पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

मेहमूद मटान या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या उत्सवानंतरच्या सन्नाट क्षणांना कथात्मक लेपनातून जिवंत करण्याचा नदीफा मोहमद यांचा प्रयत्न ‘द फॉर्च्यून मेन’ कादंबरीला ‘कुण्या एका काळातील कृष्णवंशीयांवरील अन्याय’ गटातील पारंपरिक कादंबऱ्यांपेक्षा वाचनीय बनवतो.. 

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

पुरस्कार पटकावण्याचा प्राबल्यइतिहास असणाऱ्या ब्रिटनमधील नदीफा मोहमद या एकमेव लेखिकेचा यंदा बुकरच्या लघुयादीत समावेश आहे. जी जन्माने आणि कर्मानेही ब्रिटिश नाही. अगदीच चिमुरडय़ा अवस्थेत सोमालियामधील हर्गेझा (आताचे सोमालीलॅण्ड) प्रांतातून अल्पावधीसाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबासह ती लंडनमध्ये धडकली. सोमालियात पाहिलेल्या कचकडय़ा टीव्हीवरील अमिताभ बच्चनचे देमारपट आणि महाभारतासारख्या भारतीय टीव्ही मालिकांच्या स्मृतिखुणा पुसत तिचा इंग्रजीशी भाषासंकर झाला. पुढे सोमालियातील युद्धस्थितीने तिच्या कुटुंबाचे ब्रिटनवास्तव्य कायम केले, मात्र या देशात वाढताना नदीफा मोहमद मात्र सोमालियाच्या मुळोपासनेत रमली. ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या सोमाली जनमनांचा अभ्यास तिने सुरू केला. ‘ग्रॅण्टा’ या मासिकासाठी दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘फॅ्रगमेण्ट्स ऑफ ए नेशन’ या निबंधात (जो granta.com/fragments-of-a-nation/ या लिंकवर आजही उपलब्ध आहे.) तिच्या एकूण लेखनप्रेरणेचा उगम दिसतोच, शिवाय तिच्या ताज्या ‘द फॉर्च्यून मेन’ या कादंबरीची रूपरेषाही उमगते.

 साधारणत: विशीमध्ये असताना तिच्या हाती ब्रिटनमध्ये सोमाली नागरिकांवर झालेल्या अन्यायाचा एक दाखला आला. १९५२ साली एका गोऱ्या महिलेच्या हत्येबाबत मेहमूद मटान नावाच्या कुणा भणंगावर गुन्हा गुदरून फाशी देण्याचा. या घटनेच्या तब्बल ५० वर्षांनंतर तो खुनी नसल्याचा जाहीर निर्वाळा न्यायालयाने दिला. चुकीच्या फाशीबद्दल मेहमूद मटानच्या कुटुंबाला काही लाख पौंडाची नुकसानभरपाईही दिली गेली. पण मेहमूद मटानवरील अन्यायाची ही कथा नदीफा मोहमदसाठी कुण्या एकाची मरणगाथा म्हणून राहिली नाही, तर त्याबाबतच्या तिच्या अधिक संशोधनाला पंख फुटू लागले. तब्बल १७ वर्षे ब्रिटनमधील सरकारी दप्तरांतून हाती येईल तो तपशील, खटल्यासंबंधित वृत्तपत्रांतून आलेली माहिती, मेहमूद मटानच्या नातेवाईकांचा शोध, मुलाखती, सोमालियात- हर्गेझा प्रांतात- सातत्याने फेऱ्या आणि तिथल्या आप्तांच्या जगण्याशी परिचय करून घेता-घेता तिच्यातील कथाकार जागी झाली. मेहमूद मटानची कहाणी चितारण्याआधी तिने दोन कादंबऱ्यांद्वारे लेखन उमेदवारी केली. पहिली स्वत:च्या वडिलांच्या धाडसी स्थलांतरांवर बेतलेली; तर दुसरी सोमालियामधील यादवी युद्धावर आधारलेली. त्यांतून पुरेसा लेखन दमसास प्राप्त झाल्यानंतरच तिचा मेहमूद मटानबाबतचा पछाड कागदावर उतरला. मेहमूद मटान या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या उत्सवानंतरच्या सन्नाट क्षणांना कथात्मक लेपनातून जिवंत करण्याचा नदीफा मोहमदचा हा प्रयत्न ‘द फॉर्च्यून मेन’ कादंबरीला ‘कुण्या एका काळात गोऱ्यांकडून कृष्णवंशीयांवरचा अन्याय’ या गटातील पारंपरिक कादंबऱ्यांपलीकडे वाचनीय बनवतो. 

