दूरचित्रवाणी माध्यमातील पत्रकारांवर ताण असतोच आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही दिसू शकतो. तरीही बीबीसी वर्ल्ड या चित्रवाणी वाहिनीच्या महत्त्वाच्या पत्रकारांपैकी एक असलेले कोम्ला डुमोर यांचा अवघ्या ४१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी झालेला मृत्यू अनेकांना चटका लावणारा ठरला आहे. घाना या आफ्रिकी देशातील तशा सुखवस्तू कुटुंबातील कोम्ला हा तरुण बीबीसीमुळे खरोखरच जगभरातील परिचित चेहऱ्यांपैकी झाला होता. गोलसर चेहरा, केस नसल्याने तळपणारे कपाळ, गोलच डोळे, खणखणीत आवाज आणि इंग्रजी उच्चारणशैलीवर बीबीसीची अमिट छाप असूनदेखील आफ्रिकी, फ्रेंच उच्चारणशैलींची, सहजपणे नक्कल करून आशय पोहोचवण्याची त्याची शैली, हे सारे बीबीसीच्या अन्य यशस्वी पत्रकारांकडे नव्हते.
कोम्लाचा जन्म १९७२ चा. कुटुंबातील हे शेंडेफळ अभ्यासात हुशार, म्हणून त्याला डॉक्टर करायचे आईवडिलांनी ठरवले, पण त्याऐवजी याने समाजशास्त्र आणि मानसशास्त्रात पदवी घेतली. राजकारणात तरी येऊ दे, म्हणून अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात लोकप्रशासन विभागात पदव्युत्तर पदवीसाठी पाठविले. तिथे हा एमए झाला, पण मायदेशी परतून हा १९९६ पासून तेथील जॉय-एफएम नामक नभोवाणी वाहिनीसाठी रोज सकाळी कार्यक्रम करू लागला. केवळ गोडगोड बोलण्याच्या पलीकडे जाऊन, वृत्तगुण असलेले कार्यक्रम सादर करणे हे त्याचे वैशिष्टय़ ठरले. इतके की, २००३ साली त्याला घानाचा ‘राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ मिळाला. बीबीसी रेडिओने त्याला हेरले ते २००६ साली, म्हणजे ब्रिटनने ‘मल्टि-कल्चरॅलिझम’च्या धोरणाचा किंवा बहुसांस्कृतिकतेचा टेंभा मिरवायला सुरुवात केली होती, तेव्हा. कदाचित, त्या धोरणाचा भाग म्हणूनही. पण ‘नेटवर्क आफ्रिका’ हा त्याचा रेडिओ कार्यक्रम अपेक्षेबाहेर यशस्वी झाल्यावर बीबीसी टीव्हीने २००९ पासून त्याला ‘आफ्रिका बिझनेस रिपोर्ट’चा सादरकर्ता केले.
व्यापार-उद्योग, राजकारण आणि खेळ या सर्व क्षेत्रांत तो अगदी लीलया वावरला, त्यामागे त्या त्या क्षेत्रांची बऱ्यापैकी माहिती हे कारण होतेच, पण आफ्रिकेची नस ओळखून प्रत्येक क्षेत्रात आफ्रिकेचे आजचे गुणावगुण काय आहेत हे त्याने जाणले होते. आफ्रिकेचे यथातथ्य दर्शन जगाला घडवता घडवता ब्राझील वा अन्य दक्षिण अमेरिकी देश, भारत वा श्रीलंकेसारखे दक्षिण आशियाई देशही त्याच्या चाहत्यांचे आगर ठरले. दक्षिण सुदानच्या लढय़ात लहानपणीच बंदुकीने लढलेल्या नि आता संगीतकार झालेल्या इमॅन्युएल जालची मुलाखत कोम्लाने घेतली, ती शुक्रवारी (१७ जाने.) प्रसारित झाली. शनिवारी त्याला मृत्यूने गाठले.