सेपियन्स आणि त्यानंतरचे होमो डय़ूइसही युवाल हरारी यांची दोन जाडजूड पुस्तके हिब्रूतून इंग्रजीत आली आणि देशोदेशींच्या तरुणांचा चर्चाविषय झाली! हरारी यांनी त्यांच्या पस्तिशीत लिहिलेला मानवाचा इतिहास म्हणजे सेपियन्स’.. तो सर्व संदर्भ कोळून प्याल्यानंतर, परंतु तरीही चौकटीबाहेरचे विचार मांडत लिहिलेल्या या पुस्तकांची क्रमश: ओळख करून देणारी ही साप्ताहिक लघुमालिका. पहिला भाग अर्थातच, ‘सेपियन्सच्या मध्यापर्यंतचा..

या ग्रहावर मानवप्राणी जन्माला आला, उत्क्रांत झाला आणि त्याने अवघ्या जगाचा भूगोल आपल्या अवघ्या दोन लाख वर्षांच्या कालावधीत बदलून टाकला. तो आग नियंत्रित करायला शिकला, त्याने गुंतागुंतीच्या भाषेचा विकास केला, तो इतर प्राण्यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घ्यायला शिकला आणि त्याने लाखो एकर जमिनीत शेती लावली. अश्मयुगातून ताम्रयुगात आणि त्यातून पुढे लोहयुगात प्रवास करताना माणसाच्या वागण्यात, चालण्याबोलण्यात, सामाजिक व्यवहारांत असंख्य बदल घडत गेले. या बदलांमधून माणूस आणि माणुसकीची व्याख्या बदलत गेली; ती थेट आजच्या तंत्रयुगाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत येऊन ठेपली आहे. आपण येथपर्यंत कसे आलो आणि या प्रवासात आपल्यात घडत गेलेले बदल कोणते, याची सांगोपांग चिकित्सा युवाल नोह हरारी यांनी आपल्या ‘सेपियन्स – अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्य़ूमनकाइंड’ या पुस्तकात केली आहे. मूळ हिब्रू भाषेत लिहिलेल्या आणि २०११ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची आता तीसहून अधिक भाषांत भाषांतरे प्रकाशित होऊन त्यांच्या लाखो प्रती जगभर विकल्या जात आहेत. बिल गेट्स, मार्क झकरबर्ग आणि बराक ओबामा यांसारख्यांनी हे (इंग्रजी) पुस्तक वाचण्यासाठी सामान्य जनतेला आवाहन केले, यावरून अलीकडच्या काळातील हे महत्त्वाचे इंग्रजी पुस्तक आहे, यावर कुणाचेही दुमत होणार नाही.

युवाल हरारी हे हिब्रू विश्वविद्यालयात इतिहासतज्ज्ञ म्हणून काम करतात, असे असले तरी इतिहासतज्ज्ञांजवळ असलेला बोजडपणा ते पाळीत नाहीत. सबंध मानवजातीचाच इतिहास लिहून काढणे आणि तो व्यवस्थित ज्ञात परिप्रेक्ष्यात मांडणे हे तसे जिकिरीचेच काम होते आणि युवाल हरारींचे वय अवघे ४१ आहे हे लक्षात घेता हे पराकोटीचे आव्हान त्यांना सहजपणे कसे झेपले याबद्दल कुतूहल वाटते. माणसाच्या एकूण वाटचालीचे एक समग्र चित्र ‘सेपियन्स’ वाचकासमोर उभे करते.

