यापुढे हिंदू खाटिकांनी मारलेल्याच कोंबडय़ा-बकरे हिंदू मांसाहारींनी खावेत, मंदिरांच्या ताब्यातील हत्तींचे माहूत हिंदूच असावेत आदी मागण्याही झाल्यास नवल नाही..

आगामी विधानसभा निवडणुकीत  कारभाराचा मुद्दा मते देण्याइतका निर्णायक असेल वा नसेल. पण हिंदू-मुसलमान मुद्दय़ावर मतांची बेगमी होऊ शकते याबाबत बोम्मईंना खात्री असणार..

क्षेत्र कोणतेही असो, बाहेरून आत आलेला आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी मूळच्या आतल्यापेक्षा अधिक कडवा बनतो आणि टोकाची भूमिका घेतो. राजकारणापुरते बोलायचे झाल्यास कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे हा सिद्धांत उत्तमपणे सिद्ध करतात. सोमप्पा रायप्पा ऊर्फ एस. आर. बोम्मई यांचे हे चिरंजीव. तीर्थरूप समाजवादी कळपातले. जनता दलाचे अध्यक्षपद भूषवलेले आणि एच. डी. देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांच्या पंतप्रधानकीच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्रीपदही अनुभवलेले. देशातील काही ज्येष्ठ समाजवादी नेत्यांत त्यांची गणना होत असे. त्या काळी कर्नाटकात उदारमतवादी समाजवादी विचारसरणीच्या राजकारणास आणि ते करणाऱ्यांस मान असे. रामकृष्ण हेगडे, जे. एच. पटेल, देवेगौडा आदी त्याच कळपातील. विद्यमान मुख्यमंत्री बसवराजांच्या राजकारणाची सुरुवातही या समाजवादी साथींत झाली. पण गाडी पुढे जात नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी देशातील अन्य अनेक ्नहौशानवशांप्रमाणे भगवे उपरणे घेत हिंदूत्ववाद्यांच्या कळपात बेमालूमपणे शिरकाव केला. बी. एस. येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गृहमंत्रीपदासारखी महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पेलली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बेंगळूरु धार्मिक दंगलीतील सहभागींकडून नुकसानभरपाई वसुलीचा निर्णय त्यांचाच. पुढे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी याचीच री ओढली. या त्यांच्या ‘कर्तबगारी’मुळे असेल बहुधा पण येडियुरप्पा यांस पायउतार करावे लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी बोम्मई यांच्या गळय़ात पडली. त्यांच्या मुख्यमंत्रीपदास आणखी तीन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल. या काळात कोणत्याही क्षेत्रात काहीही छाप पाडता न आलेल्या या बसवराजांनी जनमत संघटनाचा आणि सध्याच्या भाजपात शाबासकी मिळवण्याचा सोपा मार्ग निवडला.

त्यात ‘हिजाब’च्या मुद्दय़ावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळाल्याने बसवराजांची भीड चेपली आणि त्यातूनच त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरांभोवती मुसलमान विक्रेत्यांस बंदी घातली जाण्याची मागणी पुढे आली. वास्तविक आपल्या रक्तातील समाजवादी जनुकांशी नाते सांगत या बसवराजांनी हा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न हाणून पाडायला हवा होता. अर्थात या निर्णयासाठी बसवराजांस दोष देणे अयोग्य हे खरे. कारण हा निर्णय त्या अर्थाने ‘सरकारचा’ नाही. त्यासाठी धार्मिक संघटनांचा दबाव आहे आणि कित्येक मंदिर व्यवस्थापन समित्यांनी याबाबत आपली असहाय्यता व्यक्त केली आहे. अशा वेळी खरे तर राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने बसवराजांनी या धर्मसंघटनांना खडसवायला हवे होते आणि मंदिर व्यवस्थापनास आधार द्यायला हवा होता. पण अलीकडे इतक्या किमान शहाणपणाची अपेक्षा करणेच वेडेपणाचे! हे मुख्यमंत्री बसवराज ‘मुसलमान विक्रेते नको’ असे म्हणणाऱ्या या संघटनांना विरोध करताना अजिबात दिसले नाहीत. उलट त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे याचे समर्थनच झाले. त्यासाठी काहीबाही कायद्याचा आधारही त्यांनी घेतला आणि वर ‘‘मंदिर परिसरा’च्या बाहेर मुसलमान विक्रेत्यांस असा काही अडथळा केला जात नाही’ याची खातरजमा करण्याचे आश्वासन दिले.

