|| ज्योती आफळे

‘आत्मा’ आणि ‘पुनर्जन्म’ या गूढ संकल्पनांचा विज्ञानाच्या अंगाने वेध घेणारे हे पुस्तक त्या अनुषंगाने कर्म आणि कर्माचा सिद्धांत यांचाही ऊहापोह करते..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?

‘आत्मा’ आणि ‘पुनर्जन्म’ या संकल्पना मानवी मनात हजारो वर्षांपासून रुतून बसल्या असून आपल्या कट्टर धार्मिक विश्वासाचा अविभाज्य भाग बनून राहिल्या आहेत. आजही माणूस त्याच्या अस्तित्वाचे मूळ आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत नेणारी शक्ती यांच्या शोधात आहे. हजारो वर्षांपासून चच्रेत असलेल्या आणि आजही सर्वाचे एकमत नसलेल्या आत्मा आणि पुनर्जन्म या गूढ संकल्पना समजून घेण्यात झालेली प्रगती आणि येणाऱ्या अडचणी यांचा वेध ‘अ सायंटिफिक लुक : अ‍ॅट द कॉन्सेप्ट ऑफ सोल, रिबर्थ, वर्क अ‍ॅण्ड द लॉ ऑफ कर्मा’ या पुस्तकातून लेखक अनिल विष्णू मोहरीर यांनी घेतला आहे. निव्वळ वैज्ञानिक तर्क, विवेक व सत्य यांची कास धरून धारणा, विश्वास, धार्मिक व सामाजिक कथनांनी साकारलेली प्रभावक्षेत्रे या तपासात अडथळा आणतात. तो पार करायचा तर प्रसंगी बंड करावे लागते. ते करण्याची भीती आणि धर्याचा अभाव ही या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड आहे, असे लेखकाला वाटते. हजारो वर्षांपासून धार्मिक शिकवणी देणाऱ्यांनी आत्मा व पुनर्जन्म या संकल्पना जनमानसात रुजवल्या; त्या वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या जोरावर नाही, तर आपापल्या विचारधारांच्या आधारावर.

आज भौतिक विज्ञाने, प्राथमिक अणुभौतिकी, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान, अनुवंशशास्त्र, अणुजैविकी या क्षेत्रांनी अफाट प्रगती केलेली आहे. तरीही ‘आत्मा’ या संकल्पनेविषयीची आपली समज, तिचा अर्थ, सार्वत्रिकता, स्वरूप, कार्य आणि शरीरातील स्थान यांचा निरनिराळ्या आकारदायी क्षेत्रांशी (मॉर्फिक फिल्ड्स) असणारा संबंध यथार्थपणे उलगडलेला नाही. ‘जन्मापासून मृत्यूपर्यंत आत्मा शरीरात मुक्काम ठोकून असतो’ या समजाचे येथे लेखकाने खंडन केले आहे. हा तथाकथित आत्मा प्रत्यक्षात सतत उत्स्फूर्तपणे विश्व चतन्याशी जोडलेला असतो, असा लेखकाचा युक्तिवाद आहे.

गर्भधारणा होऊन गर्भावस्थेतील विकासाचे निरनिराळे टप्पे पार करून या जगात आल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत सजीवांच्या शरीरातील लक्षावधी कणांच्या प्रवाहातून विद्युतभार प्रवाहित होत असतो. आपली विकेंद्रित व्यक्तिगत निर्मिती, प्रेरक हेतू, भरण-पोषण, टिकाव आणि अंतिम विनाश यांचे नियमन याच सार्वत्रिक विद्युतभाराकडून होते. सर्व सजीवांचे सचेत शरीर प्रेरित ठेवण्यासाठी कणांच्या विशिष्ट मार्गिकेमधून भारित कणांचा प्रवाह अखंड धावत असतो. देहाची ही क्षमता संपली, की सचेत शरीर निश्चेष्ट बनते. म्हणूनच कुठल्याही अनेक पेशीय सजीवाचा मृत्यू ही क्षणार्धात घडणारी घटना नसून त्याच्या शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमधून सदैव प्रवाहित असणारे विद्युतभारित कणांचे मार्ग हळूहळू बंद होत गेल्याने संथपणे घडणारी प्रक्रिया आहे.

सुमारे ख्रिस्तपूर्व आठ हजार वर्षांपूर्वी वेदांनी ‘आत्मा’ ही संकल्पना व तिचा संरचनात्मक साचा आपल्यासमोर ठेवला. इथे लेखकाने त्याची थोडक्यात माहिती देऊन तर्कशुद्ध विवेचन केले आहे. वेदांमधील संकल्पनांची भौतिक व जैविक विज्ञानाचा विकास आणि जीवनाबद्दलच्या ज्ञात गोष्टींशी सांगड घालून लेखक ठामपणे सांगतो की, जी लक्षणे आणि गुणधर्म अनाकलनीय आत्म्याला जोडले जातात, ते खरे तर विद्युतभारालाही लागू होतात. म्हणजेच प्रत्यक्षात आत्मा म्हणजे संपूर्ण विश्व आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी चालवणारा विद्युतभार आहे.

