आपल्या देशातल्या, कानपूरहून निघणाऱ्या ‘द डेली गार्डियन’ला नेमकी किती वर्षं झाली हे जरी गुलदस्त्यात असलं; तरी इंग्लंडमधलं ‘द गार्डियन’ हे वृत्तपत्र २०० वर्षांचं झालंय हे नक्की! ‘द मँचेस्टर गार्डियन’ या नावानं १८२१ सालच्या ५ मे रोजी या वृत्तपत्राचा पहिला अंक निघाला होता आणि पुढे लंडनला या दैनिकाची मुख्य कचेरी झाली, तिथून ‘द गार्डियन’ निघू लागलं. इंग्रजी पुस्तकांबद्दल दररोज निरनिराळ्या बातम्या देणारा दर्जेदार ऑनलाइन स्रोत म्हणून ‘बुकबातमी’ या सदराला ‘द गार्डियन’बद्दल ममत्व आहेच. पण ते व्यक्त करण्याची संधी मात्र ‘कॅपिटालिझमस् कॉन्शन्स : २०० इयर्स ऑफ द गार्डियन’ या पुस्तकामुळे मिळते आहे! विविध माध्यम-अभ्यासकांचे निबंध असं या पुस्तकाचं स्वरूप आहे आणि लंडनच्या गोल्डस्मिथ्स कॉलेजातले माध्यम-अभ्यास प्राध्यापक डेस फ्रीडमन हे या पुस्तकाचे संपादक. हे पुस्तक ‘द गार्डियन’नं विविध विषयांवर घेतलेल्या वा बदललेल्या भूमिकांची छाननी करतं. ‘पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ द गार्डियन’ हे प्रकरण जरा निराळं, कारण व्यवसाय आणि समाजभान यांचा तोल ‘द गार्डियन’नं गेल्या २०० वर्षांत कसकसा सांभाळला, याचा इतिहास त्यात येतो. दक्षिण अमेरिकी देशांच्या अस्मिता व तिथल्या राजवटींचं डावं वळण वा इस्राायलची निर्मिती आणि तिथपासूनच सुरू झालेला इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष यांबाबतचे दोन लेख थोडे जंत्रीवजा आहेत, पण ‘स्त्रियांचे पान’विषयक लेख हा मात्र मुळात अख्खं वर्तमानपत्रच स्त्री-पुरुष दोघांसाठी असताना स्त्रियांसाठी ‘बायकी विषयांचं’ पान कशाला हवं होतं, इथपासून सुरू होतो! स्त्रीवादाचा उदय आणि विकास ‘द गार्डियन’नं पाहिला, त्यासोबतच ते वाढलं, याचा आढावा आणखी एका लेखात येतो. एडवर्ड स्नोडेननं अमेरिकी परराष्ट्र खात्याला विविध देशांतल्या अमेरिकी दूतांनी पाठवलेले गुप्त संदेश उघड केले, याकामी ‘द गार्डियन’चा पुढाकार होता. त्यावर ‘पाळतीच्या युगात ‘द गार्डियन’ व ‘हॅकिंगची पत्रकारिता’ अशा आशयाचे लेख आहेत. हे पुस्तक म्हणजे गौरवग्रंथ नाही; तरीही- भांडवलशाहीला भानावर आणण्यासाठी ‘द गार्डियन’चा उदारमतवादी समाजवाद कसा उपयोगी पडला, असा एकंदर सूर आहे. त्यावर टीकाही आतापासूनच सुरू झालीय. सीरिया- लिबिया- इराक इथल्या संघर्षांबाबत ‘द गार्डियन’ची भूमिका गोंधळलेलीच होती, याची चिकित्सा या पुस्तकात का नाही, असे प्रश्नही विचारले जाऊ लागलेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 years of the guardian akp
First published on: 15-05-2021 at 00:12 IST