राष्ट्रवाद, जात, धर्म, नियोजन, ‘सबसिडी’, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण या महत्त्वाच्या विषयांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मांडलेले काही विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. ते विचार वेचून, त्यांचे संकलन डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी पुस्तकरूपात आणले. त्या पुस्तकाविषयी, तसेच अमेरिकी स्वातंत्र्याच्या सनदेचे लेखक थॉमस जेफरसन आणि डॉ. आंबेडकर यांचे साम्य-भेद शोधणाऱ्या पुस्तकाबद्दल.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठी व देशातील समाजासाठी मोठे वैचारिक योगदान आहे. भारतीय समाजाच्या उन्नतीतील अडथळे कोणते, नेमका तो काय आजार आहे, याचे निदान त्यांनी केले आणि त्यावर प्रभावी उपाय किंवा उपचारही सांगितला. भारत आणि भारतीय समाजाशी संबंधित त्यांनी स्पर्श केला नाही, असा एकही विषय शिल्लक राहिला नाही. राजकीय, सामाजिक, आर्थिक, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा सर्वच विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण. म्हणूनच केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील राजकीय मुत्सद्दय़ांनी व विचारवंतांनी त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून यथोचित गौरविले आहे. बाबासाहेब हे केवळ वैचारिक मांडणी करणारे विचारवंत किंवा तत्त्वज्ञच नव्हते, तर ते एक कृतिशील महापुरुष होते. राज्य शासनाने त्यांच्या विविध विषयांवरील लेखन व भाषणांचे आतापर्यंत चोवीस-पंचवीस खंड प्रकाशित केले आहेत. त्यांनी त्या-त्या काळात मांडलेले राजकीय, सामाजिक, आर्थिक, परराष्ट्र धोरण, संविधान यांवरील विचार या लेखन व भाषणांच्या खंडांमध्ये आपणास वाचायला मिळतात. बाबासाहेबांचे विचार आजच्या काळातही कसे सुसंगत व महत्त्वाचे आहेत, हे लोकांसमोर आणण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य, माजी खासदार व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या लेखन व भाषणे खंडातील डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचारधन संकलित करून ‘द इसेन्शिअल आंबेडकर’ या नावाने ग्रंथरूपात ते वाचकांसमोर आणले आहेत. चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत यांच्यासाठी हा संकलित ग्रंथ मौलिक ठरणार आहे. या संपादित ग्रंथातील बाबासाहेबांच्या विविध विषयांवरील लिखाणाची निवड, त्याची मांडणी यातून डॉ. मुणगेकर यांचे परिश्रम दिसतात.

जातिव्यवस्था हा भारतीय समाजाला जडलेला जुनाट आजार. हा आजार मुळापासून उखडून टाकल्याशिवाय भारतीय समाजाची व भारताची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होती. त्याचे महत्त्व आजही कमी झालेले नाही, नव्हे अधिक वाढले आहे. बाबासाहेबांचा ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ (अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट) हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात त्यांनी जातिव्यवस्थेची लक्षणे, त्याचे परिणाम, ती नष्ट करण्याच्या प्रभावी उपायांची सैद्धांतिक मांडणी केली आहे. जातिव्यवस्थेचे विस्तारित रूप म्हणजे अस्पृश्यता. काही लोक अस्पृश्यता संपविण्याची भाषा करतात; परंतु जात नष्ट केल्याशिवाय अस्पृश्यता संपणार नाही, असे त्यांचे मत होते. देशात काही भागांमध्ये अजूनही कडवी अस्पृश्यता पाळली जाते, याचे कारण जातिव्यवस्था अजून तसूभरही हलली नाही.

हजारो वर्षे ही व्यवस्था कशी टिकून आहे, याचीही बाबासाहेबांनी त्यात चर्चा केली आहे. उतरंडीवर आधारलेल्या या व्यवस्थेत खालच्याने वर येऊ नये असे वरच्याला वाटते. खालचा वर आला तर तो आपली बरोबरी करेल, ही त्याला भीती वाटते. म्हणून प्रत्येक वरचा खालच्याला खालीच दाबत राहतो. आपले वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो. म्हणजे, प्रत्येक जात ही व्यवस्था टिकविण्यासाठी धडपडत असते. त्यात अजून तरी कुठे बदल झाला आहे? काही लोकांचे म्हणणे असे की, पोटजाती नष्ट केल्या की जातिव्यवस्था संपुष्टात येईल. त्यावर बाबासाहेबांचे मत असे की, पोटजाती नष्ट केल्याने मूळ जात बलवान होण्यास मदत होईल आणि ती अधिक घातक ठरणारी आहे. केवळ आंतरजातीय भोजने आयोजित करण्याने जातजाणिवा नष्ट होऊ शकत नाहीत. जातिनिर्मूलनाचा आंतरजातीय विवाह हा एक उपाय आहे. कारण जातिअंतर्गत विवाहसंस्थांनी ही व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. जात ही एक मानसिकता आहे. जातीच्या उच्चाटनासाठी तिचा भक्कम आधार असलेल्या व जातिव्यवस्थेला मान्यता देणाऱ्या धर्मशास्त्रांचे पावित्र्य उद्ध्वस्त करणे हा जातिअंताचा खरा व प्रभावी उपाय आहे, असे त्यांचे मत आहे. आजही जातिव्यवस्था टिकून आहे, याचे कारण केवळ बाबासाहेबांचा उदोउदो करणारे त्यांनी जातिअंताचा सुचविलेला उपाय अमलात आणू शकले नाहीत, हे उघड सत्य आहे.

