सातवी-आठवीतल्या मुलांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांना आवडेल, असं हे पुस्तक तात्त्विक विचर करण्याची सवय वाचकांना लागावी, यासाठी प्रयत्न करतं. वाचायला वेळ नसणाऱ्यांसाठीच त्याची रचना झाली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुस्तकाच्या नावातला ‘फिलॉसॉफिकल’ हा शब्द वाचून दचकायचं नाही.. पृष्ठसंख्या २९० असल्याचं पाहून ‘हल्ली एवढं वाचायला वेळ नसतो’ वगैरे कारणंही द्यायची नाहीत..  किंबहुना तुम्ही दचकणार होतात, तुमच्याकडे वेळ नसल्याची कारणं आधीपासूनच होती, हे पूर्ण लक्षात ठेवून मगच हे पुस्तक लिहिलं गेलंय. त्याची रचनादेखील ‘जमेल तेवढं वाचा’, ‘मधलंच कुठलंतरी पान कधीतरी उघडून वाचायला सुरुवात करा’ असा आग्रह करणारी आहे. हे तर काहीच नाही.. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाबद्दलचं पुस्तक वाचण्याआधी खरं तर तुम्हाला  गाजलेलं पाश्चात्त्य साहित्य वाचायचं होतं.. होय ना? मग तर हे पुस्तक तुमच्याचसाठी आहे!

पुस्तकाचं उपशीर्षकच पाहा ना.. ‘अ कलेक्शन ऑफ  पझल्स, ऑडिटीज,  रिडल्स अँड डायलेमाज’ .. कोडी, किस्से आणि कूटप्रश्नांचा गुच्छ! या पुस्तकाला प्रकरणं नाहीत, तरीही प्रत्येक कोडय़ा-किश्शाला प्रकरणासारखं शीर्षक वगैरे आहे आणि मुख्य म्हणजे अनुक्रमणिकेत या सर्व शीर्षकांना पृष्ठ क्रमांकानिशी  स्थान आहे.  त्यामुळे उदाहरणार्थ, तीन ‘लेख’ १७ व्या पानावरच आहेत असं दिसेल, किंवा या पुस्तकातला सर्वात मोठा, पाच कोडी घालणारा लेख पावणेपाच पानी आहे, हेही लक्षात येईल.

पण एकदा वाचायला घेतलंत की मग हयगय नाही करायची. लक्षपूर्वकच वाचायचं. कारण इथं, या कोडय़ांच्या, किंवा कूटप्रश्नांच्या शेवटी वाचकांच्या बुद्धीला आवाहन करणारे प्रश्नही आहेत.  काही वेळा तर कुठे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवूच अशा भ्रमात  राहिलात तर भ्रमाचा भोपळा फुटण्याचीही शक्यता आहे. ‘‘तुम्ही एका अशा खोलीत आहात जिला दरवाजे वा खिडक्या नाहीत.  तुम्ही बाहेर कसे पडाल?’ (पृ. ६४) इतकाच, अवघा दोन ओळींच्या प्रकरणातला जो कूटप्रश्न आहे, त्याचं उत्तर मात्र तीन (छोटय़ा) परिच्छेदांचं आहे. लुडविग विटगेन्स्टाइन याच्या ‘मेटाफिलॉसॉफी’चं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रश्न, अशी माहिती हे उत्तर देतं. उत्तर चक्रावणारंच आहे: दारं-खिडक्या नाहीतच, पण  ‘खिडकी’ किंवा ‘दार’ अशा बांधीव वस्तूंचा अभाव असलेली ही खोली कुठल्याही आत-बाहेर येण्या-जाण्याच्या सोयीविनाच आहे, हे कुणी सांगितलं हो तुम्हाला ? जिथं भिंत नाही तिथून पडा की बाहेर! ‘तुम्ही तुम्हाला परिचित असलेल्या भाषेच्या- परिचित शब्दार्थाच्या तुरुंगात राहात असता.. तिथून बाहेर पडा आणि संकल्पना पाहा’ असं उत्तरात नमूद करणाऱ्या या छोटेखानी प्रकरणाचं नावच ‘भाषेची कैद-कोठडी’ असं आहे.