पुनर्जन्म आणि पुनर्जन्माची चक्रे या आणखी एका अनाकलनीय विषयावर चर्चा केल्याखेरीज ‘आत्मा’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण अपूर्ण आहे. भगवद्गीतेने खुलासेवार मांडलेली ही संकल्पना शंका न घेता, पुनरावलोकन न करता, स्वतंत्र बुद्धी न चालवता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. हे आकलन चुकीचे असल्याचा मुद्दा लेखकाने इथे मांडला आहे. आधुनिक विज्ञानाने आजतागायत व्यक्तिगत पुनर्जन्माचे समर्थन केलेले नाही. पुनर्जन्म म्हणजे इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तीची गुणवैशिष्टय़े दाखवणाऱ्या व्यक्तीचा जन्म. सजीवांच्या शरीरातील डीएनए सतत स्वत:ची हुबेहूब प्रतिमा निर्माण करत असतो. गर्भवाढीच्या काळात या डीएनएला जनुकबाह्य़ वातावरणाचे पाठबळ मिळते. यातून इतिहासात जगलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी वा जवळपास तिच्यासारखी लक्षणे आणि चेहरामोहरा असणाऱ्या नवीन व्यक्तीचा जन्म होतो. यामुळे लोकांच्या मनात पुनर्जन्माविषयी संभ्रम निर्माण होतो. या शक्यतेला मोठा वाव असल्याचे लेखक म्हणतो. लाखो वर्षांपासून चालत आलेल्या डीएनएच्या स्व-प्रतिकृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे समान वैशिष्टय़ांची पुनरावृत्ती ही नियमित प्रक्रिया आहे. म्हणजेच तो भौतिक पुनर्जन्म नसतो, तर ‘गुणर्जन्म’ असतो.

कर्म आणि कर्माचा सिद्धांत या विषयाचा खुलासा रेण्विय आनुवांशिकीला भौतिकशास्त्राची जोड देऊन लेखकाने केला आहे. ‘डीएनए मिथायलेशन’ ही सजीवांच्या प्रत्येक पेशीत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. बदलत्या पर्यावरणात टिकाव लागण्यासाठी पेशींनी योजलेले डावपेचात्मक कौशल्य, असे तिचे वर्णन करता येईल. याची संगती या पुस्तकातून यमाचा सहकारी चित्रगुप्ताच्या कार्याशी लावली आहे. सजीवांनी आयुष्यभर केलेल्या कर्माची नोंद तो गुप्तपणे करतो असे मानले जाते. शरीरातील प्रत्येक पेशीत तो अदृश्य अवस्थेत राहतो आणि बाह्य़ वातावरणाशी झालेल्या त्यांच्या आंतरक्रिया टिपून ठेवतो. हे कार्य डीएनए मिथायलेशन प्रक्रियेला समांतर असल्याचा युक्तिवाद सदर पुस्तकातून मिळतो. तो वाचण्याचा गूढरम्य अनुभव प्रत्येकाने मुळातूनच घेतला पाहिजे!

पुस्तकात लेखकाने ‘दत्तात्रेय’ या संकल्पनेचे अंतरंगही खुमासदार शैलीत उलगडले आहे. आधुनिक भौतिकशास्त्रानुसार निसर्गात आंतरक्रिया, गुरुत्वाकर्षण आणि विद्युत चुंबकत्व या तीन क्रिया कार्यरत आहेत. दत्तात्रेयांमध्ये आपल्याला सजीव-निर्जीव पदार्थाचे निर्माण, पोषण आणि नाशाला कारणीभूत असणाऱ्या या शक्तींचे मूर्त रूप दिसते. या त्रिमूर्तीत सरस्वती, लक्ष्मी व पार्वती ही स्त्री तत्त्वेही अंतर्भूत आहेत. दत्तात्रेयांमध्ये हे पुरुष व स्त्री घटक गोडीगुलाबीने, एकोप्याने सतत सक्रिय असतात. विशिष्ट परिस्थितीत यातील एका शक्तीची ताकद कमी झाली, तर उर्वरित शक्ती प्रबळ होतात आणि मूळ स्वभावानुसार त्यांचे परिणाम दिसून येतात. यात लेखकाला भारतीय तत्त्वज्ञानातील ‘दत्तात्रेय’ ही संकल्पना व पदार्थाच्या भौतिक रचनेचा आधुनिक सिद्धांत यांच्यातील अनुबंध जाणवतो. एकुणात, एक अस्पर्श विषय लेखकाने वाचकांच्या विचारार्थ ठेवला आहे.

jyoti.aphale@gmail.com