‘‘स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची पुस्तके ठराविक कालावधीनंतर येत असतात. त्यातील बहुतेक पुस्तके माहितीच्या दुय्यम स्रोतांवर आधारलेली असतात. त्यामुळे ती काहीशी औपचारिक व रूक्ष वाटतात. नेहरूंनी लिहिलेल्या आत्मचरित्रात त्यांना स्वत:ला जे विषय महत्त्वाचे वाटले नाहीत ते त्यांनी गाळले. यात त्यांनी स्वत:विषयी फार काही सांगणे शक्यही नव्हते. त्यामुळे त्यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी खुसरो एफ. रुस्तमजी यांनी रेखाटलेले नेहरूंचे शब्दचित्र वेगळे ठरते.’’- ‘आय वॉज नेहरूज् शॅडो’ या पुस्तकाचे संपादन करणारे पी. व्ही. राजगोपाल यांनी प्रस्तावनेत मांडलेले हे मत किती खरे आहे, याची साक्ष हे पुस्तक वाचून झाल्यावर पटते. आधी (ब्रिटिश) इंडियन व नंतर भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम पाहिलेले खुसरो रुस्तमजी यांच्या डायरीवर आधारित या पुस्तकातून नेहरूंचे वेगळेच दर्शन होते. हे रुस्तमजी मूळचे नागपूरजवळील कामठीचे. १९३८ मध्ये ते मध्य प्रांतातून पोलीस सेवेत दाखल झाले. १९५२ साली ते डीआयजी असताना केंद्रीय गुप्तहेर खात्यात प्रतिनियुक्तीवर गेले व लगेच त्यांची नियुक्ती नेहरूंचे एकमेव मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून झाली. त्यानंतरची सहा वर्षे ते नेहरूंसोबत सावलीसारखे वावरले. या काळात त्यांना जे नेहरू दिसले, उमगले त्याचे अतिशय सुंदर वर्णन त्यांनी या डायऱ्यांमधून केले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला घडवण्यासाठी अहोरात्र झटणारे नेहरू माणूस म्हणून कसे होते, त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू, त्यांचे कधी चिडणे, रागावणे तर कधी दु:खी व आनंदी होणे, त्यांच्या सवयी, आवडीनिवडी यांचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकात ठिकठिकाणी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हापासूनच त्यांच्या जिवाला धोका होता. पण त्याकाळी पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी आता जसे आहेत तसे विशेष नियम नव्हते. त्यामुळे नेहरूंना सांभाळण्याची जबाबदारी एकटय़ा रुस्तमजींवरच येऊन पडायची. स्वत: नेहरू सुरक्षेचे नियम पाळण्याच्या बाबतीत अजिबात काटेकोर नव्हते. सुरक्षा तोडून लोकांमध्ये मिसळणे त्यांना आवडे. त्यातून अनेकदा समरप्रसंग उभे राहात व यात रुस्तमजींची कशी पंचाईत होई, याची अनेक वर्णने या पुस्तकात आहेत. सुरक्षेवरून वाद उद्भवला, की नेहरू चिडायचे. त्यांचा सारा राग रुस्तमजींवर निघायचा. पण कोणत्याही दौऱ्यात असे प्रसंग घडले तरी दिल्लीला परतल्यावर नेहरू अगदी हसतमुखाने रुस्तमजींना ‘गुडबाय’ करायचे. ‘अफाट बुद्धिमत्ता व चांगुलपणा यामुळे ते महामानव वाटत. राग येणे सोडले तर त्यांच्यात दुसरे वैगुण्य दिसायचे नाही,’ असे प्रांजळ मत रुस्तमजींनी डायरीत नोंदवून ठेवले आहे. ‘नेहरूंपेक्षा अधिक साधेपणाने राहणारा व गैरसोयी सोसणारा पंतप्रधान मी पाहिला नाही,’ असे मत नोंदवणाऱ्या रुस्तमजींनी नेहरूंच्या साधेपणाविषयीचे अनेक प्रसंग नोंदवून ठेवले आहेत.

