खेळ आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हा विचार भारताच्या तसेच दक्षिण आशियाच्या संदर्भात अगदी ठामपणे मांडणारे पुस्तक कोलकाता येथील पश्चिम बंगाल राज्य विद्यापीठात इतिहासाचे शिक्षक असलेल्या कौशिक बंडोपाध्याय यांनी लिहिले आहे. खेळाचा समाजाच्या जडणघडणीवर परिणाम होतो, तसाच समाजाचा खेळाच्या विकासावरही होतो. त्यामुळे खेळ आणि समाज हे एकमेकांशी जोडलेल्या आणि एकमेकांवर काही अंशी अवलंबून राहिलेल्या दोन बाबी आहेत. जेम्स वॉलव्हिन यांनी ‘स्पोर्ट्स, सोशल हिस्ट्री अँड द हिस्टॉरियन’ या दीर्घ निबंधातून १९८४ मध्ये खेळ आणि समाज यांच्यावर भाष्य केले होते. ‘एखाद्या खेळाचा इतिहास आणि त्यात होत गेलेले बदल याचा समाजावर तितकाच प्रभाव पाडतो,’ असे ठाम मत वॉलव्हिन यांनी आपल्या पुस्तकातून मांडले होते. त्यांच्या या पुस्तकाने अनेक लेखकांना खेळ आणि समाज यांच्यावर सखोल अभ्यास करण्यास भाग पाडले आणि गेल्या तीन दशकांत या संदर्भात अनेक पुस्तके आली. यात दक्षिण आशियाई देशांतील क्रीडा इतिहास हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा होता. रामचंद्र गुहा यांच्या ‘कॉर्नर ऑफ अ फॉरेन फील्ड’ (२०१४) यासारख्या पुस्तकात प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळाला केंद्रस्थानी ठेवून लिखाण झाले. मात्र बंडोपाध्याय यांनी ‘स्पोर्ट, कल्चर अ‍ॅण्ड नेशन’ या नव्या पुस्तकातून दक्षिण आशियाई देशांमधील आजच्या, अधोरेखित न झालेल्या पैलूंवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. प्रामुख्याने फुटबॉल आणि क्रिकेट या खेळांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. फुटबॉलविषयी तीन, तर क्रिकेटविषयी पाच दीर्घलेख बंडोपाध्याय यांच्या पुस्तकात आहेत.
फुटबॉलविषयी मत मांडताना लेखकाने संपूर्णपणे भारतीय फुटबॉलचा इतिहास, त्याचा विकास आणि पडझड याला अधिक महत्त्व दिले आहे. क्रिकेट हा आशियाई उपखंडातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे, त्याचा तेथील सामाजिक जीवनशैलीवर कसा परिणाम होत गेला याचे उदाहरणासहित लिखाण करण्यात आलेले आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांपुरता मर्यादित असलेला हा खेळ आता अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव आणि भूतानमध्येही मुळे रुजवू लागला आहे.
दक्षिण आशियाई देशांमध्ये खेळाचा प्रभाव दिसतो त्यापेक्षा अधिक सखोल आहे, असे हे पुस्तक सांगते.. विसाव्या शतकापासून खेळामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक बदलही झाले आहेत. साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, हिंसा, कौशल्य, विभाजन, बुद्धिप्रामाण्यवाद, वसाहतवाद, स्थलांतर या सर्व घटकांवर खेळाचा पगडा जाणवत होता. या सर्व बदलांमध्ये खेळ आणि समाज यांच्यात एकाच वेळी अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे दक्षिण आशियाई भागातील खेळ, संस्कृती, राजकारण आणि प्रादेशिक सहकार्य यांच्यातील क्लिष्ट संबंध येथे अधोरेखित करण्यात आले आहेत. ब्रिटिशांच्या अमलाखालील भारतात राष्ट्रवाद, कम्युनिझम, प्रादेशिकतावाद, संस्कृती, आदींवर क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांचे प्रतिबिंब जाणवत होते. लेखकाने पहिल्या टप्प्यात फुटबॉलवर लक्ष केंद्रित करताना, ब्रिटिश काळात आणि त्यानंतर फुटबॉलमध्ये होत गेलेले बदल आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम यावर भाष्य केलेले आहे. एकोणिसाव्या शतकात भारताकडे फुटबॉल क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता होती. स्वातंत्र्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात आशियाई देशांमध्ये भारताचा दबदबा होता. १९४८ आणि १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघाने सहभाग घेतला होता. १९६२च्या आशियाई स्पध्रेत भारताने सुवर्णपदक पटकावून आपली मक्तेदारी अधोरेखित केली, परंतु यामध्ये सातत्य राखण्यात भारताला अपयश आले. १९६० नंतर भारताला आत्तापर्यंत ऑलिम्पिकची पात्रता मिळवता आलेली नाही. त्यामुळे ‘निद्रावस्थेत असलेला राक्षस’ अशी भारताची ओळख बनलेली आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात युवा फुटबॉलपटूंची कमतरता नाही. गरज आहे ती त्यांना योग्य व्यासपीठ देण्याची. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रयत्नांतून या युवा खेळाडूंना ते व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, परंतु त्यालाही अनेक मर्यादा असल्याने या खेळाचा विकास मर्यादित राहिला. याला मणिपूरसारखे ईशान्य भारतीय राज्य अपवाद ठरले. ब्रिटिशांनी सर्वाधिक काळ घालवलेल्या मुंबई, मद्रास, कोलकाता आणि कराची येथे या खेळाची पाळेमुळे रोवली असली तरी मणिपूरने फुटबॉलचे वटवृक्ष वाढवले.
