अलीकडे विद्वान, अभ्यासक मंडळी मोठय़ा अभिमानाने सांगत असतात, अमुक एका सिंपोझियमचं मला निमंत्रण आहे, तमुक सिंपोझियममधे माझा शोधनिबंध वाचला गेला वगैरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या सिंपोझियमचा अर्थ ?

सरत्या वर्षांत काय काय हाताला लागलं?

काही उत्तम पुस्तकं, सिंगापूरच्या रद्दीवाल्याकडे सापडलेली, न्यूयॉर्कच्या स्ट्रॅण्ड बुक स्टॉलमधल्या जुन्या संग्रहातली, अमेरिकी निवडणुकीच्या निमित्ताने तिकडे फिरताना काही विद्वानांशी जमलेला स्नेह, कुमारांचा रतिभैरव, नाशकात कोणा विक्रांत होळकर नावाच्या तरुणानं स्वत:च्या शेतात बनवलेल्या अगदी फ्रेंच वाटावी इतक्या उत्तम व्हाइट वाइनशी घालून दिलेली गाठ आणि अप्रतिम जेवणानंतर उच्च दर्जाच्या लिक्युअरचा एक शॉट मिळावा तसा हाती लागलेला ‘नवभारत’ या मासिकाचा एक अत्यंत दुर्मीळ अंक.

वाईतल्या प्राज्ञपाठशाळेतर्फे हे मासिक प्रकाशित केलं जायचं. साक्षात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी याचे संपादक होते. हा जो प्रस्तुत दुर्मीळ अंक म्हणतोय तो आहे १९७८ सालच्या मे महिन्यातला. त्याचे कार्यकारी संपादक होते मे. पुं. रेगे. तर्कतीर्थ संपादक आणि मेपुं कार्यकारी! टिळक आणि आगरकरांच्या वादाला विश्राम बेडेकर ‘नक्षत्रांच्या शर्यती’ असं म्हणाले होते. तर्कतीर्थ आणि मेपुं यांच्या संपादकत्वाखालचे ‘नवभारत’चे अंक म्हणजे तसंच काहीसं. असो.

तर हा अंक दुर्मीळ का? तर तो विशेषांक आहे. काय विषय असावा त्याचा?

‘मद्य, मद्यनिवृत्ती आणि संस्कृती.’

हा त्या विशेषांकांचा विषय. थेट मुखपृष्ठावरच छापलेला. अगदी ठसठशीतपणे. बरेच दिवस या अंकाच्या शोधात होतो. ज्येष्ठ लेखक, स्वत: अनेकांगांनी चवीचवीनं जगण्याला भिडण्याचा अनुभव असलेले सातारचे विश्वास दांडेकर यांच्याशी बोलताना एकदा या अंकाचा विषय निघाला. त्यांचा आणि तर्कतीर्थाचा स्नेह होता, हे माहीत होतं. तेवढंच. नंतर चार-पाच दिवसांनी एक कुरियर आलं आणि आत हा अंक. तीसेक र्वष जुन्या लॅफ्रॉयचा घोट घ्यायला मिळावा, इतका आनंद झाला. बहारदार आणि तरीही प्रचंड अभ्यासू अंक आहे हा.

सुरुवातीलाच मेपुंची दीर्घ प्रस्तावना आहे. त्यात एकंदरच आपल्याकडे मध्यमवर्गीय संस्कृतीत मद्य या विषयाकडे कसं साशंकतेनं पाहिलं जातं, याचा ऊहापोह आहे. न पिणाऱ्यांचा म्हणून एक नैतिक गंड कसा तयार होतो, याचं उत्तम विवेचन आहे. एकूणच ऐहिक, भौतिक सुख म्हणजे कमीपणा हे समीकरण कसं आपल्या अंगवळणी पडलंय आणि त्याचा कसा दुष्परिणाम आपल्यावर होतोय याचे अनेक दाखले मेपुंनी दिलेत. त्यातला एक परिच्छेद संस्कृतिरक्षकांसाठी जसाच्या तसा उद्धृत करायला हवा. मेपुं म्हणतात – ‘‘अलीकडल्या काळात हिंदू समाजाने जोमदार, संपन्न, आत्मविश्वासपूर्ण असे ऐहिक जीवन उभारलेच नाही. आम्ही मद्य प्यालो नाही. पण प्रशस्त नगरेही उभारली नाहीत. आमच्या निसर्गाचे, वनस्पतींचे, पशू-पक्ष्यांचे कोडकौतुक केले नाही, सागरापार गेलो नाही, देशात तीर्थयात्रा केल्या पण प्रवास करून आमचा हा निसर्गसंपन्न देश पाहिलाही नाही. नागर जीवनात हरतऱ्हेच्या माणसांची संगत मिळण्याच्या ज्या संधी असतात त्यांचा लाभ घेतला नाही. सहजप्रेरणांवर आधारलेल्या व्यवहाराला उन्नत, प्रगल्भ, सुसंस्कृत स्वरूप देणाऱ्या प्रथा, संकेत संस्था उभारल्या नाहीत. साहित्य निर्माण केले नाही. ही शुचिता नव्हती, वैराग्य नव्हते; ही असमर्थता होती.’’

