पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

युक्रेनच्या युद्धकथा तर वृत्तपत्रांतूनही आपल्यापर्यंत पोहोचू शकताहेत.. पण आर्तेम चपेये याची कथा याहून निराळी. २०१८ मध्ये लिहिलेली आणि युद्धाआधी युक्रेनी माणसं कशी जगत होती, त्यांना काय वाटत होतं, याचा वेध घेणारी! हीच माणसं आता बदलली आहेत, युद्धाला सज्ज आहेत, असं सांगणारी या लेखकाची मुलाखत मात्र ताजी..

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

शतकी परंपरा वगैरे असणारे ‘न्यू यॉर्कर’ हे साप्ताहिक आरंभापासून आजच्या वेगवान आधुनिक युगापर्यंत कथा या साहित्य प्रकाराला महत्त्व देत आले आहे. आजकाल कुणी कथा वाचत-बिचत नाही, या अपसमजापासून हे साप्ताहिक मैलोगणती दूर आहे, जगभरातील दिग्गज कथालेखकांचा राबता तिथे असतोच; पण नव्यातील, विविध भाषिक कथावर्तुळात कोणत्या ना कोणत्या कारणांनी गाजत राहणाऱ्या कथालेखकांचाही शोध हे साप्ताहिक घेत असते. त्यातल्या कथा नुसत्याच वाचल्या जात नाहीत, तर व्हायरल होऊन एखाद्या नवख्या लेखिकेला सेलिब्रेटीही बनवू शकतात, हे तीनेक वर्षांपूर्वी सिद्धही झाले होते. त्यामुळे आठवडाआरंभी येणाऱ्या याच्या प्रत्येक अंकातील ताजी कथा कुणाची, हे ऑनलाइन तपासणाराही वाचकवर्ग प्रत्येक खंडात विखुरला आहे.

वाचनीयता, कालसमांतर विषय, भाषिक सौंदर्य आणि सर्वार्थाने वाचकाला नव्या जगाची अनुभूती देणाऱ्या निकषांवर या कथांची निवड होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्या मोफत वाचायला मिळतातच, शिवाय साप्ताहिकाच्या संकेतस्थळावर लेखकाची कथालेखन प्रक्रिया आणि विचार स्पष्ट करणारी मुलाखतही उपलब्ध होते. एखाद्याने कथालेखनाचा अभ्यास करायचा ठरविला, तर त्याला परिपूर्ण असे ज्ञान घडवून देणारे मोफत विद्यापीठ म्हणून या व्यासपीठाकडे पाहता येऊ शकते.

चार आठवडय़ांपूर्वी या साप्ताहिकाने आर्तेम चपेये या युक्रेनमध्ये पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तीची ‘द युक्रेन’ ही कथा तातडीने अनुवादित करून घेतली. तत्पूर्वी या साप्ताहिकाने रशियन सैन्याकडून युक्रेनमध्ये चाललेल्या हानीचे, शहर उद्ध्वस्तीकरणाच्या प्रयोगांचे, युक्रेनी जनतेच्या स्थलांतराचे आणि मृत्युनगरे बनत चाललेल्या गावांचे सचित्र वृत्तान्त दिले होते. जगभरातील नागरिकांना युक्रेनमधील ओळखीच्या नसलेल्या शहरांची नावे या युद्धामुळे माहिती झाली. किव्ह, मारियोपोल, खारकिव्ह या शहरांची विदारक होत चाललेली अवस्था बातम्यांचा विषय झाली. पण या सर्व घटनांपूर्वी त्याच भूतलावर राहणारे, शहरांमध्ये फिरणारे, सामान्य आयुष्य जगणारे लोक कसे होते, याचा विस्तृत अंतर्भाव असलेली कथा ‘न्यू यॉर्कर’च्या कथाशोधक मंडळाने हुडकून काढत आपल्या वाचकांसाठी सादर केली.

एरवी प्रयत्न करूनही या लेखकाला ‘न्यू यॉर्कर’चे कथा व्यासपीठ मिळाले असते की नाही, याबाबत शंका आहे. अमेरिकी विद्यापीठांत कथालेखनाची पदवी घेऊन (एमएफए) आणि लेखकीय कार्यशाळांमधून लेखनकला घोटवूनही ‘न्यू यॉर्कर’मध्ये प्रसिद्ध न होण्याची खंत हयातभर बाळगणारे शेकडो लेखक आहेत. मात्र मायदेशातील विपरीत परिस्थितीमुळे या युक्रेनी लेखकाला आपल्या भाषेतील कथा इंग्रजीत, तेही ‘न्यू यॉर्कर’मध्ये झळकलेली पाहण्याचे भाग्य मिळाले. मूळ भाषेत युद्धापूर्वीच – २०१८ साली – प्रसिद्ध झालेली ‘द युक्रेन’ ही कथा आता सर्वाना वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहे.

आजघडीला अचानक कुटुंब सोडून सैन्यात भरती झालेल्या आणि लवकरच लेखनाचा आपला मूळचा पेशा प्राप्त होण्याची आशा बाळगणाऱ्या या लेखकाची मुलाखत नेहमीपेक्षा अंमळ मोठी घेण्यात आली आहे.