तेथील तरुण या खेळाकडे कारकीर्द म्हणून पाहू लागले
आणि आजच्या घडीला येथून अनेक नामवंत खेळाडू घडत आहेत. लेखकाने हे बदल टिपतानाच, ईशान्येकडील फुटीरतावादाला फुटबॉल हे उत्तर ठरत असल्याची बाजू मांडली आहे!
भारत हा क्रिकेटवेडा देश आहे आणि तो येथील प्रत्येक नागरिकाच्या मनाजवळचा विषय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या खेळाविषयी बारीकसारीक माहिती जाणून घेण्यात प्रत्येकाला रस असतोच.
हाच धागा पकडून बंडोपाध्याय यांनी क्रिकेटचा भारतीय उपखंडातील इतिहास, त्यात होत गेलेले स्थित्यंतर यावर अभ्यासपूर्वक लिखाण केले आहे. क्रिकेटमध्ये राजकारण्यांचा वाढत चाललेला हस्तक्षेप अभ्यासताना २००६च्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवडणुकीची छाननी पुस्तकात केलेली आहे.
या अभ्यासानंतर अर्थात ‘पैसा आहे म्हणून राजकारण्यांना रस’ हा सामान्य क्रिकेटप्रेमीला माहीत असणारा निष्कर्ष येथेही आहे; परंतु लेखकाने पूर्ण अभ्यासान्ती तसे म्हटले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वैर क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेर पाहायला मिळते. लेखकाने हेही नाटय़ अचूक मांडले आहे. कारगिल युद्धाआधी झालेली भारत-पाकिस्तान मालिका आणि त्यानंतरची कटुता यांचा आढावा घेणारे एक प्रकरणच आहे. बांगलादेशसारखे देश क्रिकेटमधून आपले वेगळेपण व्यक्त करण्याच्या प्रयत्नास लागले आहेत, असा निष्कर्षही आणखी एका प्रकरणात आहे. त्या देशांचे हे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. पण क्रिकेटमुळे आजच्या काळातही त्या देशांच्या समाजकारणावर परिणाम होतो आहेच, याकडे हे पुस्तक लक्ष वेधते.
एकूणच दक्षिण आशियाई देशांमधील खेळांचा इतिहास आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम, याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे. या पुस्तकाची अनेक वैशिष्टय़े आहेत. एक तर, लेखकाने सनावळ्यांनुसार इतिहास सांगण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. त्याऐवजी, अभ्यासविषय किंवा उपविषय आधी निश्चित करून त्यावरच लिहिणे, असे तंत्र येथे वापरलेले दिसते.
ऑलिम्पिकमधील झुंज आणि आशियाई क्रीडा स्पर्धात विजय इथपर्यंतचा काळ एका प्रकरणात, तर मणिपूरमधील फुटबॉलचा विकास दोन प्रकरणांमध्ये, यांवरच या पुस्तकातील फुटबॉलविषयक लिखाणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. तर क्रिकेटविषयक लिखाणात १९९० नंतरच्या काळातील भारत-पाक (क्रिकेट) संबंध, क्रिकेट संघटनांमध्ये राजकारण्यांचा प्रवेश तसेच बांगलादेशात १९७१ मध्ये या देशाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि नंतर झालेला क्रिकेटचा प्रसार, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आदी देशांनी राजकीय अस्थैर्याशी सामना करतानाच क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी टाकलेली पावले आणि त्या देशांतील क्रिकेटची वाढती लोकप्रियता, यांवर लेखकाचा भर आहे. आठवणी सांगणारे हे पुस्तक नाही. फक्त एकाच (फील्ड नोट्स फ्रॉम कोलंबो टू काबूल) लेखकाचा सूर आत्मपर आहे.
या पुस्तकाची प्रकरणे एकमेकांशी जुळलेली वाटत नाहीत. मात्र मणिपूर (फुटबॉल) आणि क्रिकेट (श्रीलंका) यांच्याबद्दल एक समान निष्कर्ष निघतो, तो म्हणजे (अनुक्रमे १९९३ची संतोष ट्रॉफी आणि १९९६चा विश्वचषक) जिंकल्यानंतरच लोकांना या खेळात अधिक रस वाटू लागला. ‘खेळ म्हणजे हारजीत’ हे खरे असले तरी, खेळाच्या समाजकारणात जीत अधिक महत्त्वाची ठरते- मग ती प्रत्यक्ष खेळातील असो की खेळाच्या राजकारणातील!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com

 

स्पोर्ट, कल्चर अँड नेशन- पर्स्पेक्टिव्हज् फ्रॉम इंडियन फुटबॉल अँड साउथ एशियन क्रिकेट.
लेखक : कौशिक बंडोपाध्याय
प्रकाशक : सेज पब्लिकेशन्स
पृष्ठे : २१२ , किंमत : ६९५ रु.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sport culture and nation
First published on: 04-06-2016 at 03:02 IST