नेहरूंसोबत हरी नावाचा त्यांचा सेवक कायम असायचा. हाच त्यांची सर्व काळजी घ्यायचा. एखादी वस्तू वापरायला घेतली, की ती पूर्णपणे खराब होईपर्यंत वापरायची, यावर नेहरूंचा नेहमी कटाक्ष असे. त्यांचे पायातले मोजे वारंवार फाटायचे, तेच मोजे हरी रफू करून शिवायचा. दौऱ्यावर असताना अनेकदा हरीला मोज्याच्या रंगाचा धागा मिळायचा नाही. त्यामुळे रफू केलेले मोजे चित्रविचित्र दिसायचे, पण नेहरू तेच मोजे घालायचे. बुटांचा एकच जोड ते अनेक वर्षे वापरायचे. अनेकदा ते फाटून जायचे; पण पुन्हा शिवून वापरायचे. कोणतीही वस्तू वाया गेलेली त्यांना आवडायची नाही. दौऱ्यावर असताना कलेक्टर किंवा कमिशनरच्या घरीच त्यांची जेवणाची व्यवस्था असायची. जेवण अगदी साधे हवे असा त्यांचा आग्रह असायचा. नाश्त्याला पाव-लोणी, अंडी व मार्मालेड ब्रेड एवढेच त्यांना लागायचे. तेलकट व तुपकट पदार्थ नको असा आग्रह धरणाऱ्या नेहरूंना मेजवानीतील भपकेबाजपणा आवडायचा नाही. एकदा महाराष्ट्रातील एका कलेक्टरच्या घरी ते जेवायला होते. त्या अधिकाऱ्याने अनेकांना बोलावून ठेवले, पण वाढायला पाचच माणसे होती. हे बघून नेहरू थेट स्वयंपाकघरात घुसले व त्यांनी सर्व अन्न बाहेर आणून एका मेजावर ठेवले आणि सर्वानी हाताने वाढून घ्यावे अशी सूचनाही केली.. अशा  नेहरूंच्या अनेक सवयी,  त्यांच्या आवडीनिवडी यांविषयी रुस्तमजींनी पुस्तकात लिहिले आहे.

महिन्यातून पंधरा दिवस देशभर दौरे करताना व लाखो लोकांना भेटल्यावरही नेहरू नेहमी ताजेतवाने दिसायचे. एकदा रुस्तमजींनी त्यांना या ऊर्जेमागचे रहस्य काय, असे थेट विचारले. तेव्हा मी खूप कमी खातो व माझी पचनशक्ती चांगली आहे, असे उत्तर नेहरूंनी दिले. नेहरू कधीही मद्य प्याले नाहीत, पण दिवसाला पाच सिगारेटी पिण्याचा शौक त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांना काटकसर आवडायची. कुठेही मुक्कामी असले, की झोपायच्या आधी इमारतीतील सर्व दिवे मालवणे, अनावश्यक फिरणारे पंखे बंद करणे ही कामे ते आवडीने करायचे. रस्त्याने जातानासुद्धा कुठे नळ चालू दिसला, तर ते वाहन थांबवायचे व नळ बंद करायचे.

नेहरूंबरोबर अनेकदा प्रवास करायला मिळालेल्या रुस्तमजींनी लिहिले आहे, की नेहरू प्रवासात असताना सोबतच्या सहकाऱ्यांशी अतिशय कमी बोलायचे. हा वेळ ते भाषणांची टिपणे काढणे अथवा फायलींचा निपटारा करण्यात घालवायचे. त्यांच्यासमवेत लेडी माऊंटबॅटन व इंदिराजी असल्या, की मग मात्र त्यांची कळी खुलायची. चर्चेत अनेकदा ते वाद घालायचे. त्यांना बुद्धिनिष्ठ विरोध आवडायचा. विरोधासाठी विरोध ते कधी करायचे नाहीत. सातत्याने विचार करणे व लोकांपर्यंत तो पोहोचवणे यात मग्न असणाऱ्या नेहरूंचे अंत:करण खुले व निरुपद्रवी होते. समन्यायी व मुक्त लोकशाहीसाठी जी प्रगती करावी लागते, त्याविषयी ते सतत भाषणांमधून बोलत. नेहरूंमध्ये खोडकरपणासुद्धा दडला होता. एकदा नेहरू इंग्लंडला गेले. तेथील राजप्रासादासमोर राणी सोबत असताना त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडे बघून जोरजोरात हात हलवला. असे हात हलवणे शिष्टाचारसंमत नाही, असे राणीने त्यांना सांगितले व हात कसा हलवायचा ते सांगितले. हा किस्सा नेहरू रंगवून सांगत, अशी आठवण रुस्तमजींनी सांगितली आहे.

