डॉ. सुनीता सावरकर

‘जनता’ या आंबेडकरी चळवळीच्या महत्त्वाच्या वृत्तपत्रासाठी बहुरूपे गावातील आदिवासी स्त्रियांनी एक एक आणा गोळा करून वर्गणी दिली होती. भिल्ल स्त्रियांच्या गाण्यांमध्ये डॉ. बाबासाहेबांचे संदर्भ येतात. यावरून या समाजामध्ये आंबेडकरी चळवळ किती रुजली होती, याचा अंदाज येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख…

Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
Gaurav More shared post on Dr. Babasaheb Ambedkar jayanti remembered visiting london house
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
congress not responsible for the defeat of babasaheb ambedkar in 1952 election as well by election
डॉ. आंबेडकरांचा पराभव काँग्रेसने केलेला नाही…

सामाजिक प्रबोधनाच्या काळात भारतातील संपूर्ण सामाजिक संरचना ढवळून निघाली. भारतातील पारंपरिक सामाजिक वहिवाटी, प्रथा आणि परंपरा यांमध्ये बदल घडून आले. प्रबोधनाच्या या काळात वर्षानुवर्षे कोंडीत सापडलेल्या समूहांनी स्वत:ला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि स्त्रियांचे लढे महत्त्वाचे आहेत. भारतातील आदिवासी आणि इंग्रजांचे प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये कायम संघर्ष होत असे, याची अनेक उदाहरणे आहेत. आदिवासी पुरुषांसोबत आदिवासी स्त्रियांनीही इंग्रजांचा प्रतिकार केला आहे. अम्बापानीच्या युद्धात भिल्ल आदिवासी स्त्रिया इंग्रजांच्या विरोधात लढल्याचे संदर्भ आहेत. इंग्रजांशी लढणारा आदिवासी समूह हा तत्कालीन सामाजिक चळवळींमध्येही भाग घेताना दिसतो. मुळातच जंगलात राहणारा आणि गावकीपासून लांब असलेला हा समूह होय. असे असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांच्याशी आदिवासींचा जवळचा संबंध आहे. त्यामध्ये विशेषत्वाने आदिवासी स्त्रियांशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आंबेडकरी चळवळीशी आदिवासी स्त्रियांचा असा हा संबंध दुहेरी स्वरूपाचा आहे. उन्नत समाजापासून लांब असलेला, आपल्या नैसर्गिक प्रथा-परंपरांना जपणारा आदिवासी समूह एतद्देशीय समाजाने चोर ठरवला आणि इंग्रजांनी गुन्हेगार. या दोन्ही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदिवासी स्त्रियांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग समजून घेणे गरजेचे आहे. तसेच भारतातील स्त्रीमुक्तीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व आदिवासी स्त्रियांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>>‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी यांचा सर्वप्रथम संबंध १९२८ ला स्टार्ट कमिटीच्या माध्यमातून आला. अस्पृश्य व आदिवासी किंवा जंगलात राहणाऱ्या समूहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण कायदे करण्यासाठी, सामाजिक स्तरावर अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमली होती. या समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य होते. या समितीवर काम करत असताना बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी जाऊन अस्पृश्य आणि आदिवासी समूहांची प्रत्यक्ष पाहणी केली. याच समितीचा एक भाग म्हणून एक प्रश्नावली तयार केली गेली. ज्यामध्ये अस्पृश्य व आदिवासीच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीशी संबंधित एकूण ३७ प्रश्न होते. त्यातील १३ व्या क्रमांकाचा प्रश्न हा अस्पृश्य आणि आदिवासी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भाने होता. ‘या जातीच्या मुलींमध्ये शिक्षणप्रसार होण्याकरिता त्यांच्या अभ्यासक्रमात काय बदल करणे गरजेचे आहे?’ असा तो प्रश्न होता. यावरून असे दिसून येते की, १९२८ ला बाबासाहेब आदिवासी मुलींच्या शिक्षणाविषयी किती खोलवर विचार करतात. पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये गुरफटलेल्या, जंगलात राहणाऱ्या आदिवासी मुलींनाही शिक्षण मिळावे, हा उदात्त हेतू यामागे होता. याच समितीच्या शिफारसीनुसार बॅकवर्ड क्लास विभागाची स्थापना झाली. हा विभाग स्वतंत्र भारतात सामाजिक न्याय विभाग म्हणून ओळखला जातो. जो आजही प्रामुख्याने मागास समूहांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करतो.

आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी स्त्री

समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली आंबेडकरी चळवळ ही स्थानिक पातळीवरील आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांची, त्यांच्या दु:खांची दखल घेताना दिसून येते. या संदर्भात अस्पृश्य समाज कशा प्रकारे आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढतो याची अनेक उदाहरणे ‘जनता’ व ‘दलित भारत’ या वृत्तपत्रांतून छापून आलेल्या अनेक बातम्या आणि लेखांवरून स्पष्ट होते. डी. जी. जाधव, पुनाजी लळिंगकर, अण्णा नेतकर व आर. एम. वाहुळे यांच्यासारखे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नेते आदिवासींच्या संदर्भाने काम करताना दिसून येतात. सायगाव येथे यशवंत बाळाजी, नागो बाळाजी, श्रीपत बाळाजी, बाळाजी सदु व सोनाबाई भागोजी ही भिल्ल कुटुंबे राहत होती. या कुटुंबांवर होळीच्या दिवशी गुंडांनी हल्ला केला. आवाज येताच गावातील वतनदार महार लोकांनी भिल्ल वस्तीकडे धाव घेतली. भिल्ल स्त्री-पुरुष जखमी झाले होते. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. त्यात एक वयोवृद्ध स्त्री जबर जखमी झाली होती. झालेल्या या अन्यायाच्या विरोधात दलित फेडरेशन तालुका येवलाचे जनरल सेक्रेटरी आर. एम. वाहुळे यांनी जनता १९५२ च्या अंकात बातमी देऊन न्याय मागितला आहे.

हेही वाचा >>>मतदार राजा जागा हो….!

पश्चिम खानदेशात तळोदे येथील बहुरूपे या लहानशा गावात १९४० रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे दुसरे अधिवेशन भरले होते. या गावात १०० भिल्ल आणि ५/१० महार कुटुंबांच्या झोपड्या होत्या. हे सर्व गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु, गावातील गुर्जर लोकांकडून यांच्यावर अन्याय होत असे. या अधिवेशनाचे अध्यक्ष डी. जी. जाधव यांची भिल्ल स्त्रियांनी कुंकुमतिलक लावून पंचारती ओवाळली. सभास्थानी जाण्यासाठी सजवलेल्या बैलगाडीत अध्यक्षांची मिरवणूक काढली. या मिरवणुकीत समोर महार, भिल्ल लोकांचे वाजंत्री, स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा त्यामागे शेकडो भिल्ल स्त्रियांचा घोळका, त्यामागे अध्यक्षांची गाडी, त्यामागे प्रचंड मोठ्या प्रमाणात भिल्ल शेतकरी चालत होते व त्या मिरवणुकीतून भिल्ल स्त्रिया गाणे गात होत्या.

‘‘आघाडी चले भीमराजा

पिछाडी दलितों की फौजा’’

त्याचप्रमाणे

‘‘भिल्ल संभालनेकु जाता हे

वाघळीवाला जाधव साहिब’’