याइतकं परखड आणि प्रामाणिक आत्मपरीक्षण नसेल. मेपुं पुढे विविध ऐतिहासिक संदर्भ देत ऐहिक जीवनाकडे या भूमीतले लोक पूर्वी कसं पाहत होते, याचा विलक्षण सुंदर प्रत्यय आपल्याला देतात.

या अंकातला पहिलाच लेख आहे तो तर्कतीर्थाचा. ‘प्राचीन भारतीय संस्कृतीतील मद्यविषयक आचारसंहिता’ हे त्याचं शीर्षक. मद्य म्हणजे चंगळवादी, भोगवादी पाश्चात्त्यांनी भारतात आणलेले पाप असा एक अजागळ समज आपल्याकडे बऱ्याच जणांचा असतो. त्यातूनच मग गोमांस ते मद्य अशा अनेकांवर आपण बंदी घालत सुटतो. खरा इतिहास तसा नाही. खरं तर इतिहास तसा नाही, इतकंच म्हटलं तरी पुरे. परंतु आपल्याला ते पुरत नाही कारण इतिहासाचे अनेक सोयीस्कर अर्थ आपण लावतो आणि बहुमताच्या जोरावर अनेकांवर लादतो. इतिहासाला – त्याच्या अस्सल रूपात- भिडायची हिंमत आणि इच्छा असेल त्यांनी रामायण आणि महाभारत वाचलं तरी पुरे. असो. या लेखात तर्कतीर्थ असाच एक दाखला देतात. राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासाला निघतात तेव्हा प्रथम दुथडी भरून वाहणारी गंगा वाटेत आली. गंगापार होण्यासाठी तिघेही नौकेत बसले. पात्राच्या मध्ये नौका आली तेव्हा सीता गंगेला उद्देशून म्हणाली, हा माझा नरव्याघ्र नवरा पुन्हा राज्यावर सुखरूप परत आला म्हणजे मी सहस्रसुराघटांनी आणि मांसमिश्रित भाताच्या पक्वान्नाने तुझी पूजा करीन. त्याआधी बालकांडातल्या एका प्रसंगाचाही तर्कतीर्थ उल्लेख करतात. वसिष्ठ मुनींच्या आश्रमांत विश्वमित्र आले असता त्यांचा भव्य सत्कार वसिष्ठांनी केला. त्यांच्याकडे शबला नावाची कामधेनू होती. काय काय दिलं तिनं या सत्कारासाठी? ‘उंची मद्ये आणि विविध प्रकारची भक्ष्ये’ तिनं या ऋषीमुनींना पुरवली होती.

अत्यंत महत्त्वाचा असा संदर्भ आहे तो प्राचीन भारतीय संस्कृतीतील मद्य प्रकारांचा. तर्कतीर्थ त्याविषयी माहिती देताना विष्णुधर्मसूत्रं उद्धृत करतात. या सूत्रांत दहा प्रकारची मद्यं सांगितली आहेत. जिज्ञासूंनी ती माहीत करून घ्यायला आणि शक्य झाल्यास अर्थातच चाखायलाही हवीत. हे दहा प्रकार असे. माधुक (मोहाच्या फुलांचे), ऐक्षव (उसाच्या रसाचे), टांक (कवठाचे), कौल (बोर किंवा बोरासारख्या फळाचे), खार्जुर (खजुरांचे), पानस (फणसाचे), मृद्वीक (द्राक्षाचे), माध्विक (मधाचे), मैरेय (एका विशिष्ट वृक्षाच्या फुलाचे वा मीरा नदीकाठच्या प्रदेशातले) आणि ताल (म्हणजे ताडी). असे हे दहा प्रकार.

