‘हे दु:ख राजवर्खी, ते दु:ख मोरपंखी; जे जन्मजात दु:खी, त्यांचा निभाव नाही’, असा आशयसार असणाऱ्या शब्दांत आतापर्यंत अमेरिकन समाजवाद्यांची हेटाळणी केली गेली आहे. परंतु त्या हेटाळणीला न जुमानता अमेरिकन भांडवलशाहीचा राजवर्खी मुलामा ओरबाडून तिचा बीभत्स चेहरा उघडा पाडण्याचे काम चॉम्स्की-ईगल्टनवादी विचारवंतांनी अगदी जोरकसपणे केले आहे. अमेरिकाप्रणीत विकासवादाला विरोधाचे इंधन पुरविले ते याच विचारधारेने! या विचारधारेच्या ढालीआड साम्यवादाचा पर्यायी मार्ग स्वीकारत अनेक दक्षिण अमेरिकन देश संथपणे का होईना, सम्यक विकासाच्या वाटेवरून मार्गक्रमणा करू लागले आहेत. मूठभरांच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या देत बहुसंख्याकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अमेरिकन भांडवलवादाला क्युबा-व्हेनेझुएलासारख्या देशांमधील सार्वजनिक हिताच्या उपक्रमांनी चांगलाच शह दिला आहे. बहुधा त्यामुळेच जागतिक मंदीत होरपळून निघालेल्या आणि भांडवलशाहीमुळे भ्रमनिरास झालेल्या युरोपातील ग्रीस-स्पेनसारख्या देशांमध्ये साम्यवादी विचारसरणीची तीव्र लाट उसळून आली असावी. खुद्द अमेरिकेतदेखील पाच वर्षांपूर्वी झालेल्या ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ आंदोलनाने सरकार आणि भांडवलवाद समर्थकांचे धाबे दणाणले होते. कालपरवापर्यंत फॉक्स न्यूज-सीएनएनवरून दाखविण्यात येणाऱ्या संपन्न अमेरिकेत आणि वॉल स्ट्रीटवर ठिय्या देऊन बसलेल्या बेरोजगारांच्या अमेरिकेत जमीन-अस्मानाचा फरक असल्याचे चित्र त्या वेळी दिसले होते. जगभरातल्या आशाळभुतांच्या नजरा लागून राहिलेली अमेरिकन संपन्नता ही अजिबात सार्वत्रिक नसून ती थोडय़ा-थोडक्यांचीच मक्तेदारी असल्याचे या आंदोलनाने सिद्ध केले होते. अमेरिकेतील शेकडो महाबलाढय़ कंपन्या ‘फॉच्र्युन ५००’ यादीत असल्या, तरी उर्वरित जनतेला जीवनावश्यक वस्तूंसाठी टाचा घासाव्या लागत असल्याचे भयावह चित्र दडपण्याचा आटोकाट प्रयत्न त्या वेळी भांडवलदारांच्या पंखांखालील प्रसारमाध्यमांनी केला होता. साधारणत: त्याच सुमारास अमेरिकेतील समाजवादी चळवळीत क्षमा सावंत हे नाव गाजू लागलं होतं. त्यांनी वातानुकूलित बौद्धिकवर्गात पोथीनिष्ठ समाजवादाची पारायणे केली नाहीत. अमेरिकेतील वेतनविषमतेमुळे अस्वस्थ होत आंदोलन छेडले. ज्या वेळी संपूर्ण देशात वेतनाचा किमान दर प्रतितास सात डॉलरहून कमी होता, त्या वेळी त्यांनी तो १५ डॉलर करण्याची मागणी केली होती. या मुद्दय़ावरून त्यांनी सीएटल नगरपालिकेच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यापाठोपाठ २०१४ मध्ये शहराच्या महापौरांनी किमान वेतन १५ डॉलरवर नेले. तेव्हापासून त्यांचे नाव संपूर्ण अमेरिकेत एक कडव्या समाजवादी म्हणून गाजू लागले. तत्पूर्वी, सावंत यांनी जातिसंस्था आणि गरिबीच्या रूपाने भारतातील विषमतेचा अनुभव घेतला होताच. रोजीरोटीसाठी अमेरिकेची वाट धरल्यानंतर येथेही दिव्याखाली अंधारच असल्याचे त्यांना दिसले. येथील प्रचंड विषमतेकडे दुर्लक्ष करणे, हा सरकारी धोरणाचाच भाग असल्याची जाणीव त्यांना अस्वस्थ करून गेली. त्या अस्वस्थतेनेच सावंत यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यास उद्युक्त केले. ज्या प्रदेशाचा सांस्कृतिक आणि आर्थिक अवकाश पूर्णपणे भांडवलशाही विचारसरणीने व्यापला गेला होता, तिथे समाजवादी विचारसरणीचे रोपटे रुजविण्याचे निर्विवाद श्रेय त्यांच्याकडे जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांच्या या एकाकी प्रवासाचा वेध घेणारे ‘क्षमा सावंत : अमेरिकन सोशालिस्ट’ हे पुस्तक २०१६च्या मध्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता ते सप्टेंबरमध्येच येणे अपेक्षित होते, पण सिएटल नगरपालिकेच्या फेरनिवडणुकीत त्या व्यस्त असल्यामुळे पुस्तक प्रकाशन लांबणीवर पडले. अमेरिकेचे राजकारण मुख्यत्वे डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन पक्षांमध्ये विभागले गेले आहे. सरकार यापैकी कोणत्याही पक्षाचे आले तरी त्याची सूत्रे मात्र भांडवलदार लॉबीच्याच हातात असतात आणि ही लॉबी कायमच कामगारहिताविरोधात काम करते, असा एक मतप्रवाह अमेरिकेतील मतदारांमध्ये प्रबळ आहे. आतापर्यंत नगण्य समजला गेलेला समाजवादी पक्ष या दोन्हीही मुख्य पक्षांच्या राजकारणाला पर्याय ठरू शकतो, अशी आशा सावंत यांच्या निवडणुकीतील यशाने चेतवली गेली आहे. सावंत यांनादेखील आपले हे पुस्तक अमेरिकन मतदारांच्या प्रबोधनासाठी समाजवादाचा नवा जाहीरनामा म्हणून काम करू शकेल, अशी आशा वाटते.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of kshama sawant american socialist
First published on: 12-12-2015 at 00:34 IST