हे चित्र उभे करताना गतकाळातल्या चांगल्या-वाईट गोष्टींवर टिप्पणी करताना लेखक काही नेमके प्रश्न उभे करीत जातो; त्यातून ‘हा इतिहास आता आपल्याला नेमका कुठे घेऊन जाईल?’ यावरही विचार करतो आणि हे करीत असताना जीवशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्रातल्या आजवरच्या ज्ञात व्याख्यांचा आणि शोधांचा वापर करतो. जीवशास्त्राशिवाय इतिहास परिपूर्ण होत नाही. त्याबरोबरच, ज्या घटना मानवप्राण्याच्या इतिहासात घडल्या त्याने समाजातल्या व्यक्तींवर काय परिणाम केले, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात काय बदल घडले आणि सर्वात शेवटी ‘या बदलांमुळे लोकांचे व्यक्तिगत आयुष्य सुखी झाले का?’ या प्रश्नाचा शोध लेखक पुस्तकभर घेत राहतो. डार्विनच्या मूलभूत शोधांनंतर जगभरात जगाचा एकूण इतिहास, सामाजिक विकास आणि उत्क्रांतीवर विपुल प्रमाणात लेखन झाले आहे, परंतु ते लिखाण कुठेही माणसाच्या सुखी होण्याबद्दल वा आनंदी होण्याबद्दल र्सवकष विचार करीत नाही* वा त्यायोगे काही प्रश्न मांडत नाहीत. हरारी हे प्रश्न बिनदिक्कत मांडतात आणि ते मांडण्यासाठी आधीच्या ग्रंथांच्या अभ्यासाचा वापर केवळ संदर्भ म्हणून, तरीही पुरेपूर करतात. चंगेज खानापासून ते हिटलपर्यंत आणि जगज्जेत्या सम्राटांपासून राजेमहाराजांपर्यंत इतिहासाचे आकलन करताना इतिहास हा ‘सामथ्र्य’ या एका मुद्दय़ावर बराचसा केंद्रित झालेला आहे, यावर लेखक बोट ठेवतो. सामथ्र्य मिळविण्याची माणसाची तहान हजारो वर्षे जुनी आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर सत्ता आणि सामथ्र्य मिळविणे तसे माणसाला सोपे आहे; परंतु हे सामथ्र्य मिळाल्यानंतर त्यातून सार्वकालिक आनंद वा स्थिरता अद्याप कुणालाही मिळविता आलेली नाही.

‘सामथ्र्य आणि आनंदाचे नेमके नाते काय?’ हा एक मूलभूत प्रश्न सेपियन्सच्या मुळाशी आहे. यातून गरज आणि अपेक्षा यात असलेला फरक (तफावत) आणि त्यातून आलेली आनंदाची व्याख्या हे बुद्धाचे मूलभूत तत्त्व हरारी आपल्या अभ्यासात घेतात. गेल्या काही वर्षांत माणसांच्या मूलभूत गरजा या बऱ्याचशा पूर्ण होऊ लागल्या आहेत. भुकेचा प्रश्न आजही अस्तित्वात असला तरी जगात भूकबळींपेक्षा अतिखाण्यामुळे जास्त लोकांचा मृत्यू होतो आहे. जगातल्या काही भागांत युद्धे आजही चालू असली तरी त्यात होणाऱ्या हानींचे प्रमाण हे इतिहासातल्या युद्धातल्या हानीच्या प्रमाणापेक्षा बरेच कमी आहे. युद्धापेक्षा जास्त लोक हे आत्महत्येमुळे मरत आहेत. त्यामुळे एका अर्थाने माणसाला दुसऱ्या माणसाकडून असलेल्या धोक्यांपेक्षा स्वत:पासून असलेला धोका जास्त मोठा आहे. यांत्रिकीकरण आणि औद्योगिक विकासाने माणसाच्या आयुष्यात निरनिराळ्या सुविधा आल्या असल्या तरी त्याच्या मेंदूची संरचना आणि त्याच्या शरीराची जीवशास्त्रीय रचना आजही प्रागैतिहासिक काळातलीच आहे. माणसाची सुखाची व्याख्या ही त्याच्या मेंदूत आणि शरीरात असणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियेशी निगडित आहे. त्यामुळे राजकारण, अर्थकारण वा भौतिक विकास हे माणसाला ‘खरे सुख’ देऊ शकत नाहीत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे भौतिक सुखाचा उपभोग घेत असताना ते सुख एका ठरावीक काळानंतर संपुष्टात येईल याची मानवाला भीती वाटत राहते; यातून पुढे मग तेच सुख अधिकाधिक कसे मिळविता येईल याचा (भावनात्मक) विचार माणूस करू लागतो आणि त्यातून त्याची तृष्णा वाढत जाते. सुखे मिळविण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांत माणूस अधिकाधिक सामथ्र्य मिळवत गेला, किंबहुना माणसाची वाटचाल इतक्या प्रगत जीवात होण्यामागची प्रेरणा ही त्या सामर्थ्यांची आसच आहे. या सामर्थ्यांचे सुखात मात्र रूपांतर न करता आल्याने मानवप्राणी सदैव तृष्णेने आणि त्यामुळेच दु:खाने ग्रासलेला असतो. दु:खाचे कारण तृष्णा आहे हे बुद्धाचे मूलभूत तत्त्वज्ञान हरारी जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरणमय जगातली उदाहरणे दाखवून सप्रमाण सिद्ध करून दाखवितात, त्यामुळे ते फक्त तत्त्वज्ञानच न राहता एक परिपूर्ण सिद्धांत बनते.

