‘शार्ली एब्दो’चा प्रमुख व्यंगचित्रकार शार्ब तर वर्षभरापूर्वीच बळी पडला.. पण त्याचं सांगणं काय होतं?
बांगलादेशातले तिघे ब्लॉगर एकामागोमाग मारले गेले, तेव्हा फक्त कोलकात्यानं किंवा फक्त पश्चिम बंगालनंच नाही निषेध केला. प्रत्येक हत्येनंतर निषेध झाला, तो भारतातल्या सर्व राज्यांतून झाला. फ्रान्समध्ये शार्ली एब्दो या व्यंगचित्र- नियतकालिकावर झालेल्या हल्ल्यात बारा जण मारले गेले, तेव्हाही निषेध फक्त युरोपनं नाही केला, अख्ख्या जगानं केला. त्या हल्ल्याची वर्षपूर्तीही नुकतीच (सात जानेवारीच्या गुरुवारी) झाली, तेव्हा ती निषेधाची धार कमी झाली की काय असं वाटलं असेल अनेकांना. पण नाही. ती धार कमी होणार नाही. उलटपक्षी, दहशतवादय़ांकडून झालेल्या या सृजनशील लोकांच्या हत्यांचा निषेध करण्यामागे जर हताशा असेल तर तिला नवा अर्थ येईल, हेच आश्वासन देत एक नवं पुस्तक आलं आहे.
हे पुस्तक आहे शार्ली एब्दोच्याच प्रमुख व्यंगचित्रकारानं लिहिलेलं. त्याचं भद्रनाम स्टेफान शाबरेनिए. पण त्याला ‘शार्ब’ या लघुनामानंच ओळखत. त्याची व्यंगचित्रं म्हणजेच या नियतकालिकातले अग्रलेख असायचे. त्यांच्यामागे निर्णयपूर्वक अभिव्यक्ती हे सूत्र असायचं. इस्लामीकरणाचा अतिरेकी आग्रह आणि त्यातून उफाळलेला इस्लामी दहशतवाद यांना विरोध करण्यासाठी काय करता येईल, याचा शार्बनं केलेला निर्णय विवादास्पद म्हणता येईल, पण म्हणून त्यामागे विचार नव्हताच असं नाही म्हणता येणार. हाच विचार, शार्बनं स्वतच्या शब्दांत (मूळ फ्रेंचमध्ये) लिहिला होता.. इस्लामी मूलतत्त्ववादय़ांकडून धमक्या वाढू लागल्या, तेव्हा त्यानं हे लिखाण हाती घेतलं होतं. योगायोग असा की, हे हस्तलिखित शार्ली एब्दोवरील हल्ल्याच्या दोनच दिवस आधी लिहून पूर्ण झालं!
या लिखाणाचं मूळ फ्रेंच पुस्तक गेल्याच वर्षी- १६ एप्रिल रोजी आलं होतं. पण इंग्रजीत त्याचा अनुवाद येण्यासाठी आणखी आठ महिने लागले. अडॅम गोपनिक यांनी त्याला प्रस्तावनाही लिहिली आहे. आधी अमेरिकेत, मग आता भारतातही ते मिळू शकतं. गोपनिक हे ‘न्यूयॉर्कर’ चे स्तंभलेखक, पण त्याआधी त्यांनी फ्रेंच उपहासगर्भ व्यंगचित्रांवर प्रबंध लिहिला होता. त्यामुळेच, शार्ली एब्दोनं सर्वाचाच अनादर करणं हे वाटतं तितकं वाभरट नसून त्यामागे मोठी परंपरा आहे, असं गोपनिक सांगतात आणि ती परंपराही थोडक्यात मांडतात. बरं, परंपरा आहे म्हणून हे खपवून घ्या असं त्यांचं म्हणणं नाही. मूलतत्त्ववादी कुठल्याही धर्माचे असोत, सभ्य शब्दांत केलेल्या टीकेची ते पर्वाच करत नसतात. काहीसा अधिक्षेप केला, तरच ते लक्ष तरी देतात. ही डिवचून लक्ष वेधण्याची रीत शार्ब यांनी अनेकदा अवलंबली.
‘इस्लामद्वेषाविरुद्ध लढणारे (इस्लामद्वेषाची कावीळ झाल्याचा आरोप इतरांवर करणारे) लोक मूलत वंशवादीच आहेत. परंतु त्यांना काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे’ असा या खुल्या पत्राचा- ‘ओपन लेटर’चा हेतू. आपण ‘शार्ली एब्दो’तून जे करतो आहोत, ते सारे आपण का केले, आपण कशासाठी आणि कोणाविरुद्ध- आणि कोणाच्या बाजूने लढत आहोत, हे स्पष्ट करणारी अनेक विधाने ‘ओपन लेटर’ मध्ये आहेत. फ्रेंच लिखाण अनेकदा काहीसे अस्पष्टच असते, किंबहुना मोघमच नव्हे तर अर्थहीन वाटतील अशी विधाने फ्रेंच लिखाणात असण्याचीही परंपराच आहे. तशी काही वाक्ये इथेही आहेत. उदाहरणार्थ ‘बायबल आणि कुराण.. दोन्ही पुस्तके म्हणजे फसलेल्या कादंबऱ्याच’ अशा वाक्याच्या आगेमागे, धर्मग्रंथ आणि कादंबरीची- किंवा काल्पनिकेची- सांगड का घातली याबद्दल सांगणारे काहीच लिहिलेले नाही. उलट पुढे ‘काहीजण मात्र बायबल वा कुराण ही पुस्तके फार उपयुक्त मानतात- जणू ही पुस्तके म्हणजे इकेआचं डू-इट- युवरसेल्फ कपाट कसं एकत्र जोडावं, याचं सूचनापत्रकच!’ असा तिरकस शेरा येतो, तोही समजण्यास अवघड वाटेल असा ठरू शकेल.
