घट घट में वहि साई रमता, कटुक बचन मत बोल रे! इथे ‘बचन’ म्हणजे निव्वळ बोलणं असाही अर्थ नाही. तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्याद्वारे जगाबरोबर माझा जो व्यक्त व्यवहार आहे, तो सर्वच ‘बचन’मध्ये समाविष्ट करता येईल. थोडक्यात जगाबरोबर व्यवहार करताना हे जग परमात्म्यानं भरून आहे याचं भान बाळगण्याचा हा अभ्यास आहे. आता इथे एक सूक्ष्म गोष्ट मात्र ध्यानात घेतली पाहिजे. जगात वावरताना मला माझ्या वाटय़ाला जी जन्मदत्त भूमिका आली आहे तिच्यानुरूपच वागावं लागतं. आईला मुलाला ओरडावंच लागतं, कधीकधी फटकाही मारावा लागतो, मालकाला नोकराशी कधीकधी कठोर व्हावंच लागतं, इत्यादि इत्यादि. म्हणजेच जगात वावरताना माझ्या जबाबदारीनुरूप, कर्तव्यानुरूप, परिस्थितीनुरूप आवश्यक ती भूमिका घ्यावी लागते. जगात वावरताना मतभेद, वाद, भांडणं ही अटळच असतात. अनेकांना स्वाभाविकपणे असंही वाटेल  की, जगात सर्वत्र तोच भरून आहे म्हणून कुणाशीच मतभेद व्यक्त करायचे नसतील, भांडायचं नसेल तर मग जगणंही कठीणच होईल. काहींच्या मनात येईल, मी भले जगाला परमात्मरूप मानून वागेन पण जग तसे वागेल का? जग आपली कटुता सोडेल का? उलट ते अधिक धूर्तपणे व्यवहार करणार नाही कशावरून? काही तर बिनतोड युक्तिवाद मांडतील की, सर्व जग जर परमात्मरूपच असेल तर मग मीदेखील त्याचाच तर भाग आहे. मग ‘मी’ जगाला परमात्मरूप मानून त्याच्याशी वाईट वागणारा कोण? परमात्माच आपलाच आपणाशी भांडत आहे, असे का मानू नये? तर हे सारे युक्तिवादही विचारात घेऊन कबीरांच्या सांगण्याचा जो खरा हेतू आहे, त्याचाही मागोवा घेऊ. जग कसं आहे? आपण अनेकवार हे पाहिलं की जग हे स्वार्थकेंद्रित आहे आणि त्यात नवल वाटावं, असं काही नाही. कारण या जगाचा लघुत्तम साधारण घटक ‘मी’च आहे आणि मीदेखील स्वार्थकेंद्रितच आहे. तेव्हा जग हे स्वार्थकेंद्रित आहे. जो तो सुखाचा सोबती आहे. या जगातील मैत्री आणि शत्रुत्वाचा आधार स्वार्थ हाच आहे. पण जगाचं हे खरं रूप आहे का? या जगात जन्मलेला प्रत्येक जीव अखंड आनंद, अखंड समाधान, अखंड शांती यासाठीच तर धडपडतो आहे. प्रत्यक्षात प्रत्येकावर स्वार्थाचा इतका लेप चढला आहे की निस्वार्थ प्रेमाची, निस्वार्थ व्यवहाराची कल्पनाही कुणाला येत नाही. पण माणूस स्वत: दुसऱ्यावर निस्वार्थ प्रेम करीत नसला तरी त्याला दुसऱ्यानं आपल्यावर निस्वार्थ प्रेम करावं, अशी आस आहे. तो स्वत: दुसऱ्याशी निस्वार्थ व्यवहार करीत नसला तरी दुसऱ्यानं आपल्याशी निस्वार्थ व्यवहार करावा, अशी त्याला आस आहे. पण जसा मी तशीच दुनिया. ती निस्वार्थ व्यवहार करू शकत नाही आणि स्वार्थाने तशी अपेक्षा बाळगणारा मी या दुनियेशी संघर्ष करण्यात अधिकच गुंतून पडतो. मग अशा या दुनियेच्या कणाकणात भगवंत विराजमान आहे म्हणजे काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satya margadarshak256 world and i
First published on: 21-11-2012 at 11:34 IST