‘माणूस आजच्यापेक्षा इतिहासात जास्त सुखी होता’ हे विधान तपासून पाहण्यासाठी युवाल कृषिसंस्कृतीचे उदाहरण घेतात. साधारण बारा हजार वर्षांपूर्वी माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. या काळात पशुपालन करताना पशूंना होणारे अनेक आजार आणि जंतुसंसर्ग माणसाला व्हायला सुरुवात झाली आणि त्याची शारीरिक क्षमता कमी झाली. शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणसाच्या आहारात बहुविध प्रकारचे प्राणी, निरनिराळी फळे, अळिंब्या (मशरूम) आणि वनस्पती होत्या; त्याहीमुळे मानवाला सर्व प्रकारची जीवनसत्त्वे आणि क्षार- अगदी विपुल प्रमाणात- मिळतच होते. शेतीच्या शोधानंतरही पश्चिम आशियात गहू, दक्षिण अमेरिकेत बटाटा वा पूर्व आशियात तांदूळ यांसारख्या एक वा दोनच मुख्य पिकांचा समावेश माणसाच्या आहारात होता. हा आहार जीवनसत्त्वांच्या हिशेबातून विषम, शरीराच्या क्षारांच्या गरजांमध्ये तूट निर्माण करणारा होता. याच कृषिसंस्कृतीने सामाजिक विषमता आणि शोषणालाही जन्म दिला. शेतीच्या शोधापूर्वी- शिकारी आणि संकलन व्यवस्थेत- मानवी संबंधाधारित विषमता आणि शोषण यांच्यासाठी खूपच कमी जागा होती. शेतीच्या शोधानंतर नगरे, राज्ये आणि साम्राज्यांची निर्मिती झाली, ज्यातून सत्ताकेंद्रे तयार होऊन व्यवस्था मूठभर लोकांच्या फायद्यासाठी चालू लागली आणि लाखो लोक वेठबिगारीत वा गुलामीत ढकलले गेले. शेतीच्या शोधाने मजुरांची निर्मिती केली आणि व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेतून मजुरांची कधीही सुटका झाली नाही. शेतीच्या शोधानंतर तयार झालेली विषमता आणि त्यातून तयार झालेले मजूर आजही जगभर कष्टाचे आयुष्य जगत आहेत. आज त्यांची संख्या अब्जावधींच्या घरात जाते. आज चीन वा भारताच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांचे आयुष्य शेतीच्या शोधापूर्वीच्या माणसांपेक्षा कैकपटीने जास्त खडतर आहे.

