पश्चिमेकडील राज्यांत मोसमी पाऊस नुकता येत असताना, ईशान्येकडील आसाममध्ये मात्र महिनाभरापासून हाहाकार उडाला आहे. आत्तापर्यंत पावसामुळे आलेल्या पुरात आणि दरडी कोसळल्यामुळे ६८ जणांना जिवास मुकावे लागले आहे. आसामच्या ३२ जिल्ह्यांतील सुमारे ३ लाख रहिवासी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटात अडकले आहेत. दरवर्षी आसाममधील ४० टक्के भूभाग पावसाच्या रौद्ररूपाने हतबल होतो, त्यात अनेकांचे जीव जातात. स्थावर मालमत्तांचेही मोठे नुकसान होते. आसाम हे पूरप्रवण राज्य म्हणूनच ओळखले जाते. २००४ मध्ये आलेल्या पुरात सुमारे सव्वा कोटी नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती आणि २५१ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यापूर्वी १९८८ आणि १९९८ या वर्षांतही आसामला मोठी हानी सोसावी लागली. देशातील एकूण पूरप्रवण भूभागांपैकी दहा टक्के भाग केवळ आसामातच आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या राज्याची वर्षांला सरासरी दोनशे कोटी रुपयांची हानी होते. २००४ मधील पुरामुळे हानीचा हा आकडा सर्वाधिक म्हणजे ७७१ कोटी रुपये एवढा होता. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील नद्यांची पाण्याची बारमाही पातळी आत्ताच वाढू लागली आहे. येणाऱ्या काळातील भयावह संकटाची ही चाहूलच आहे. ईशान्येकडील या तीनही राज्यांमध्ये नागरीकरण मोठय़ा प्रमाणावर झालेले नाही. अतिरेकी प्रमाणातील बांधकामे नसल्याने, पावसाचे वा पुराचे पाणी जमिनीत मुरण्यासही बराच वाव आहे, तरीही पावसाळा हा या राज्यांसाठी संकटाचाच ठरत आला आहे. या प्रदेशाची भौगोलिक रचना आणि अति प्रमाणात पडणारा पाऊस याव्यतिरिक्त नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळेही दरवर्षी आसामला या संकटाच्या खाईत जावे लागते. ब्रह्मपुत्रा व बराक या नद्या,  त्यांना मिळणाऱ्या पन्नासहून अधिक उपनद्या हा आसामचा भूगोल. त्याशिवाय शेजारील अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातील नद्यांचे पाणीही आसाममधील नद्यांना येऊन मिळते. मेघालयातील ढगफुटीमुळे २००४ आणि २०१४ मध्ये आसामला मोठा फटका बसला होता. याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीचे विस्तारत जाणारे पात्र ही या संकटामागील एक महत्त्वाची समस्या बनली आहे. त्यामुळे नदीतील वाळू वाहून जाण्याचे प्रमाण वाढते आणि दरडी खिळखिळय़ा होऊन कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ होते. १९५० पासून ब्रह्मपुत्रेचे पात्र विस्तारत गेल्याने ४.२७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. याच काळात या नदीचे पात्र काही ठिकाणी सुमारे पंधरा किलोमीटरने रुंद झाले आहे. दर वर्षी सुमारे आठ हजार हेक्टर जमीन वाहून जाते, असा आसाम सरकारचा दावा आहे. अनियोजित नागरीकरणामुळे झालेले परिणाम या पूरस्थितीस कारणीभूत ठरतात. अशा विकासात मैलापाणी वाहिन्या निर्माण केल्या जात नाहीत. तसेच नदीकाठावर होणारे मानवी अतिक्रमण, जंगलतोड, डोंगरकापणी आणि बांधलेली धरणे हीदेखील आसामच्या पूरसंकटाची कारणे आहेत. दर वर्षी येणाऱ्या या संकटाचा सामना करताना या प्रश्नांकडे केवळ अंगुलिनिर्देश केला जातो. मात्र ते प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती नसते. याचा परिणाम या राज्यातील चाळीस टक्के भूभागांवरील नागरिकांना भोगावा लागतो. नैसर्गिक संकटांचा सामना करण्यात एक वेळ अपयश येऊ शकते, परंतु मानवनिर्मित संकटे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास काही प्रमाणात का होईना, या हानीची तीव्रता कमी होऊ शकेल.  (समाप्त)