पण एकंदर, हे ‘ओपन लेटर’ स्पष्टतेकडेच नेणारे आहे. ‘‘इस्लामविरोधी तत्त्वांना धडा शिकवण्यासाठी काही लोक मोहिमा आखतात, तेव्हा ते इस्लाम धर्मातील माणसांसाठी अजिबात लढत नसतात, ते फक्त प्रेषितासाठीच लढत असतात’’ असा प्रत्यारोप ‘‘आम्ही व्यंगचित्रकार एखाद्या वृद्धाला बाल-लैंगिक अत्याचार करताना दाखवणारे चित्र काढतो, तेव्हा आम्हाला सर्वच ज्येष्ठ नागरिक लिंगपिसाट असतात असे म्हणायचे असते का? हाच न्याय तुम्ही धर्मविषयक चित्रे पाहाताना का लावत नाही?’’ असे प्रतिसवाल यांच्या पुढे जाऊन हे लिखाण स्वतचा शोध घेते. विरोध करण्यासाठी कठोर होणे आवश्यक असते आणि आहे, अशी बाजू मांडते. आम्ही सर्व लोकांच्या विरोधात नसून उलट, दुराग्रह नसणाऱ्या कुणालाही या व्यंगचित्रांची साथ मिळेल, असा विश्वास देणारे हे लिखाण आहे.
‘‘विरोध आम्ही करतो. तिरस्कार ते करतात, ज्यांना आम्ही विरोध करतो. पण तिरस्कार करणारे हे लोक आमच्यावर असा आरोप ठेवतात की आम्ही त्यांचा तिरस्कार करतो आहोत’’ अशा अर्थाचे, काहीसे फ्रेंच वळणाचे लिखाण तात्त्विक पातळीला गेले आहे.
‘हेच लिखाण जर आधी प्रकाशित झाले असते, आधी सर्वांपर्यंत पोहोचले असते, तर कदाचित शार्बची आणि शार्ली एब्दोची मवाळ बाजू लोकांना वेळीच समजली असती आणि व्यंगचित्रे बोचकारेच काढत असतात तरीही ते सौम्य भासले असते.. कुणी सांगावं? कदाचित आज शार्ब जिवंतही असता’ अशी भावुक दाद ‘वॉशिंग्टन पोस्ट’ चे व्यंगचित्रकार मायकल काव्ना यांनी या पुस्तकाला दिली आहे, ती शंभर टक्के पटते!
मात्र तरीही प्रश्न राहातात. विरोध आणि तिरस्कार यांतली सीमारेषा सर्वानाच कधी स्पष्टपणे दिसेल का, हा मोठा प्रश्न. तो आहे, तोवर ‘तिरस्कार करत नसून मूल्यांवर आधारलेला विरोध’ करणारे आणि त्यांना उद्देशून- ‘बरोब्बर.. तुम्ही विरोधच करणार.. कारण तुम्हाला आमचा तिरस्कार वाटतो’ असं म्हणणारे, यांच्यातला संघर्ष असमंजसच राहणार का? हा प्रश्न अधिक छळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक घडामोडींवर चित्रभाष्य करणारे ब्राझीलचे राजकीय व्यंगचित्रकार कालरेस लातूफ यांनी ‘आत्मघातकी’ शार्ब यांचे हे व्यंगचित्र २०१२ साली केले होते; त्याला निमित्त होते ‘शार्ली एब्दो’मध्ये शार्ब यांनी तेव्हादेखील प्रेषित मोहम्मदाचे व्यंगचित्र केले होते, त्याचे! एक प्रकारे, लातूफ यांनी शार्बशी असलेले मतभेदच या चित्रातून प्रकट केले होते.
‘ओपन लेटर : ऑन ब्लास्फेमी, इस्लामोफोबिया अँड द ट्र एनिमीज ऑफ फ्री एक्स्प्रेशन ’
लेखक : शार्ब
प्रस्तावना : अडॅम गोपनिक ,
पृष्ठे : १४ + ८२ , किंमत : ७४७ रु.
आफ्रिकी वंशाच्या, विशेषत मुस्लीम तरुणांना फ्रेंच नागरिकत्व मिळूनही नोकऱ्या नाकारल्या जातात, याविरोधातील पोस्टर मोहिमेत शार्ब यांचे हे व्यंगचित्र समाविष्ट होते. त्यातील ‘साहेब’ म्हणतो : ‘‘तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही, पण मला रंग मात्र अजिबात पसंत नाही तुझ्या.. अं.. अं.. टायचा!’’

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of open letter book
First published on: 23-01-2016 at 03:39 IST