शून्याचे महत्त्व

मुंबई महापालिका हद्दीत रविवारी एकाही करोना बळीची नोंद झाली नाही ही बाब हुरूप वाढवणारी ठरते.

मुंबई महापालिका हद्दीत रविवारी एकाही करोना बळीची नोंद झाली नाही ही बाब हुरूप वाढवणारी ठरते. सहसा रविवारी चाचण्या कमी होतात किंवा प्रयोगशाळा बंद असल्यामुळे नमुन्यांचे पृथक्करणही मर्यादित होते, त्यामुळे बाधितांची संख्या कमी नोंदवली जाते हे सर्वज्ञात आहे. बळींबाबत तसे म्हणता येत नाही. अत्यवस्थ असलेल्यांचा मृत्यू होण्याची नोंद सरकारदप्तरी बाधित नोंदणीनंतर काही दिवसांनी होत असते. मुंबईत गेल्या अनेक दिवसांनंतर असा एखादा दिवस उजाडला हेही नसे थोडके. मुंबई महापालिकेच्या करोना नोंदीनुसार यापूर्वी शून्य करोना बळीची नोंद २६ मार्च २०२० रोजी झाली होती! त्या दिवसानंतर करोना महासाथीच्या दोन लाटा आल्या आणि त्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालीच, शिवाय आरोग्य यंत्रणेवरही अपरिमित ताण पडला. करोनावर कोणताही ठोस उपचार पहिल्या लाटेच्या वेळी ज्ञात नसल्याने तेव्हा मृतांचे प्रमाण अधिक होते. १७ मार्च २०२० रोजी पहिल्या करोना बळीची नोंद मुंबईत झाली. २० जून २०२० रोजी मुंबईत सर्वाधिक १३६ करोना बळी नोंदवले गेले. दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेनंतरही १ मे २०२१ रोजी करोना बळींचा आकडा मुंबईत ९० वर गेला होता. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आरोग्यसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला तोवर सुरुवात झाली होती. करोनाच्या डेल्टा उपप्रकाराच्या प्रादुर्भावामुळे बाधितांची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत बरीच अधिक असली, तरी लसीकरणामुळे मनुष्यहानीचे प्रमाण बऱ्यापैकी घटू लागले होते. मात्र दोन्ही लाटांमध्ये मुंबईतील आरोग्य यंत्रणा अथकपणे कार्यरत राहिली आणि परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याविषयी विलक्षण दक्ष राहिली. धारावीसारख्या तुलनेने अधिक संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या वस्तीत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा रात्रंदिन राबत होती. राज्य सरकारच्या पुढाकाराने आणि महापालिका प्रशासनाच्या कल्पकतेमुळे मुंबईत इतर महानगरांच्या तुलनेत अधिक तत्परतेने कोविड-निगराणी केंद्रे उभी राहिली. लक्षणरहित व तुलनेने कमी गंभीर अशा रुग्णांची मोठ्या संख्येने सोय या केंद्रांमध्ये झाली आणि गंभीर व अतिगंभीर रुग्णांना सामावून घेण्यासाठी रुग्णालयातील खाटा बऱ्यापैकी उपलब्ध राहिल्या. मुंबईतील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आजही देशात अग्रणी मानली जाते. करोना साथीमध्ये या यंत्रणेचा कस लागला. सारे काही सुरळीत पार पडले अशातला भाग नाही. काही त्रुटीही नक्कीच होत्या. परंतु कोठेही सरकार वा प्रशासन हतबल झालेले आढळले नाही. पण करोनाच्या बाबतीत लढाईला पूर्णविराम असे काही नसते हे वेळोवेळी आढळून आले आहे. मुंबईत बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यात अनपेक्षित असे काही नाही. कारण टाळेबंदी बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये शिथिल वा संपुष्टात आल्यामुळे अधिकाधिक नागरिक घराबाहेर पडत आहेत. ऑगस्टच्या महिन्यात दुकाने, लोकल प्रवास; सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित प्रमाणात शाळा, प्रार्थनास्थळे, चित्रपट-नाट्यगृहे व सांस्कृतिक केंद्रे आणि महाविद्यालये खुली झाल्यामुळे काही प्रमाणात रुग्णवाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. देशातील इतर भागांमध्ये आढळून येऊ लागली आहे तशी चाचण्यांच्या बाबतीत हेळसांड मुंबईत सहसा दाखवली गेली नाही. आकडे वाढत गेले त्याबद्दल निष्कारण घबराट येथे पसरली नव्हती. त्याचप्रमाणे, शून्य करोनाबळी हा केवळ टप्पा आहे याची जाणीव ठेवून निष्कारण आनंदोत्सव करण्याचीही तूर्त गरज नाही याचे भान मुंबईतील यंत्रणा व नागरिक राखतील, अशी अपेक्षा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The importance of zero within mumbai municipal corporation limits corona virus infection victim record akp

Next Story
हस्तांदोलनापलीकडे..
ताज्या बातम्या