कबीरजी दुसऱ्या दोह्य़ात सांगतात, ‘आये हैं सो जायेंगे, राजा रंक फकीर। एक सिंघासन चढिम् चले, इक बाँधे जात जँजीर।।’ या जगात जो जन्मला तो मरणारच. मग तो राजा असो, रंक म्हणजे गरीब असो की फकीर अर्थात भगवंताच्या प्रेमाच्या नशेतच जगणारा त्याचा अनन्य भक्त असो! मृत्यू प्रत्येकालाच आहे. फरक इतकाच की मृत्यूनंतर फकीर सिंहासनावर आरूढ होतो तर राजा असो वा रंक, बापडे बेडय़ांमध्येच अडकून राहातात. आता हे सिंहासन आहे ते मुक्तीचं आणि या बेडय़ा आहेत त्या प्रारब्धाच्या. या बेडय़ा हातात आहेत त्यामुळे पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू.. पुनरपि जननं पुनरपि मरणं, हे आहेच.   आता खरं पाहाता जगत असतानादेखील राजा आणि रंक हे बेडय़ात जखडूनच असतात तर फकीर, भगवंताचे अनन्य भक्त, संत हे मुक्तीच्या सिंहासनावरच विराजमान असतात. या जगात वावरताना राजाला जसा प्रपंच असतो, रंकाला जसा प्रपंच असतो , राजा आणि रंक जसे आपापल्या प्रापंचिक जबाबदाऱ्याही पार पाडताना दिसतात तसाच भगवंताच्या अनन्य भक्तालाही प्रपंच असतो, तोदेखील प्रपंचाची कामे करताना दिसतोच. प्रत्यक्षात राजा आणि रंक त्यांचे प्रारब्ध भोगत असतात, अतृप्त इच्छा आणि वासनांचा प्रभाव राजा आणि रंक, या दोघांवर असतो. दोघे आपापली चिंतेची बोचकी सांभाळतच जगत असतात. संत किंवा अनन्य भक्ताचं जगणं हे इच्छारहित आणि वासनारहित असतं, चिंतेचं गाठोड त्यानं कधीच भगवंताकडे देऊन टाकलं असतं! प्रपंचात तो त्याच्या वाटय़ाला आलेली भूमिका केवळ पार पाडत असतो पण त्याचं खरं लक्ष, त्याची खरी ओढ ही केवळ भगवंताकडे असते. आपल्यासारखे प्रापंचिक प्रपंचाच्या बेडीत अडकलेलेच असतात तसाच संतही प्रपंचात दिसतो, पण कसा? श्रीगोंदवलेकर महाराजांनी फार मार्मीक रूपक सांगितलं आहे. एका चोराला पोलिसानं बेडय़ा ठोकल्या आहेत. बेडीचं एक कडं चोराच्या हातात आहे तर बेडीचं दुसरं कडं पोलिसाच्या हातात आहे. म्हणजेच दोघांच्याही हातात बेडी आहे. पण रस्त्यानं चालताना पोलीस रुबाबात चालत असतो तर चोर हा दबूनच चालत असतो. पोलिसाच्या मनात बेडीचं भय नसतं तर चोराच्या मनात बेडीचं भय असतं. पाहाणारे दोघांनाही बेडीतच पाहात असतात पण बेडीतला चोर कोण आणि पोलीस कोण, हे त्यांना समजतच असतं. अगदी त्याचप्रमाणे संताचा प्रपंच आणि आपल्यासारख्याचा प्रपंच यात फरक असतो. प्रपंचाच्या भारानं आपण दबून असतो तर संत हा निर्भयतेनं प्रपंचात वावरत असतो. त्या प्रपंचाचं दडपण त्याच्यावर नसतं. त्याचं जगणं बंधनरहित असतं. मुक्त असतं. तो दुखात आहे, तो बंधनात आहे असं आपण मानतो प्रत्यक्षात तो आतून एकरसात, परमात्म्याच्या प्रेमातच निमग्न असतो. या मुक्तीचं सुख जगतानाच जिवानं भोगावं, ही त्याची एकमेव कळकळ असते. आता ही मुक्ती म्हणजे काय हो?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onदेवGod
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aroopache roop satyamargadarshak
First published on: 16-11-2012 at 12:59 IST