राष्ट्रवादाबद्दल खूप चर्चा होते. भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भातील वेगळेच वास्तव त्यांनी मांडले आहे. नवीन राष्ट्रवाद कसा आहे हे बाबासाहेब मार्मिक शब्दांत सांगतात. बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांवर अधिकार किंवा सत्ता गाजविणे म्हणजे राष्ट्रवाद. अल्पसंख्याकांनी सत्तेत वाटा मागितला की तो राष्ट्रवाद होत नाही, तर जातीयवाद होतो. ऐंशी वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी नवराष्ट्रवादाची केलेली व्याख्या उत्तर प्रदेशातील ताज्या राजकीय सत्तांतराच्या पाश्र्वभूमीवर आजही तंतोतंत खरी वाटते. राष्ट्राबद्दल प्रेम, आदर व्यक्त करण्याऐवजी अल्पसंख्याकांना किंवा आपल्या विरोधकांना दडपून टाकण्यासाठी बहुसंख्याकांकडून राष्ट्रवादाचा वापर केला जात असल्याचे कटू वास्तव अलीकडे अनेक घटनांमधून समोर आले आहे.

हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करणे ही बाबासाहेबांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. बाबासाहेब धर्म नाकारत नाहीत, परंतु ‘धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी’ असा मूलभूत प्रश्न ते उपस्थित करतात. म्हणून ते धर्माने ज्यांच्यावर अन्याय केला आहे, अशांना संदेश देतात- ‘माणूस बनायचे असेल तर धर्मातर करा, संघटित होण्यासाठी धर्मातर करा, सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्मातर करा; समता, स्वातंत्र्य, बंधुभावाच्या प्रस्थापनेसाठी धर्मातर करा.’ जो धर्म तुम्हाला माणुसकीची वागणूक देत नाही, त्या धर्मात का राहता, असा त्यांचा सवाल आहे.

केंद्र सरकारने २०१३ मध्ये गरिबांसाठी अन्नसुरक्षा कायदा केला; परंतु १९५२ मध्ये देशाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना बाबासाहेबांनी गरिबांना अन्नधान्यासाठी अनुदान देण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख व बाबासाहेब यांच्यात वैचारिक जुगलबंदी झाली; परंतु अर्थमंत्री शासकीय धोरणाला बांधील होते. बाबासाहेबांचे त्यावरील भाषण म्हणजे एखाद्या विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि त्यांची वैचारिक उंची किती असू शकते याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्याच कालखंडात इंग्लंडने दिलेली अन्नधान्यावरील सबसिडी आणि त्यात पुन्हा केलेली कपात याचे उदाहरण त्यांनी दिले. परंतु अन्नधान्यावरील अनुदान कमी केले तरी, इंग्लंडने अन्य पर्यायी सवलती कोणत्या दिल्या याचीही माहिती त्यांनी दिली. अन्नधान्यावरील अनुदान कमी केले तरी प्राप्तिकराची सवलत वाढवली, निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढवले, कौटुंबिक भत्त्यात वाढ केली, त्यातून ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल अशा उपाययोजना केल्या, अशी उदाहरणे देऊन त्यांनी भारतातही गरिबांसाठी सवलतीच्या दरात अन्नधान्य दिले पाहिजे, असा आग्रह धरला होता.

बाबासाहेबांनी त्यांची राजकीय भूमिकाही स्पष्ट केलेली आहे. बहिष्कृत वर्गाला त्यांनी राजकीय सत्ता मिळविण्यासाठी संघटित होण्याचा संदेश दिला आहे. परंतु त्यांनी स्वतंत्र पक्षाचा आग्रह धरला आहे. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी असे म्हटले आहे की, काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत प्राप्त झाले नाही, तर त्यांना मदतीसाठी तुमच्याकडे यावे लागेल. त्या वेळी आपल्या अटी व शर्तीवर सरकार स्थापन करण्यास आपण राजकीय पाठिंबा देऊ शकतो. बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांनी व नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या स्वंतत्र बाण्याच्या राजकारणाची महती समजून घ्यायला हरकत नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पात लष्करावर केलेल्या अवाजवी तरतुदीबद्दलही त्यांनी सरकारवर धारदार टीका केली. ते म्हणाले की, अन्य देशांशी मैत्री व शांतता टिकविणे हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे मूलतत्त्व असल्याचे सांगितले जाते; मग आपला शत्रू कोण आहे, की ज्यासाठी मोठी किंमत मोजून आपणास लष्कर सांभाळावे लागते हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यांनी केलेला हा सडेतोड युक्तिवाद त्या वेळच्या केंद्र सरकारच्या परराष्ट्र व संरक्षणविषयक धोरणातील फोलपणा उघड करणारा होता. भारताला संसदीय लोकशाहीचीच का आवश्यकता आहे, कोणत्याही प्रकारची विषमता लोकशाहीला कशी मारक ठरू शकते, भाषावार प्रांतरचना, भारताची अर्थव्यवस्था, नियोजन इत्यादी विषयांवरील बाबासाहेबांच्या मौलिक विचारांचे संकलन या ग्रंथात आहे. आजच्या काळाचा विचार करतानाही अनिवार्य ठरेल असे हे डॉ. आंबेडकरांचे लेखन डॉ. मुणगेकरांनी संकलित स्वरूपात या पुस्तकात दिल्याने, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते अनिवार्यच ठरणारे आहे.

  • द इसेन्शिअल आंबेडकर
  • संपादन : डॉ. भालचंद्र मुणगेकर
  • प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स
  • पृष्ठे : ४५६, किंमत : ३१२ रुपये

 

– मधु कांबळे

madhu.kambale@expressindia.com

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The essential ambedkar marathi articles
First published on: 15-04-2017 at 02:43 IST