कादंबरी सुरू होते सहाव्या जॉर्जच्या मृत्यूकाळातील ब्रिटनच्या टायगर बे या स्थलांतरितांच्या वस्तीत. आफ्रिकेतील निर्वासित-शरणार्थी आणि चांगले आयुष्य जगण्याच्या हव्यासापायी ब्रिटनला येऊन पोहोचलेले आशियाई यांच्या दाटीवाटीने मुर्दाड बनलेल्या अधोलोकात. तिथे गोऱ्यांची सत्ता आणि मालमत्ता असली तरी सोमाली, जमैकन, वेस्ट इंडियन, चिनी आणि भारतीयांची गर्दी बरीच असल्याने मटका, जुगार आदी गरजेपुरते पैसे मिळविण्याचे प्रच्छन्न मार्ग चिकार तयार होतात. सुमारे १९५२च्या काळातील या असभ्यांच्या, अ-सद्गृहस्थांच्या कळपातून मेहमूद मटान ठळक व्हायला लागतो. सोमालियातून जगभर फिरणाऱ्या व्यापारी जहाजांतून पडेल ती कामे करून ब्रिटनमध्ये स्थिरावण्याची धडपड करणारा मटान रुचेलशी नोकरी मिळत नसल्याने घोडय़ांच्या शर्यतीवर पैसे लावण्यापासून जुगारअड्डय़ांच्या वैविध्यपूर्ण फेऱ्या करतो. टायगर बे परिसरातच त्याचा गौरवर्णीय तरुणीशी प्रेमविवाह होतो. मात्र अल्पावधीत तीन मुले प्रसवणाऱ्या या बापाला त्याच्या कुटुंबापासून सासू विलग करते. आर्थिक अक्षमतेच्या कारणामुळे कुटुंबाला पारखा झालेला मटान पैसे मिळविण्याच्या सोप्या मार्गानी आणखी रसातळाला जाण्याच्या स्थितीत येतो. टायगर बे भागात जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तू विकणाऱ्या मोठय़ा दुकानातील ज्यू मालकिणीची गळा चिरून हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप लावला जातो. तो सिद्ध करणाऱ्यासाठी सगळाच भवताल त्याच्या विरोधात उभा राहातो.

कादंबरीच्या आरंभीचा भाग या टायगर बे परिसराचा फेरफटका आहे. इथल्या गल्ल्या, खानावळी, ‘अमृततुल्य’ आणि कॉफी ओतणारी उपाहारगृहे तसेच तिथले वातावरण यांच्या वर्णनांत भारतीय वाचकाला अडकण्यासाठी अनेक केंद्रे आहेत. एका ठिकाणी ‘भारत आपल्या ताब्यातून सोडून दिला आता सोमालिया कधी सोडणार?’ असा ब्रिटिशांबद्दल सोमाली नागरिकांच्या चर्चेचा रोख आहे, तर एका भागात ग्रामोफोनच्या तबकडीवरील मोहंमद रफीच्या गाण्यामुळे तयार झालेल्या स्वरमुग्ध वातावरणाचे वर्णन आहे. इतकेच नाही, तर कादंबरीचा नायक मेहमूद मटान बिल्लाखान नावाच्या एका भारतीय वंशाच्या समदु:ख्याला ‘जनम में ये काम कभी खत्म होगा या नहीं?’ असे चक्क हिंदूीत दरडावताना ऐकू येतो. प्रेमभंगाचा राग तरुणीच्या हत्यासुडात व्यक्त करणारे अजितसिंग नावाचे मटानच्या आधी फाशीवर गेलेले भारतीय पात्रही यात आहे. अन् त्याच्या धर्मओळखीबाबत तुरुंगात गोंधळातून चालणारी चुकीची गमतीशीर चर्चा आहे. लेखिकेने या वातावरणाचा वापर करताना हिंदूी संदर्भाचा आणि सोमाली नागरिकांनी रिचविलेल्या हिंदी सिनेमांचा पुरता अभ्यास केलेला दिसतो. ‘किताब’, ‘नमस्ते’, ‘साहिब’, ‘हरामी’, ‘क्या मसला है?’, ‘जल्दी करो’, ‘दुनिया’, ‘खलास’ हे शब्द किंवा शब्दमाला सहजपणे इथल्या संवादांत शोभून जातात.

