|| गिरीश कुबेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणी स्वत:च… या सर्वांनाच इथे आणखी मुक्काम नको होता… असेच आणखीही कित्येक. कारणं निरनिराळी. पण इतके दिवस जे विद्यार्थ्यांनी केलं तेच आता सुस्थितीतले प्रौढ करू लागले…

करोनाचा दरवाजा किलकिला झाल्यामुळे आता माणसं सदेह समोरासमोर भेटायला सुरुवात झालीये. इतके दिवस ‘झूम’वगैरे मार्गांनी कामं होतच होती. पण भेटी काही फक्त कामासाठी नसतात. त्यामुळे कामाशिवायचा आनंद घ्यायचा असेल तर सदेह भेटींना काही पर्याय नाही. म्हणजे घराबाहेर पडणं आवश्यक. खरं तर घरून काम म्हणजे घरच्यांनाही उसंत नाही आणि घरून काम करणाऱ्यांना कामावरून घरी गेल्याचंही समाधान नाही. असो. तर आता माणसं भेटायला लागलीयेत. पूर्वीइतकं नसेल, पण जगणं रुळावर येईल अशी चिन्हं आहेत. खरं तर ‘तिसरी लाट’ वगैरे भीती आहेच. पण कदाचित ती यायच्या आत आणि पुन्हा टाळेबंदीत अडकून पडायच्या आत भेटीगाठी झालेल्या बऱ्या अशा विचारानंही असेल पण… सप्ताहान्त किणकिणाट कानी पडू लागले आहेत. अशाच एका भेटीचा हा वृत्तांत. अर्थातच मुंबईत घडलेला. त्यामुळे प्रातिनिधिक म्हणता येईल असा…

* * *

झालं असं की आकारानं मध्यम अशा एका उद्योजक मित्रानं गेल्या आठवड्यात गप्पांचा फड मांडला. हा खूप जुना स्नेही. समवयीन म्हणावा असा. काही तरी वेगळं करायची हौस. नोकरी सोडून व्यवसायात पडला. आज शंभरेक कोटींची उलाढाल असेल. त्यानं सगळ्या जुन्या मित्रमंडळींना उत्साहानं एकत्र आणलं. अशी निमंत्रणं आल्यावर जायचं की नाही याचा निर्णय घेण्यात बऱ्याचदा ‘अरेच्चा… अमुकपण येतोय का, वा’ अशा मनातल्या मनात उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मोठा वाटा असतो. कोणत्याही बैठकीत हे सहपाठी महत्त्वाचेच. या बैठकीत तर तसे ते जास्त महत्त्वाचे होते. सुरुवातीच्या, उमेदवारीच्या काळातल्या सहप्रवासानंतर बऱ्याचदा प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळ्या दिशेनं वळतात आणि मग फक्त ‘एकदा निवांत भेटायला हवं’ ही भावना तेव्हढी सतत सोबतीला राहते.

तसं हे निवांत भेटणं होतं.

भेटल्यावर जमलेल्या सर्वांच्या उत्साहाचा फेस काही काळातच विरल्यावर प्रत्यक्ष गप्पा सुरू झाल्या. कोणाचं कसं सुरू आहे वगैरे. ते झाल्यावर आयोजकानं बैठकीच्या प्रयोजनाच्या मुद्द्याला हात घातला. छान सुरू होतं त्याचं. व्यवसाय चांगलाच फुलला होता. अनेक ठिकाणी कार्यालयं सुरू करावी लागेल इतका त्याचा व्याप वाढला होता. नव्या काही योजना त्याच्या डोक्यात होत्या. त्या विषयी तो बोलणार असंच त्यावेळी सर्वांना वाटलं. पण त्यानं धक्काच दिला.

‘मी सिंगापूरला घर करतोय’, या त्याच्या वाक्यानं सगळ्यांचे हात थांबले आणि तोंडं बंद झाली. पुढचा संवाद साधारण हा असा :

‘‘म्हणजे देश सोडतोयस?’’

‘‘हो… आता परवडेनासं झालंय. या करोनात खूप नुकसान झालं. ते अन्य देशांतही झालंय ते माहीत आहे. पण इथे अगदीच वाताहत झाली. आणि व्यवसायापोटी सिंगापूरला नेहमीच जायचो. तेव्हा कायमचं तिकडेच जावं असा निर्णय घेतलाय…’’

त्याची बायको आणि मुलगाही तयार होते. मुलाला तिथल्या कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेशही मिळालाय. बायको व्यवसायात मदत करायची. ते तसंच सुरू राहणार आहे. गंमत म्हणजे तो व्यवसायाचा इथला गाशा गुंडाळणार नाहीये. तो तसाच. फक्त हा तो तिथून हाकणार.

याहूनही खरा मुद्दा म्हणजे त्याच्या या घोषणेनं खरा धक्का बसलेले फक्त दोन-तीन जणच होते. बाकीच्या सर्वांना हे असंच अन्यत्रही कसं सुरू आहे याची सविस्तर माहिती होती. त्यातल्या एकाचा भाऊ बड्या आंतरराष्ट्रीय बँकेत होता. तो दुबईला स्थायिक होतोय. दुसऱ्याची बहीण आणि तिचा नवरा दोघेही मार्केटिंगमधे आहेत- नवरा माध्यम कंपनीत आणि बहीण वित्तीय व्यवस्थापनात-  हे दोघेही थेट न्यूझीलंडला मुक्काम हलवतायत. त्यांचा आग्रह या मित्रानंही तसंच करावं असा आहे आणि मित्र हळूहळू होकाराकडे झुकतोय. तिथं आलेला आणखी एक त्याच्या कंपनीच्या मालकाचं सांगत होता. त्या उद्योगपतीनं आपला सगळा कुटुंबकबिला लंडनला नेला. जमलेल्यांत एक मूळचा दिल्लीतला होता. तो आमच्या एका मित्राचा जवळचा मित्र. म्हणून आलेला. त्याची कहाणी अंगावर काटा आणणारी. त्याच्या ‘जीजाजी’ला दिल्लीत करोना काळात रुग्णालयात जागाच मिळाली नाही. घरातच गेला तो आणि त्याचं असं डोळ्यादेखत जाणं पाहून त्याची आई गेली आणि वडिलांची दातखीळ बसली ती तशीच. ते दोघे सोडून घरात सर्वच करोनाग्रस्त. राहतायत का जातायत अशी स्थिती. तो म्हणाला : हम सबने तय किया है कहीं और सेटल होने का…