या परिषदेचे श्रेय भिल्ल पुढारी संपत सुरक पाटील व स्थानिक दलित नेतृत्व पुनाजी लळिंगकर या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना आहे. या परिषदेत भिल्ल स्त्रियांनी दाखवलेली आस्था ही अवर्णनीय होती. या परिषदेत गाणी गाणाऱ्या प्रमुख भिल्ल मुलींची नावे छुकमा, वारी, मथा, रुक्मा, दुधी, रेणा, गमुना, बुल्फा, दशी, कथी, मदी, झगी, छायति, नुरा, माजा, पुरा, पुनी, तारी, तापी, इ. मुलींच्या गाण्याची जबाबदारी राधाबाई व पोशिबाई या दोन भिल्ल स्त्रियांकडे होती. यावरून आपणास जाणवेल की, भिल्ल स्त्रियांच्या गाण्यांमध्ये बाबासाहेबांचे संदर्भ येतात. याचा अर्थ भिल्ल जमातीमध्ये आंबेडकरी चळवळ किती रुजलेली होती हे दिसून येते. कोणत्याही समाजातील स्त्रियांपर्यंत एखादा विचार पोहोचवणे हे तुलनेने खूप कठीण काम असते. आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेब यांचे भिल्ल महिलांच्या गाण्यांमधील संदर्भ दाखवून देतात की भिल्ल महिलांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी किती आदर आणि विश्वास आहे. एखादी भावना गाण्यामध्ये उतरण्यासाठी त्याविषयी खूप चिंतन आणि मनन करावे लागते. भावनिकदृष्ट्या व मानसकिदृष्ट्या त्या विषयाशी जोडले जाणे गरजेचे असते. ही सर्व प्रक्रिया झाली, तरच एखादा विचार हा गाण्याच्या स्वरूपात येतो. आंबेडकरी चळवळीविषयी या सर्व प्रक्रिया भिल्ल महिलांच्या संदर्भात झाल्या असे दिसून येते.

आंबेडकरी चळवळीचे जनता हे अत्यंत महत्त्वाचे वृत्तपत्र होय. या वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीत अनेक विविध समूहांचे प्रश्न सातत्याने घेतले व २० व्या शतकातील प्रबोधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. जनता हे वृत्तपत्र आदिवासी भागापर्यंतसुद्धा पोहोचले होते. जनता वृत्तपत्राचे महत्त्व ओळखून बहुरूपे गावातील भिल्ल आदिवासी स्त्रियांनी एक-एक आणा गोळा करून १ रु.ची देणगी जनता वृत्तपत्राला दिली. राधीबाई, पोसीबाई, फाशीबाई, चौकाबाई, भुर्जाबाई, सारजाबाई, पारीबाई, समाबाई, काशीबाई, कायीबाई, गोदीबाई, बायजाबाई, इ. आदिवासी महिलांनी आर्थिक स्वरूपात देणगी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी स्त्रियांच्या संदर्भाने येणाऱ्या माहितीचा आणखी नव्याने शोध घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीतून आदिवासी समाज व स्त्रियाही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे बाबासाहेब स्वत: आदिवासी मुलींच्या शिक्षणाविषयीचा प्रश्न मांडतात. एवढंच नाही, तर आंबेडकरी चळवळीत जशा इतर जातसमूहातील महिला काम करतात अगदी तसेच आदिवासी स्त्रियासुद्धा काम करतात. चळवळीला त्यांना शक्य तितकी आर्थिक स्वरूपात मदत करतात. गाण्याच्या स्वरूपात त्यांच्या भावना व विश्वास व्यक्त करतात. आंबेडकरी चळवळीतील दुसऱ्या फळीतील नेतृत्व, स्थानिक कार्यकर्तेसुद्धा भिल्ल आदिवासी समाजाविषयी आस्थेने काम करताना दिसतात. जनता हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये आदिवासी स्त्रियांच्या सहभागाला आणि योगदानाला लिखित स्वरूपात जतन केले गेलेले आहे. मानवमुक्तीचा विचार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही चळवळ वाटचाल करत होती. आदिवासी समूह आणि त्यातही आदिवासी स्त्रिया यांचा मानवमुक्तीचा लढा लढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर किती जवळचा संबंध होता हे यावरून दिसून येते.

साहाय्यक प्राध्यापक

इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद</p>

sunitsawarkar@gmail.com