‘सुटा-बुटातल्या कन्हय्या’ रूपात १९४७ मध्ये ब्रिटनमध्ये दाखल झालेला मटान याचा हर्गेझा या आत्ता सोमालीलॅण्डमध्ये असलेल्या प्रांतापासून जगभरच्या भ्रमंतीचा प्रवास आणि हत्या झालेल्या ज्यू महिलेच्या कुटुंबाचा इतिहास अशा दोन पातळ्यांवर कादंबरी पुढे सरकते. लिली व्होल्पर्ट या महिलेच्या हत्येसाठी मटानला फाशी जावे लागले. कादंबरीत या पात्राचे नाव व्हायलेट वोलाकी करण्यात आले आहे. तेवढाच कथा रचण्यासाठी घडलेल्या इतिहासात केलेला बदल. बाकी खऱ्या इतिहासाला कल्पनेचे अस्तर जोडून मेहमूद मटानची व्यक्तिरेखा रंगविली आहे. तो कमालीचा धर्मभोळा अन् श्रीमान सत्यवादी आहे. कुटुंबवत्सल असल्याने पत्नी आणि मुलांवरील त्याचे अमाप प्रेमही दाखविले आहे. हॉलीवूडचे सुखांती सिनेमा पाहून सत्याचाच अंतिमक्षणी विजय होतो ही त्याची कडवी धारणा असल्यामुळे आपण गुन्हाच केला नसल्याने नक्कीच सुटणार हा त्याचा विश्वास तुटत नाही. हर्गेझामधून लहानपणीच पळून विविध आफ्रिकी राष्ट्रांत स्वत:ला घडवत जाणाऱ्या मटानचे आरंभिक आयुष्य नदीफा मोहमद यांनी बऱ्याचअंशी रिचर्ड बर्टनी साहसांसारखे चित्रित केले आहे. सोमाली, स्वाहिली, अरेबिक, इंग्लिश आणि हिंदूी या भाषेवर पोटापुरते प्रभुत्व मिळविणारा मटान जहाजावरील नोकरीनिमित्ताने अमेरिकेच्या किनाऱ्यापासून मुंबई, चीनमधील बंदरांमध्ये भटकल्याचे आणि रंगेल सौदागराचे जगणे अनुभवल्याचे तपशील येतात. वाळवंटातही तो सुख पटकाविण्यात यशस्वी होताना दिसतो. ब्रिटनमध्ये आल्यानंतर मात्र त्याची सुखनौका गटांगळ्या खाऊ लागते. कागद उद्योगात काम करणाऱ्या लॉरा या गोऱ्या तरुणीचे मनजिंकून तो तिच्याशी लग्न करतो. तिच्यावर नि:स्वार्थ प्रेम करतो. मात्र संसाराचे गाडे सुरळीत ठेवणारे अर्थचक्र त्याला सापडत नाही. भुरटय़ा चोऱ्या, अवैध उद्योगांतून त्याची वाट चुकत जाते. तरीही पोशाख, राहणीमान यांबाबत आपल्या तत्त्वांना तो मुरड घालत नाही. खुनाच्या आरोपाला, चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्या खटल्याला आणि त्याला गोवण्यासाठी अनेकांकडून केल्या जाणाऱ्या खोटय़ा साक्षींनाही तो न भिता सामोरा जातो. आपल्या निर्दोषत्वावर ठाम राहतो.

दीड दशकाचे संशोधन आणि या काळात प्रगल्भ होत गेलेल्या जाणिवांतून नदीफा मोहमदचे लेखनतंत्र विकसित झाले आहे. सोमालियातील नागरिक शतकभर जगात का विखुरले, त्यांना त्यात काय अडचणी आल्या, धर्म-वंश आणि परंपरांची भिन्नता असलेल्या राष्ट्रांत त्यांची प्रगती किंवा अधोगती कशी झाली, यांचे संदर्भ रिपोर्ताजी शैलीत या कादंबरीमुळे वाचकाला माहीत होतात. कादंबरीतील एक सर्वात वेगाने वाचले जाणारे प्रकरण खटल्यातील मटानविरोधात दिल्या जाणाऱ्या खोटय़ा जबान्यांचे आहे. दोषी ठरवून फाशी देण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या धैर्याची आणि वाचकाचीही कसोटी पाहणारा हळवा बनला आहे.

१९५२ साली झालेल्या या अन्यायाविरोधात मटानच्या पत्नीने नव्वदीच्या दशकापर्यंत लढा दिला. महिलेच्या हत्येचा उलगडा झाला नाही, मात्र मटानला त्यात गोवण्यात आल्याचे आणि तो पूर्णपणे निर्दोष असल्याचे १९९८ साली सिद्ध झाले. निर्दोषत्व सिद्ध करण्याचा हा पाच दशकांचा लढा पुढली काही वर्षे ब्रिटनपुरत्या बातम्यांचा ठरून, पुढे विरून गेला. नदीफा मोहमदच्या या कादंबरीमुळे मेहमूद मटानच्या आयुष्याची कहाणी आता जगभर पोहोचली आहे.

पुरस्कार पटकावण्याचा प्राबल्य इतिहास असणाऱ्या ब्रिटनमधील नदीफा मोहमदला या कादंबरीसाठी पुरस्कार मिळाला, तर ब्रिटनमध्ये जल्लोष होईलच, पण त्याहून कैकपटीने सोमालीलॅण्ड या जगासाठी अनभिज्ञ असलेल्या देशाचा तो सर्वाधिक विजय असेल. जगण्याचा उत्सव करण्यासाठी या भूमीतून फेकल्या गेलेल्या माणसांच्या इतिहासाला पुनर्जीवित केल्याबद्दलचा!

‘द फॉर्च्यून मेन’

लेखिका : नदीफा मोहमद

प्रकाशक : पेंग्विन बुक्स

पृष्ठे : ३७४, किंमत : ७९९