‘माझं आयुष्य तसं आरामाचं होतं. अगदी हे पुस्तक लिहायलासुद्धा मला फोर्ड फाऊंडेशनची पाठय़वृत्ती मिळाली’ – असं प्रांजळपणे सांगणाऱ्या अर्थतज्ज्ञ देवकी जैन यांच्या स्मृतिचित्रांचं ‘द ब्रास नोटबुक’ हे पुस्तक ३ ऑक्टोबरला प्रकाशित झालं (८ तारखेपर्यंत ते मुंबईत आलं नव्हतं). त्या कबुलीचे बरेच अर्थ काढता येतील आणि ‘फोर्ड फाऊंडेशन’चं नाव काढल्याबरोब्बर सर्व संबंधितांकडे संशयानंच पाहाण्याची उबळही काहींना येईल. पण फोर्ड फाऊंडेशनच्या देणगीचा एक सरळ अर्थ असा की, ‘अर्थशास्त्रज्ञ’ म्हणून जगताना स्त्री असणं हे काय असतं, याची आत्मकथा जर देवकी जैन यांनी मांडली, तर तिला महत्त्व नक्की आहे. देवकी जैन यांना भारतीय स्त्रीवादी अर्थशास्त्रविचाराची पायाभरणी करण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांच्या याआधीच्या पुस्तकाचं नाव ‘जर्नी ऑफ अ सदर्न फेमिनिस्ट’ असं – म्हणजे आत्मपर म्हणावं असंच होतं. मग एवढं काय असेल या नव्या पुस्तकात?

एक तर, यापूर्वीचं ‘जर्नी..’ हे पुस्तक देवकी यांच्या संस्थागत किंवा सार्वजनिक जीवनाचा प्रवास दूरान्वयानं मांडणारं होतं आणि त्यात स्वत:च्या भावनिक आयुष्याबद्दल लिहिणं काटेकोरपणे टाळलेलं होतं. ‘ब्रास नोटबुक’ मध्ये मात्र सुखवस्तू घरातलं माणूस म्हणून मिळालेली मोकळीक, स्त्री म्हणून कर्तबगारी दाखवताना आलेले कडूगोड अनुभव, नवरा, वडील, भाऊ, दोन्ही मुलगे, मैत्रिणी.. यांबद्दलचं लिखाण आहे. यातल्या मैत्रिणी अनेक प्रकारच्या आहेत. अरुणा असफअली, कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यासारख्या ज्येष्ठ स्त्रिया, रोमिला थापर यांच्यासारख्या समकालीन आणि अनेक निनावी मैत्रिणी, ज्या स्त्रीचा जीवनानुभव कसा असतो हे सांगून गेल्या. नवरा, मुलं, संसार यांबद्दल लिहिताना ‘मला काही वेळा नको जीव होई.. खरंच आत्महत्येचे विचार येत’ असंही देवकी जैन लिहून जातात!

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

पुस्तकातला अधिक वेगळा भाग हा युरोपात शिकताना त्यांना आलेल्या अनुभवांचा आहे. मोठय़ा घरची मुलगी, त्यामुळे युरोपीय रीतिरिवाज वगैरे काही नवे नव्हते. पण सुट्टीत बोटीचा प्रवास करून मायदेशी येण्यापेक्षा देवकी युरोपातच भटकल्या. नवे प्रदेश पाहिले, साहसी वृत्तीला वाव मिळाला. स्वीडनमध्ये १९५८ साली सहायक संशोधक म्हणून काम करत असताना एका स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ पुरुषानं त्यांच्याशी पुरुषी लालसेनं वागण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडल्याचा प्रसंगही देवकी जैन सांगतात.

म्हैसूर संस्थानाचे प्रधान आणि ग्वाल्हेरचे दिवाण, पुढे भारताच्या घटना समितीचे सदस्य असलेले एम. ए. श्रीनिवासन हे देवकी जैन यांचे वडील; मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि ग्राहक सहकारी भांडारांची चळवळ सुरू करणारे गांधीवादी लेखक लक्ष्मीचंद जैन हे पती, तर चित्रवाणी पत्रकार श्रीनिवासन जैन हे पुत्र. या प्रभावळीचा ताण वगैरे न घेता देवकी जैन (आज वय ८७) कार्यरत राहिल्या. त्यामागचं रहस्य या पुस्तकातून कळेल का? देवकी जैन यांचा (आणि त्यांच्या समवयस्क अनेक कर्तबगार लेखिकांचा) प्रांजळपणा लक्षात घेतल्यास ‘हो, नक्की!’ हे उत्तर पुस्तक न वाचताही देता येईल.

पण पुस्तकाचं नाव असं कसं? ‘ब्रास नोटबुक’ म्हणजे काय?

खंद्या स्त्रीवादी आणि ‘नोबेल’ मानकरी लेखिका डोरिस लेसिंग या देवकी जैन यांच्या एक दूरस्थ मैत्रीण आणि प्रेरणास्रोतही. लेसिंग यांच्या पुस्तकाचं नाव ‘द गोल्डन नोटबुक’ आहे, तर आपलीही पितळी का होईना, नोंदवही नक्की आहे, या जाणिवेतून हे नाव सुचलंय. स्त्रीवाद (फेमिनिझम) हा पुरुषविरोधी नाही, इथपासून भारतात जैन यांना सुरुवात करावी लागली होती. म्हणून सोनं आणि पितळ असा भेद त्या स्वत:बाबत करत असतील का?