म्हणजेच, पुस्तक वाचताना तुम्ही आता संकल्पनांच्या अवकाशात उडायचं आहे.  टॉलस्टॉय, डेव्हिड किंवा ऑस्कर वाइल्ड या लेखकांचे किस्से तुम्ही मराठीतही  यापूर्वी वाचले असतील; पण त्यापैकी अनेक किस्साकथनांची मजल ‘असे होते ऑस्कर वाइल्ड!’ छापाच्या चरित्रनायक-कौतुकापल्याड जात नाही. ती जावी, तुमची समज वाढावी, असा आटोकाट प्रयत्न हे पुस्तक करतं. इथं ऑस्कर वाइल्डविषयीच्या ‘असत्याला अवकळा’ या किश्शात, (पृ. २१८) सिरिल आणि व्हिवियन या दोघांचा सुमारे २५० शब्दांचा संवादच दिलेला आहे. त्यातून ऑस्कर वाइल्डला सत्याइतकंच असत्याचं आकर्षण होतं आणि त्यामागे ‘नेहमीच्या’ ऐवजी ‘निराळय़ा’ची आस त्याला होती, हे आपण जाणून घ्यायचं. यातला व्हिवियन (हे पुरुषपात्र आहे) म्हणतो : राजकारणी खोटं बोलतात असं म्हणतोस सिरिल तू, पण तेसुद्धा सत्याचं ‘गैर-प्रतिनिधित्व’ करण्याच्या पलीकडे, शुद्ध ‘असत्या’कडे जातच नाहीत! आजकाल वृत्तपत्रंही खरीच मानली जाऊ लागली आहेत.. असत्य आता कलेतच असायला हवं, यासाठी माझा सारा युक्तिवाद आहे..’

ऑस्कर वाइल्डची नाटकं किंवा त्याचं कोणतंही लिखाण वाचणाऱ्यांना, प्रेक्षकांच्या सदसदविवेकबुद्धीला त्यानं अगदी मुळातूनच आवाहन केलंय, हे सतत जाणवतं. ते तुम्हाला अडीचशे शब्दांतून जाणवून देण्याची ही सोय आहे.

हे पुस्तक असंच का आहे? का आहेत यात किस्से? सरळ गंभीर नसतं का लिहिता आलं हेच सारं?

कदाचित हो. पण एकतर गंभीर बरंच लिहून झालंय. आणि लहान मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत साऱ्यांना तत्त्वज्ञानाची गोडी लागावी, याचा ध्यास घेतलेल्या रॉफ सोरेन्सेनसारख्या लेखकानं लिहिलंय. ‘खरा तत्त्वज्ञ तोच, ज्याला त्याचा नवा कूटप्रश्न भावतो.. तसा नाही भावला तर तो तत्त्वज्ञ नव्हेच- तो तर तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक’ हे खुसखुशीत कटू सत्य त्यांनी एका (थ्री एम मॅगेझीनसाठी रिचर्ड मार्शल यांना दिलेल्या) मुलाखतीत सेंट लुईस इथल्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात ते प्राध्यापक असले, तरी त्यांनी आजवर लिहिलेली सर्व (‘ब्लाइंडस्पॉट’, ‘थॉट एक्स्पेरिमेंट्स’, ‘स्यूडो-प्रॉब्लेम्स’, ‘व्हेगनेस अ‍ॅण्ड काँट्रॅडिक्शन’, ‘अ ब्रीफ हिस्टरी ऑफ द पॅराडॉक्स’ आणि ‘सीइंग डार्क थिंग्ज’ अशी सहा) पुस्तकं ही लोकांपर्यंत सोपेपणानं तत्त्वज्ञान पोहोचावं, याच हेतूनं सिद्ध झालेली आहेत. ‘सोपेपणा’मध्ये वाचकावर आळशीपणाचा आरोप अजिबात केलेला नाही, पण वाचकाचा ‘अटेन्शन स्पॅन’ किंवा त्याची ‘चित्त’क्षमता कमी झाल्याचं गृहीत धरलेलं आहे.

एखादी गोष्ट चित्तपूर्वक केली जात नाही, यामागे अनेक कारणं असतात. वेळ कमी असल्याची विनाकारण जाणीव, जगासोबत राहण्याच्या हौसेपायी झालेली कुतरओढ, ‘स्मार्ट’ ठरण्याकडेच लक्ष पुरवताना आत्मिक आनंदाची होणारी ससेहोलपट.. वगैरे. पण ‘यातूनही आपण काढूयात ना काहीतरी मार्ग, तुम्ही फक्त पाचेक मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या’ असा दिलासा हे पुस्तक देतं.  ‘म्हणून’ या गणिती चिन्हाचा पहिला छापील वापर १६५९ सालात, योहान राह्न् यानं बीजगणितावर लिहिलेल्या जर्मन पुस्तकात सापडतो, याचा शोध ‘अ हिस्टरी ऑफ मॅथेमॅटिकल नोटेशन्स’ या पुस्तकात फ्लोरिआन कजोरी यांनी घेतल्याची ‘रंजक माहिती’ देतानाच, गणितामधलं  ‘पॅलिन्ड्रोमिक ऑग्र्युमेंट’ (विलोमपदी विधान : भाषेतलं उदाहरण- ‘भाऊ तळय़ात उभा’) हे गणिती भाषेतही किती सोपं आहे हे रॉय सोरेन्सेन आपल्याला सांगतात आणि तिथंच पुढे गणित, भाषा, काव्य, पिरॅमिडसारखी वास्तुरचना.. या साऱ्याचाच संबंध कसा आहे याचीही जाणीव देतात!

