फ्रेडरिक फोर्सिथ या लेखकाच्या १३ कादंबऱ्या दणकून खपल्या, कारण त्या केवळ हेरगिरीच्या चातुर्यकथा नव्हत्या. या साऱ्याच पुस्तकांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाची, दहशतवादाने बदललेल्या समीकरणांची पक्की जाण होती आणि नवी संहारतंत्रं, आजघडीला असलेल्या राक्षसी महत्त्वाकांक्षा, यांचं भानही होतं. फोर्सिथ हा वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी ब्रिटिश हवाई दलात वैमानिक झाला आणि दोनच वर्षांत ही नोकरी सोडून पत्रकार म्हणून जगू लागला. मग ऐन पंचविशीत ‘रॉयटर्स’सारख्या वृत्तसंस्थेसाठी पूर्व (कम्युनिस्ट) बर्लिनमध्ये मुख्य बातमीदार झाला.. या विकिपीडियाछाप माहितीपेक्षा गेल्या आठवडय़ातली बातमी महत्त्वाची आहे..
वयाच्या ७७व्या वर्षी अखेर फोर्सिथ यांनी कबूल केलं आहे- ‘मी ‘एमआय-सिक्स’ या ब्रिटिश हेरसंस्थेसाठी काम करत होतो.’ ही कबुली आणि अन्य तपशील असलेलं त्यांचं आत्मपर पुस्तक येत्या १० सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे. ब्रिटिश वृत्तपत्रांना यातला जो मसाला हाती लागला (किंवा प्रसिद्धीसाठी त्यांच्या हाती मुद्दाम देण्यात आला), त्यावर विश्वास ठेवायचा तर, फोर्सिथ हे ‘एमआय-सिक्स’कडून छदामही न घेता काम करत होते. यापैकी, पूर्व जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरातून गोपनीय कागदपत्रांचं एक पुडकं एका जर्मन ‘मदतगारा’कडून घेऊन यायचं, ही कामगिरी मोठी असल्याचं ब्रिटिश दैनिकं सांगताहेत. ड्रेस्डेनमधल्या आल्बर्टिनम म्युझियमच्या प्रसाधनगृहाच्या दरवाजाखालून ही देवाणघेवाण झाली, हे खुद्द फोर्सिथ यांनी किती रंगवून सांगितलं असेल? नायजेरियातला १९६०च्या दशकातला उठाव, ऱ्होडेशियातला संहार यांचं ओघवतं वृत्तांकन करतानाच फोर्सिथ हे ‘एमआय-सिक्स’ला तिथली गोपनीय माहिती पुरवत. हे सारं आपण कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता -म्हणजेच ‘बाहेरून’- एखाद्या स्वयंसेवकासारखं करत होतो, हे फोर्सिथ यांचं म्हणणं आहे. मात्र ‘फोर्सिथ हेरच असणार’ ही वाचक-चाहत्यांनी दिलेली दाद अगदी सार्थ ठरावी, अशा काही आठवणी या पुस्तकात आहे.. यापैकी एक, एका पोरीसह पोहायला जाऊन ‘प्रेम केल्या’चीही आहे.
हेरकथा रंगवून सांगावी, तशाच स्वत:च्या आठवणी फोर्सिथ यांनी सांगितल्या असणार.. त्यामुळे त्यांचं हेरपणच वाचकांवर ठसणार, हे काय सांगायला हवं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spy agent but out of the country
First published on: 05-09-2015 at 03:24 IST