते नकला वगैरे फर्मास करतात. त्यामुळे एकूणच रसिकांना विचारांचे सोने आदी बाबी हसतहसत मिळून जातात! नाचाचे महागुरू मा. पिळगावकर यांचेही अगदी तस्सेच. असे म्हणतात, की नट हा ‘फिलॉसॉफर अॅथलीट’ असावा. मा. पिळगावकर यांचे नृत्य अॅथलेटिक्सच्या कसोटीवर तंतोतंत उतरते आणि ते येता-जाता तत्त्वज्ञानही सांगत असतात. त्यातून मायबाप रसिकांचे हमखास मनोरंजन होते. हे दोघेही या मेळाव्यास उपस्थित असल्याने गंमत येणारच होती. तशी ती झाली. पण त्या गमतीला खरी उंची मिळवून दिली ती अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीने. ही एवढी गंमतदार गोष्ट होती, की केवळ असे घडणार या कल्पनेनेच अनेक मनसैनिकांची गमतीने वाचा बसली. २००७ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरावर आपण ‘दगडी फेकल्या’ ती गंमत अधिक मस्त होती, की ही गंमत अधिक बहारदार आहे, हेसुद्धा त्यातल्या अनेकांना सांगता येईना. राजसाहेबांना मात्र आपल्या मनसैनिकांच्या बौद्धिक उंचीची चांगलीच जाणीव असल्याने त्यांनी ते तातडीने स्पष्ट केले. झाले गेले, म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यावर केलेली टीका, जया बच्चन यांच्यावर घेतलेले तोंडसुख वगैरे सारे गंगेला मिळाले, असे ते म्हणाले. यातून राज यांची सुसंस्कृतता मात्र स्पष्ट दृग्गोचर झाली. येथे ते गंगेऐवजी गोदावरी, कृष्णा, कोयना, चंद्रभागा असे काही म्हणाले असते, तर ते अधिक मराठीवादी झाले असते. परंतु भारतीय संस्कृतीत गंगेला हे जे शुद्धीकरणाचे कार्य देण्यात आले आहे, ते खूपच उपयुक्त असून, आपली संस्कृती किती उपयुक्ततावादी आहे, असे प्रबोधनही यातून व्हावे असाच त्यांचा सुप्त हेतू असल्याने व शिवाय ते छोरा गंगा किनारेवाल्याबद्दल बोलत असल्याने, ते बोलले ते योग्यच झाले. असे असले तरी आपण अमिताभ यांच्यावर पूर्वी ज्या कारणांवरून टीका केली, ते आपले मत आजही कायम असल्याचेही राज यांनी या वेळी सांगितले. राज यांनी एकसमयावच्छेदेकरून दोन दगडांवर पाय ठेवण्याची कलाही आता चांगलीच अवगत केली आहे, याचे दर्शनही या निमित्ताने झाले. हीसुद्धा एक गंमतच झाली म्हणायची या मेळाव्यात.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2013 रोजी प्रकाशित
राज तेरी गंगा..
परवा मोठीच गंमत झाली! अगदी महामोठी! महानेता वा महानायकाएवढी!! म्हणजे त्याचे असे झाले की परवा मराठी माणसांची चुलत संघटना जी की मनसे, तिच्या चित्रपट शाखेच्या वर्धापनदिनानिमित्ताने मुंबईत एक छोटासा महामेळावा झाला.

First published on: 25-12-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan raj thackeray sink differences