या कथेमध्ये निवेदकाची पूर्णत्वाकडे न जाणारी प्रेमकहाणी आहे, शनिवार-रविवारी चालणाऱ्या युक्रेनमधील शहरगावांच्या ‘वीकान्त’ सफरी आहेत. तिथल्या मुर्दाड रस्त्यांची वर्णनं आहेत. बर्फाच्छादित भागातून चालणाऱ्या सहली आहेत. दर ऋतूंत बदलणाऱ्या निसर्गाची छबी पकडण्याची किमया आहे, गावांतील, शहरांतील विचित्र, विक्षिप्त व्यक्तींचे संवाद आहेत. भ्रष्टाचार आणि बेरकीपणात बरबटलेली माणसेही आहेत. टॉम वेट्सच्या अमेरिकी गीतांनी भारित असलेला हा निवेदक लग्न होऊन काही वर्षे अमेरिकेत राहिलेल्या आपल्या प्रेयसीचा हेवा करतो. काडीमोड घेऊन तेथून परतल्यानंतर याच प्रेयसीला, युक्रेनमधल्या तिच्या हरवलेल्या वर्षांची भरपाईही तो आपल्या आठवणींतून करून देतो. गरिबी उच्चाटनासाठी नव्वदीच्या दशकात युक्रेनी नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचे दाखलेही याच कथेत आणतो.

एका गरीब, अपरिपूर्ण देशाचे आणि त्यातील साधारण माणसांचे जगण्याचे सारे तपशील घेऊन उभी राहणारी ही कथा का वाचायची? एक तर गेल्या काही दिवसांमध्ये या देशातील बहुतांश शहरांची नावे बातम्यांनी परिचित करून दिली आहेत. कथेत वर्णन असलेली ही सारी शहरे, त्यांतल्या इमारती, त्यांमधले रस्ते, रेल्वे स्थानके यांची ओळख पुसत गेल्याचा तपशील आपल्यापर्यंत येतो आहे.

तीन दिवसांत युक्रेनला संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या रशियाशी या चिमुकल्या देशातले सैन्य गेले दोन महिने संघर्ष करीत आहे. सैन्याला पराभूत करता येत नाही, म्हणून रशिया सामान्य नागरिकांना ध्वस्त करण्याचे उद्योग करीत आहे. अन् त्यामुळेच कधी नव्हे इतके राष्ट्रप्रेम या देशातील नागरिकांमध्ये शिरले आहे. घरटी १६ ते ६० वर्षे वयाचे पुरुष स्वेच्छेने सैन्यात भरती झाले आहेत. जे लढता लढता स्थलांतरितांना मदत करण्यापासून बॉम्बहल्ल्यातील जखमी आणि मृतांना वाहून नेण्याच्या कामी येत आहेत..

‘न्यू यॉर्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चपेये यांनी युद्धकाळात बदललेल्या अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. त्यांच्या कथेमध्ये सगळय़ाच बाबतीत अपरिपूर्ण असलेल्या युक्रेन या देशाची वर्णने आहेत. देशाविषयीचा रागसुद्धा आहे. पण आता तिथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात, आहे त्या परिस्थितीतही युक्रेनबाबत प्रचंड स्वाभिमान कसा निर्माण झाला आहे, याचा तपशीलही या मुलाखतीत आला आहे.

या तपशिलाचा हा एक मासला : तिथल्या एका बडय़ा प्रकाशकाने या युद्धकाळात लोकांना सहज वाचता यावे म्हणून भाषांतरासह मूळ इंग्रजीत असलेली सारी ई-पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली आहेत. खुद्द चपेये यांनी दोन अभिजात पुस्तकांचे वाचन या युद्धस्थितीतही कसे केले, याचा दाखला दिला आहे.

युद्धात आम्ही जिंकू, पुतीन यांचा लवकरच पाडाव होईल आणि त्यानंतर इथल्या प्रत्येकाकडे सांगायला आणि लिहायला अगणित कहाण्या असतील, हा रांगडा आशावाद या लेखकाजवळ आहे.

कथा आणि लेखकाची विस्तृत मुलाखत देणारे ‘न्यू यॉर्कर’ हे साप्ताहिक जगभर आवडीने का वाचले जाते, याची ओळख करून घ्यायची असेल, तर या घटकांचे वाचन आवश्यक आहे.

कथेमध्ये युक्रेनचे जे वातावरण आणि वर्णन उतरले आहे, ते युद्धामुळे आता पुन्हा कधीच जिवंत होणार नसले, तरी कथेत तिथल्या माणसांमध्ये जे सापडत नाही, ते खूप मोठय़ा प्रमाणावर आता तयार झाले आहे. युक्रेनकडून होणारा कडवा प्रतिकार हे त्याचेच एक रूप आहे.

आर्तेम चपेयेची ‘द युक्रेन’ ही कथा

‘ द न्यू यॉर्कर’नं ताज्या अंकात या पानभर चित्रासह छापली आहे.