निसर्गातले प्राणी, पक्षी आणि अन्य जीव कळपात राहू शकतात, पण कळपातल्या सदस्यांची संख्या एका ठरावीक मर्यादेच्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यांचे आपसातले सहकार्यही मर्यादित राहते. मानवप्राण्याच्या बाबतीत हे सहकार्य प्रचंड मोठे असू शकते. हजारो वा लाखो, कोटय़वधी माणसे एकत्र येऊन सहकार्याने एखाद्या कंपनीची स्थापना करू शकतात, एखाद्या राष्ट्राची निर्मिती करू शकतात. या सहकार्याचे विश्लेषण करताना ‘त्याच्या मुळाशी काल्पनिक कथा व त्याद्वारे मांडलेल्या संकल्पना असतात’ असा पटणारा तर्क युवाल हरारी ‘सेपियन्स’मध्ये मांडतात. एकमेकांशी ओळख नसतानाही मूलभूत कथ्यांच्या (नॅरेटिव्हच्या), संकल्पनांच्या आधारावर आपण दुसऱ्या माणसांशी सहकार्य करतो. जेव्हा प्रत्येक माणूस एकाच प्रकारच्या कथांवर, पौराणिकतेवर अवलंबून राहतो तेव्हा हे सहकार्य सुलभ आणि मोठय़ा प्रमाणावर घडणे शक्य आहे, असेही दिसून येते.. याच्या उदाहरणादाखल ‘एखाद्या चिम्पान्झीजवळ एकच केळे असले आणि ते तुम्ही मागून घेतले आणि ती याचना करताना तुम्ही या पुण्याच्या बदल्यात तो चिम्पान्झी मेल्यानंतर स्वर्गात जाईल जिथे त्याला भरपूर केळी मिळतील असे सांगितले, तर कुठलाही चिम्पान्झी त्यावर विश्वास ठेवणार नाही. यामुळेच चिम्पान्झी मोठमोठी चर्चेस, सिनेगॉग्ज वा देवळे बांधू शकत नाहीत वा धर्मयुद्ध पुकारीत नाहीत!’ हे फक्त धार्मिक बाबतीतच लागू नसून राजकीय, कायदेव्यवहार, अर्थशास्त्र या क्षेत्रांतही लागू पडते. उदाहरणार्थ, कायद्यांच्या परिभाषेत आज ‘मानवाधिकार’ ही सर्वाधिक लोकप्रिय, त्या क्षेत्रात सर्वाधिक दबदबा आणि स्वीकार असलेली संकल्पना आहे. माणसांची राजकीय व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्था पूर्णत: मानवाधिकाराशी संबंधित आहे; परंतु व्यवस्थित पाहता मानवाधिकार ही वास्तवातली गोष्ट नसून फक्त एक कल्पना आहे.. काही शेकडा वर्षे मागे गेल्यास सरंजामशाहीत ‘मानवाधिकार’ या संकल्पनेबद्दल कुठलीही माहिती वा त्याची रीतसर अंमलबजावणी केली गेली असल्याचे दिसून येत नाही.

याचा अर्थ मानवाधिकार हे झूट आहेत, मिथ्या आहेत, असे मानायचे का? ‘सेपियन्स’ या पुस्तकातील उत्तर अर्थातच नकाराकडे झुकते. उलट, संकल्पनांची वाटचाल हाच मानवी इतिहास, असे ‘सेपियन्स’ची पुढील पाने सांगतात. हे आपण पुढल्या भागात- पुढल्या शनिवारी पाहू.

सेपियन्स – अ ब्रीफ हिस्टरी ऑफ ह्य़ूमनकाइन्ड

लेखक : युवाल नोह हरारी

प्रकाशक : हार्पर

पृष्ठे : ४६४, किंमत : १४३१ रुपये

(* उदाहरणार्थ, ‘मॅन्स वर्ल्डली गुड्स’ हे लिओ ह्य़ूबरमॅन यांचे पुस्तक माणसाच्या भौतिक प्रगतीचा इतिहास सांगण्याच्या मिषाने, उत्पादन प्रक्रियांतील शोषक-शोषित संबंधांचा आढावा घेते.)

 

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com