पुढे एके ठिकाणी तर ते चरक संहितेचाही उल्लेख करतात. त्यातला एक श्लोक या लेखात आहे. तो असा.

किंतु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम।

अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथारमृतम्।।

आपल्या अनेक वाचकांना याचा अर्थ लागणार नाही, याची पूर्ण खात्री असल्यानं तर्कतीर्थ पुढे या श्लोकाचा अनुवाद करून सांगतात, ‘‘परंतु स्वभावत: जसे अन्न तसे मद्य होय. ते अयोग्य रीतीने घेतल्यास रोगकारक व योग्यरीतीने घेतल्यास अमृत होते.’’ इतकंच नाही तर चरक, सुश्रुत, अष्टहृदय, अष्टांगसंग्रह अशा प्रमाणित ग्रंथांनी कोणत्या ऋतूत कोणते मद्य प्यावे याचा दिलेला सल्लाच शास्त्रीबोवा उद्धृत करतात तेव्हा अचंबित होण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्यायच राहत नाही.

खुद्द मेपुंचाही या अंकातला लेख अप्रतिम या विशेषणाची मर्यादा दाखवून देणारा आहे. ‘स्थल, काल, जीवन आणि मद्य’ हे त्याचे शीर्षक. तर्कतीर्थ प्राचीन भारतीय पुराणसंदर्भाचं उत्खनन करतात तर मेपुं आपल्या लेखात पाश्चात्त्य जीवनेतिहासाचे मुबलक प्रसंग नमूद करतात. युरोप, अमेरिकादी प्रांतांत कित्येक विशिष्ट स्थळी आणि काळी बहरलेल्या अशा जीवनसरणीचे अनेक नमुने ते आपल्या लेखात देतात.

लेखाची सुरुवातच सॉक्रेटिसपासून होते. फिलीप, कालियस, सॉकेट्रिस, अ‍ॅटॉलिकस अशांचा एक प्रसंग इतका बहारदार आहे की त्यासाठी तरी निदान काहींना ग्रिकांचा इतिहास वाचायची इच्छा व्हावी. व्हर्जिनिया, अटलांटा, ऑक्सफर्ड अशा अनेक ठिकाणचा मद्येतिहास मेपुं मोठय़ा रसाळपणे पेश करतात.

त्यातला एक संदर्भ द्यायलाच हवा.

अलीकडे विद्वान, अभ्यासक मंडळी मोठय़ा अभिमानाने सांगत असतात, अमुक एका सिम्पोझियमचं मला निमंत्रण आहे, तमुक सिम्पोझियममध्ये माझा शोधनिबंध वाचला गेला वगैरे. काय आहे या सिम्पोझियमचा अर्थ?

सिम्पोझियम म्हणजे सहपान आणि सहपानामुळे रंगात आलेल्या सोबत्यांत झालेली दिलखुलास चर्चा. पार प्लेटोपासूनची उदाहरणं देत मेपुं आपल्या लेखात या सहपानाचं महत्त्व विशद करतात.

हे सगळं आजच सांगायचं यामागेही काही कारण आहे. आजच्या वर्षांखेरी मुहूर्तावर अनेक पर्यटनस्थळी, इमारतींच्या गच्चींवर, अथवा किमानपक्षी आपापल्या दिवाणखान्यात सुहृदांच्या साक्षीनं नववर्ष स्वागतासाठी चषक किणकिणतील. त्याबद्दल अनेकांच्या मनात नंतर आपण काही चूक केल्याची भावना दाटून येईल. तर त्यांनी तसं काही वाटून घेऊ नये. आपण सिम्पोझियमला आलेलो आहोत असं समजून आपला चषक बेलाशक रिकामा करावा.

या सहपानाचा सहजानंद सुहृदांच्या सहवासात सुसंस्कृत संयमितपणे कसा घ्यावा हे कळावं, म्हणूनच.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symposium meaning
First published on: 31-12-2016 at 03:54 IST