‘कहीं और’ म्हणजे भारताबाहेर. तो म्हणाला माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत की मी कोणा बड्या देशाचं नागरिकत्व ‘विकत’ घेईन! पण आपली पात्रता आणि अनुभव आपल्याला अशा देशांत नोकरी नक्की देईल याचा आत्मविश्वास त्याला होता. चार-पाच देशांत, त्यात अगदी माल्टा देखील होता, त्यानं अर्ज पण केले म्हणे विविध कंपन्यांत. जास्तीत जास्त पुढच्या सहा महिन्यांत नक्की शिफ्ट होऊ याची खात्री होती त्याला.

त्या दिवशी नंतरच्या सर्व गप्पा या अशाच विषयाभोवती फिरत राहिल्या. पाऊस सुरू झालेला. मुंबईत पाऊस बरसत नाही. तो कोसळतो. गर्दीच्या वेळी वारूळ फुटावं तशी माणसं लोकलमधनं फुटतात तसा मुंबईचा पाऊस फुटतो. वाढता पाऊस आणि हा विषय… ती संध्याकाळ अगदीच दमट होऊन गेली.

***

दुसऱ्या दिवशी सरकारातल्या एका उच्चपदस्थाशी बोलताना हा विषय काढला. तर आश्चर्य असं की त्याला याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. हो… मोठ्या प्रमाणावर भारतातनं धनिक स्थलांतर करतायत सध्या, असं तो अगदी सहज- शांतपणे सांगून गेला.

‘बीबीसी’नं या विषयावर दिलेली एक बातमी हाताला लागली. एकट्या २०२० या एकाच वर्षात साधारण पाच हजार लक्षाधीशांनी (खरं तर डॉलरातले लक्षाधीश रुपयांत अब्जाधीश होतात!) भारतमातेचा त्याग करून परदेशी घरोबा केल्याचा तपशील त्या बातमीत आहे. म्हणजे आपल्या देशात ‘हाय नेट वर्थ’ गटात मोडणाऱ्यांतल्या किमान दोन टक्क्यांनी दुसऱ्या देशाला आपलं म्हटलंय. लंडनस्थित ‘हेन्ले अँड पार्टनर्स’ (एचअँडपी) ही एक खासगी कंपनी. स्थलांतर, देशांतर, परदेशांचं नागरिकत्व अशा क्षेत्रातलं हे आदरणीय नाव. अनेक व्यावसायिक या कंपनीच्या मदतीनं, मार्गानं आपले परदेशातले मार्ग शोधत असतात. तर या कंपनीनुसार पैसे खर्च करून परदेशात वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांतल्या जगभरातल्या इच्छुकांत भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा अर्थ असा की जगात या भरतभूचे नागरिक सर्वाधिक संख्येने मायभूमीचा त्याग करू इच्छितात. त्यातल्या काहींनी तर या देशातला ‘कर-दहशतवाद’ हे कारण दिलंय. म्हणजे करोनाभयाच्या जोडीला करही! यातल्या सर्वांकडे इतके पैसे आहेत की ते विकसित देशांतलं नागरिकत्व ‘विकत’ घेऊ शकतात. आणि तेच करतायत ते! अमुक कोटी गुंतवलेत तर अनेक देशांत नागरिकत्व मिळतं. त्या मार्गानं हे सर्व इतर देशांत जाऊ इच्छितात. या मंडळींच्या संभाव्य वसतीस्थानांच्या यादीत पोर्तुगाल, माल्टा आणि इतकंच काय सायप्रस यासारखे देश देखील आहेत. म्हणजे या सर्वांना इंग्लंड, अमेरिका वगैरेच हवे आहेत असं नाही.

त्यांची इच्छा फक्त इतकीच : यापुढे कोणा विकसित देशात राहायचं.

आता यावर देशप्रेमी, देशभक्त असे सच्चे भारतीय जणू रक्त वगैरे उसळल्यासारखे सात्त्विक संतापाने थरथरू लागतील. तो संताप जिरवण्यासाठी त्यांनी इतकंच करावं. २०१२ पासून परदेशी शिकायला म्हणून गेलेले आपले किती तरुण/ तरुणी भारतात परतले याचा अंदाज घ्यावा. त्यांना कळेल देश सोडणाऱ्यांत भारतीय विद्यार्थी जगात सर्वात आघाडीवर आहेत ते! इतके दिवस विद्यार्थीच देशांतर करत होते. आता हे सुस्थितीतले प्रौढ त्यांच्याच मार्गाने निघालेत.

हेही म्हणतायत ने मजसी ने…  पण यांचा प्राण तळमळतोय देश सोडण्यासाठी!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus third wave zoom whose brother someone sister social media meet akp
First published on: 19-06-2021 at 00:09 IST