अनेकदा दौरे ठरवताना प्रशासनातील अधिकारी वेळापत्रक बरोबर आखायचे नाहीत. त्यामुळे नेहरूंचे दौरे रात्री उशिरापर्यंत सुरू राहायचे. यावरून सुरक्षा यंत्रणा त्रस्त व्हायची, पण वेळापत्रकानुसारच दौरा, यावर नेहरू ठाम राहायचे. आंध्रच्या रायलसीमा भागात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करताना असेच वेळापत्रक कोलमडले. तरीही नेहरू ते पाळण्यावर ठाम होते. आपल्या भेटीसाठी लाखो लोक येतात. त्यांना वेळेवर नाही म्हणून सांगणे योग्य दिसते का, असा प्रश्न ते सर्वाना विचारायचे. लोकांशी भेटल्यावर कुणी भेट म्हणून काही पदार्थ दिला तर तो लगेच खाऊन पाहण्याची सवय नेहरूंना होती. दौऱ्यात सोबत असलेल्या माणसांची सर्व सोय झाली की नाही, हे ते स्वत: पाहायचे व मगच स्वत:च्या खोलीत जायचे. एकदा अरुणाचलला जेवण कमी आहे हे बघून रुस्तमजींसकट इतरांनी जेवणाच्या ठिकाणाहून बाहेर पळ काढला. हे लक्षात आल्यावर नेहरू खूप संतापले व त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

इतरांच्या काळजीबाबत कमालीचे दक्ष असलेले नेहरू एकटे व एकाकी होते. शिखरावर असणाऱ्या माणसांच्या बाबतीत जे घडते तेच नेहरूंच्या बाबतीत घडत होते, अशी आठवण सांगणाऱ्या रुस्तमजींनी नंतर त्यांच्या लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत तपशीलवार लिहिले आहे. लेडी एडविना व पद्मजा नायडू या दोघींशी त्यांची मैत्री होती व ती गाढ व निकोप होती. एडविनांना कुठली फुले आवडतात, ती त्यांना कशी पाठवायची याबाबत नेहरू कमालीचे दक्ष असत. याशिवाय त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न मृदुला साराभाई करायच्या, पण त्यांना ते आवडायचे नाही. नेहरूंच्या जिवाला धोका आहे अशी कंडी पिकवून सुरक्षा यंत्रणांची दमछाक करण्यात या साराभाई आघाडीवर होत्या, असेही रुस्तमजींनी अनेक उदाहरणे देत लिहून ठेवले आहे. परदेशी स्त्रियांमुळे प्रभावित होण्याचे भारतीय पुरुषांमध्ये असलेले वैगुण्य नेहरूंमध्येही होते. कोणतीही परदेशी स्त्री दिसली की ‘ह्य़ा कोण?’ असे ते हमखास कानात विचारायचे, असे रुस्तमजींची डायरी सांगते.

नेहरूंचा सर्वच धर्माविषयी अतिशय गाढा अभ्यास होता. त्यांच्या पुस्तकांमधून तो दिसतो. मात्र, नेहरू स्वत:ला ‘पेजन’ म्हणजे कुठल्याही मोठय़ा धर्मावर श्रद्धा नसलेले आहोत असे सांगायचे. त्यांनी कधी उपास केला नाही किंवा कधी देवपूजेसाठी बसले नाहीत. अलाहाबादच्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करा, असा आग्रह लालबहादूर शास्त्रींनी नेहरूंकडे धरला होता. पण नेहरूंनी त्यास ठाम नकार दिला. दौऱ्यावर असताना अनेकदा ते मंदिरांत जात, पण प्रसाद हातावर घ्यायला नकार देत. त्यांना कोणत्याही धर्माविषयी आदर वाटत नसला तरी ते जनतेच्या धर्मावरील श्रद्धेच्या आड कधी आले नाहीत, असे निरीक्षण रुस्तमजींनी नोंदवले आहे. ते मुलांमध्ये चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध होते. दौऱ्यावर असताना गर्दीतील मुलांच्या गळ्यात हार टाकणे हा त्यांचा आवडता छंद. तो जोपासताना ते कमालीचे दक्ष असायचे. हार घालण्यासाठी मुले निवडताना सहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलगी वा गोबऱ्या गालांचा मुलगाच ते निवडायचे.

अनेक कठीण प्रसंगांत नेहरूंनी दाखवलेल्या धैर्याचा उल्लेख रुस्तमजींच्या डायरीत आहे. तेव्हा विमाने, हेलिकॉप्टर एवढी अद्ययावत नव्हती. दौऱ्यात अनेकदा विमान भरकटायचे. तेव्हा सोबतचे सारे घाबरले तरी नेहरू निश्चिंत असायचे. एकदा आंध्रमध्ये त्यांच्या विमानातील एका इंजिनाला हवेतच आग लागली. ती विझवली गेली, पण विमान मधेच (रायचूरला) उतरवावे लागले. या काळात नेहरू काहीच झाले नाही अशा थाटात विमानात वावरत होते. एकदा श्रीनगरला त्यांच्या जीपवर गावठी बॉम्ब फेकण्यात आला, तर एकदा गुजरातमध्ये त्यांची जीप उलटली व एका मोठय़ा दगडावर जाऊन आदळली. तेव्हाही नेहरू सर्वात आधी उठले व इतरांना त्यांनी सांभाळले.

