ऐतिहासिक खुणा मिरवणाऱ्या जयपूरमध्ये ‘जयपूर लिट फेस्ट’ या नावाने ओळखला जाणारा वार्षिक साहित्य महोत्सव जानेवारीच्या अखेरीस बोचऱ्या थंडीत पार पडण्याचा शिरस्ता १४ वर्षे पाळला गेला. परंतु करोना महामारीने इतर अनेक शिरस्त्यांना दूर ठेवण्यास भाग पाडले, त्यास जयपूरचा हा साहित्यमेळाही अपवाद नाही. पण याचा अर्थ जयपूरचा हा साहित्यमेळा यंदा होणार नाही असा नव्हे. यंदा हा साहित्यमेळा आयोजित केला जाणार आहेच आणि तोही तब्बल दहा दिवस चालणार आहे. दरवर्षीप्रमाणे जयपुरातल्या दिग्गी पॅलेसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून तो अनुभवता येणार नसला, तरी ऑनलाइन अर्थात दूरस्थ पद्धतीने  त्यात सहभागी होण्याची संधी सर्वाना आहे. १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या दूरस्थ साहित्यमेळ्यात शंभराहून अधिक मान्यवर साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक तब्बल १३२ सत्रांतून सहभागी होतील. प्रसिद्ध विचारवंत नोम चॉम्स्की हे त्यांपैकी एक. २१ फेब्रुवारीला होणाऱ्या सत्रात ते जगाची सत्ता कोणाच्या हाती, याचा उलगडा करतील. तर कादंबरीकार डग्लस स्टुअर्ट हे त्यांच्या २०२० सालच्या बुकर पुरस्कारप्राप्त ‘शगी बेन’ या कादंबरीची निर्मितीप्रक्रिया सांगतील. शशी थरूर, विल्यम डॅलरिम्पल, पवन के. वर्मा हे नेहमीचे चर्चक यंदाही विविध सत्रांत आहेतच. पण संगीत आणि समकाळ यांचा सांधा जोडणारे शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा यांचे सत्र, पौर्वात्यवादाचे भाष्यकार होमी के. भाभा यांचे नव-राष्ट्रवादाची उलटतपासणी घेणारे सत्र, इतिहासकार रिचर्ड ईटन यांचे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा भारतीय इतिहास मांडू पाहणारे सत्र ही यंदाच्या जयपूर साहित्यमेळ्यातील प्रमुख आकर्षणस्थळे म्हणता येतील. अन्य अनेक कार्यक्रमांतूनही समकाळाची स्पंदने टिपणाऱ्या जयपूर साहित्यमेळ्यात दूरस्थ पद्धतीने सहभागी होण्यासाठीची माहिती jaipurliterature festival.org या संकेतस्थळावर मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book batmi article on jaipur lit fest abn
First published on: 06-02-2021 at 00:00 IST