अलीकडे दिल्ली व पश्चिम बंगाल ही नावे जोडीने बातम्यांमध्ये झळकू लागली आहेत. त्यास पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे; पण या ‘बुकबातमी’शी त्याचा काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. तर तसा प्रादेशिक संबंध जोडता येईल अशी बातमी अलीकडेच येऊन धडकली ती थेट दिल्लीतूनच! राजधानीतील ‘नियोगी बुक्स’ या दीड दशकापूर्वी सुरू झालेल्या प्रकाशनसंस्थेकडून ती जाहीर झाली आहे. मुख्यत: निवडक, अनवट जागतिक साहित्याची अनुवादित पुस्तके देणारी संस्था म्हणून ओळख मिळवणारी ‘नियोगी बुक्स’ ही संस्था दोन वर्षांपूर्वी कोलकत्याकडे वळली. तिथल्या प्रसिद्ध कॉलेज स्ट्रिटवर ‘नियोगी बुक्स’ने आपले पुस्तकविक्री दुकान थाटले. त्या माध्यमातून कोलकत्याच्या वाचनव्यवहारात या संस्थेची दमदार पावले पडू लागली आहेत, हे दाखवून देणारी बातमी ‘नियोगी’कडूनच जाहीर झाली. बातमी अर्थातच नव्या पुस्तकाची. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निवर्तलेले बंगाली अभिनेते-कवी सौमित्र चटर्जी यांच्यावरील ‘सौमित्र चटर्जी :  अ लाइफ इन सिनेमा, थिएटर, पोएट्री अ‍ॅण्ड पेंटिंग’ हे चरित्रपर पुस्तक ‘नियोगी बुक्स’कडून चटर्जीच्या जन्मदिनी- १९ जानेवारी रोजी वाचकार्पण केले जाणार आहे. सत्यजित राय यांच्यासारख्या विचक्षण दिग्दर्शकाने आपल्या तब्बल १४ सिनेमांत सौमित्र चटर्जीना संधी दिली अन् चटर्जीनीही त्या संधींचे सोने केले. पश्चिम बंगालबाहेर चटर्जीची ओळख प्रामुख्याने या सिनेमांभोवतीच रेंगाळते. मात्र चटर्जीवर बंगाली रंगभूमी अधिक वास्तववादी, निसर्गवादी करणारे सिसीरकुमार भादुरी यांचाही प्रभाव होता. त्यामुळेच तिथल्या रंगभूमीवरही चटर्जी कार्यरत राहिले. उत्तम कविता त्यांनी लिहिल्याच, शिवाय चित्रेही रेखाटली. त्यांच्यातल्या या बहुआयामी प्रतिभेस बंगाली आधुनिकतेचा गडद स्पर्श होता तो कसा, हे सांगणे हा अर्जुन सेनगुप्ता आणि पार्थ मुखर्जी यांनी लेखन-संपादित केलेल्या या पुस्तकाचा हेतू. चटर्जीच्या निमित्ताने आधुनिकतेची पुनर्चर्चा बंगालमध्ये घडावी, याचा आगामी निवडणुकीशी संबंध कोणी का जोडावा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book batmi article on soumitra chatterjee abn
First published on: 16-01-2021 at 00:04 IST