नेहरूंच्या संताप व रागासंदर्भातल्या अनके आठवणी रुस्तमजींनी लिहिल्या आहेत. त्यांच्या सभेला सुरक्षाव्यवस्था कडक दिसली की ते चिडायचे. व्यासपीठ व लोकांमध्ये तारेचे कुंपण, लोखंडी कठडे घातलेले दिसले, की नेहरू पोलिसांना फैलावर घ्यायचे. सभेच्या ठिकाणी आपल्याभोवती पोलीस नकोच, असा त्यांचा आग्रह असायचा. खाकी वर्दीतील माणूस दिसला की तुम्ही का चिडता, असे रुस्तमजींनी एकदा विचारले तेव्हा हसून त्यांनी उत्तर देणे टाळले. नेहरू कितीही चिडले तरी त्यांच्या रागावण्यात एक अदब असायची. ‘बद्तमीज’ व ‘नालायक’ या शिव्यांपलीकडे ते कधी गेलेले दिसले नाहीत. ‘सुरक्षेचा बाऊ करू नका’ असे ते सतत सांगायचे. एकदा पंजाबात एका सभेला तीन लाख लोक जमले, पण सभास्थळावरून बाहेर निघण्यासाठी मोजकी चिंचोळी प्रवेशद्वारे होती. हे लक्षात आणून दिल्यावर नेहरू भाषण संपवून कुणी कसे व कुठून बाहेर जायचे हे तासभर सांगत बसले. लोक निघून गेल्यावरच ते व्यासपीठावरून खाली उतरले.

देशांतर्गत स्थितीने १९५८ मध्ये नेहरू कमालीचे विचलित झाले होते. काश्मीर प्रश्नावरून ते चिंतित असायचे. आयुर्विमा घोटाळा व मौलाना आझादांचा मृत्यू यामुळे ते खचले व राजीनाम्याची भाषा करू लागले. याच काळात जनसंघाने दिल्ली पालिकेत चांगल्या जागा मिळवल्या. याच जनसंघाने तेव्हा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देण्यावरून बराच वाद घातला. आपल्या देशात धर्माधता वाढीला लागली हे बघून ते सतत बेचैन व्हायचे. एकदा मध्य प्रदेशातील सांचीला जनसंघाच्या लोकांनी त्यांच्या दौऱ्यात गोंधळ घातला, पत्रके वाटली. ‘गायीचे दूध व तूप स्वीकारा,’ असे आवाहन केले. यामुळे चिडलेल्या नेहरूंनी भरसभेत विरोधकांचा समाचार घेतला व गोहत्याबंदी कायदा का आणू शकत नाही, याचे तर्कशुद्ध विवेचन केले, अशी आठवण अगदी तपशीलवारपणे रुस्तमजींनी लिहिली आहे.

डायरीच्या शेवटी ते नेहरूंमधील दोषांवर भाष्य करतात. काँग्रेस रसातळाला चालली असताना नवी सक्षम माणसे शोधून त्यांना जबाबदार पदावर नेमणे नेहरूंना जमले नाही. त्यामुळे पक्षात बजबजपुरी माजली व अनेकांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवणे सुरू केले. आपल्या सार्वजनिक भाषणांचा जनतेवर काय परिणाम होतो हे नेहरूंनी कधीच ताडून बघितले नाही. देशात धर्माधता पुन्हा डोके वर काढेल याविषयीचा अंदाज ते बांधू शकले नाहीत. नेहरूंनी आपल्याभोवती भ्रष्टाचार फोफवायला भरपूर वाव दिला. त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या गैरकृत्यांकडे कानाडोळा केला. त्याचा फायदा अनेकांनी उचलला. त्यात मथाई आघाडीवर होते. नेहरूंचे शेवटच्या काळातील वागणे खुशामतखोरीला उत्तेजन देणारे होते. लोकसंख्येचा स्फोट व चीनचा हल्ला याविषयीचे त्यांचे आडाखे चुकले, असे रुस्तमजींचे म्हणणे आहे. यावर अनेकांचे दुमत असू शकते, तरीही डायरीवर आधारलेले हे पुस्तक एका वेगळ्या नेहरूंची ओळख करून देणारे आहे.

  • ‘आय वॉज नेहरूज शॅडो’
  • लेखक : के. एफ. रुस्तमजी
  • संपादक : पी.व्ही. राजगोपाल
  • प्रकाशक : विज्डम ट्री
  • पृष्ठे : २३८, किंमत : ३९५ रुपये

– देवेंद्र गावंडे

devendra.gavande@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was nehrus shadow from the diaries of k f rustamji
First published on: 11-11-2017 at 02:34 IST