जगज्जेता अलेक्झांडर, नेपोलियन बोनापार्ट, थॉमस कार्लाइल, राय ब्रॅडबरी आणि वॉल्ट डिस्ने या ‘यशस्वी पुरुषां’ची विधानं नोंदवून ‘एनीथिंग इज पॉसिबल?’ ( पृ. ८६) या प्रकरणात ‘खरोखरच ‘काहीही शक्य आहे’ का?’ असा कूटप्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर, ‘नाही’ असंच आहे. पण त्यासाठी लेखक आधार घेतो, तो आध्यात्माचा नाही, पुन्हा मानवी शक्यतांचाच.

पुस्तक बौद्धिक कोडी-किश्शांचं आहे, पण म्हणून ते फक्त मुलांसाठी (म्हणजे साधारण सातवी ते अकरावी इयत्ता) आहे असं समजण्याचं कारण नाही.. ते मोठय़ांसाठीही आहे. ‘तात्त्विक विचार करण्याची सवय’ लावणं, हे या पुस्तकाचं खरं ध्येय आहे. ते एकाच पुस्तकातून साध्य होईल असं नव्हे. चिनी, अरबी तत्त्वज्ञानाच्या इतिहासातली उदाहरणं देखील इथं आहेत खरी; पण या पुस्तकाचा भर साहजिकच पाश्चात्त्य उदाहरणांवर आहे. त्यामुळेच पाश्चात्त्य किंवा युरोपीय लेखकांबद्दल बरीच माहिती ओघानं येते. पुस्तकाचा आणखी एक मोठा विशेष म्हणजे, ते कोणत्याही धर्माला, आध्यात्मिकतेला प्राधान्य देत नाही. पुस्तकाला सांगायचं आहे, ते केवळ आधुनिक आणि ‘आजच्या’ तत्त्वज्ञानाबद्दल. त्यातली उदाहरणं भले प्लेटो किंवा कन्फ्यूशियसची असतील, पण आजचेपणा- समकालीनत्व हे आजच्या वाचकांना तात्त्विक विचार करण्याची सवय लावण्याच्या ध्येयासाठी महत्त्वाचंच आहे, हे लेखकानं ध्यानात ठेवलेलं दिसतं.

‘तात्त्विक विचार’ म्हणजे काय, असा प्रश्न एव्हाना पडला असेल. या पुस्तकातल्या , ‘भारतीय वादसभा’ – ‘द इंडियन डिबेट टूर्नामेंट’ या प्रकरणातल्या प्रश्नाचं उदाहरण त्यासाठी घेऊ. २९ विद्वान एका वादसभेसाठी जमले. प्रत्येकानं एकाशी वाद करायचा आहे. त्यातून अंतिम विजेता निवडला जाणार आहे. तर वादाच्या किती फेऱ्या होतील? याचं उत्तर २८ असं देताना लेखक गणित करण्याऐवजी म्हणतो, ‘स्पर्धक २९ आहेत आणि विजेता एकच असणार आहे, म्हणजे प्रत्येक फेरीत एकाला हरावंच लागणार, म्हणजे २८ फेऱ्या’!  हे गणित नाही. गणितामागचा विचार आहे.

  • अ कॅबिनेट ऑफ फिलॉसॉफिकल क्युरिऑसिटीज- अ कलेक्शन ऑफ पझल्स, ऑडिटीज, रिडल्स अँड डायलेमाज
  • लेखक : रॉय सोरेन्सेन
  • मूळ प्रकाशक : प्रोफाइल बुक्स, लंडन
  • भारतातील वितरक : हॅचेट इंडिया
  • पृष्ठे: २९०, किंमत : ५९९
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A cabinet of philosophical curiosities
First published on: 05-11-2016 at 02:48 IST