हे सर्व पंतप्रधानांसह सर्व जण ज्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदोउदो करतात त्या क्षेत्राची राजधानी असलेल्या बंगलोर शहरात घडत आहे याची दखल केंद्रीय नेत्यांनी तरी घेणे आवश्यक होते. कारण देशाच्या प्रतिमेचा प्रश्न होता. अशा टोकाच्या धार्मिक ध्रुवीकरणातच देशाच्या उज्ज्वल भविष्याची हमी असल्याची खात्री सर्व संबंधितांस पटलेली असल्याने बसवराजांस कोणी सल्ला देण्याच्या फंदात पडले नाही. पण उद्योजिका किरण मुझुमदार शॉ यांना मात्र राहवले नाही. त्यांनी ‘धार्मिक विद्वेष असाच राहिला तर भारताच्या बौद्धिक नेतृत्वास धोका पोहोचेल’ अशा अर्थाचे ट्वीट करण्याचे धारिष्टय़ दाखवले. लगोलग त्यांच्याविरोधात आयकर खाते, सक्तवसुली संचालनालय आदींनी कारवाई सुरू केली किंवा काय हे कळावयास मार्ग नाही. तथापि हिंदूधर्मरक्षक त्यांच्या मागे हात धुवून लागले असून लवकरच या शॉबाई पाखंडी ठरवल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचे म्हणणे इतकेच होते की हिंदू आणि मुसलमान यांच्यात सतत वाढवल्या जाणाऱ्या दरीमुळे माहिती आणि जैविक तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कर्नाटकाची आणि त्यातही बेंगळूरुची बदनामी होत असून त्यातून या क्षेत्राचे नेतृत्व भारताच्या हातून निसटण्याचा धोका आहे. ‘‘आपले मुख्यमंत्री बसवराज हे पुरोगामी आहेत आणि लवकरच ते यातून मार्ग काढतील’’ असाही आशावाद बसवराजांविषयी शॉबाई व्यक्त करतात. तो किती अस्थानी आहे आणि शॉबाई किती वास्तवापासून तुटलेल्या आहेत हे बसवराजांनीच लगेच सिद्ध करून दाखवले. ‘हिजाब’चे अभूतपूर्व यश, मंदिर आणि मुसलमान वाद यामुळे आपल्या नेतृत्वगुणांची खात्री पटलेल्या या बसवराजांनी आता ‘हलाल मटणा’वर बंदी घालण्याच्या ताज्या मागणीचाही अभ्यास करण्याचे आश्वासन दिले आहे. या बोम्मईबाबांचा सध्याचा लौकिक पाहता ते हा हलाल प्रश्नही ‘यशस्वीपणे’ सोडवतील. तसा तो सुटल्यानंतर पावविक्रेते मुसलमान नकोत, यापुढे सर्व मांसाहारी हिंदू बंधू आणि भगिनींनी हिंदू खाटिकांनी मारलेल्याच कोंबडय़ा-बकरे खावेत, मंदिरांच्या ताब्यातील हत्तींचे माहूत हिंदूच असावेत आदी मागण्याही पुढे येतील आणि त्यांच्या पूर्ततेसाठी बसवराजांसारखे नेते प्रयत्न करतील यात तिळमात्रही शंका नसावी.

असा आत्मविश्वास व्यक्त करता येतो याचे कारण धार्मिक ध्रुवीकरण हा राजकीय यशाचा हमखास मार्ग आहे असे अनेकांस वाटू लागले आहे म्हणून. वास्तविक विकासाच्या मार्गावर विद्यमान केंद्रीय आणि कर्नाटकी सत्ताधीशांची इतकी जोमाने घोडदौड सुरू असताना हे असले हिंदू-मुसलमान वाद वगैरे मुद्दय़ांचे टेकू या मंडळींस का लागतात हे ‘त्या’ परमेश्वरालाच ठाऊक. पण असे झाले आहे खरे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान अलीकडेपर्यंत मध्यममार्गी म्हणून ओळखले जात. पण आता आपली ओळख योगींपेक्षाही भारी हिंदूत्ववादी हवी असे काही त्यांच्या मनाने घेतलेले दिसते. आताच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘योगीबाबाचा बुलडोझर’ चांगलाच लोकप्रिय ठरला. शिवराजसिंग चौहान यांस लाडाने मामा म्हटले जाते. आता हे मामाही आपले बुलडोझर प्रतिरूप तयार करण्याच्या मागे लागले आहेत. योगीबाबा, शिवराजमामा यांच्यापासून बसवराजबाबूंनीही प्रेरणा घेत आपणही हिंदूत्ववादाच्या शर्यतीत मागे नाही असे सिद्ध करण्याचे ठरवलेले दिसते. त्यामागे कारणही तसेच आहे. कर्नाटक राज्यात आगामी वर्षांत विधानसभा निवडणुका आहेत. कारभाराचा मुद्दा मते देण्याइतका निर्णायक असेल/नसेल. पण हिंदू-मुसलमान मुद्दय़ावर मतांची बेगमी होऊ शकते याबाबत बसवराजबाबूंची खात्री पटलेली असणार. त्यासमोर देशाचे बौद्धिक नेतृत्व आदींची शॉबाईंना पडलेली चिंता अगदीच गौण! आणि केवळ माहिती/जैविक तंत्रज्ञान क्षेत्रापुरतेच कशाला, सर्वच ज्ञानविज्ञान क्षेत्रास बौद्धिक नेतृत्व देण्यास साक्षात पंतप्रधान सक्षम असताना शॉबाईंनी व्यक्त केलेल्या चिंतेची फिकीर बाळगण्याचे कारण काय असा विचार बसवराजबाबूंनी केला असेल तर ते योग्यच म्हणायचे.

 खरे तर या मूळच्या समाजवादी बसवराजबाबूंस हे माहीत असेल की हिंदूंसाठी सर्वात पवित्र असणाऱ्या काशी विश्वनाथाच्या मंदिरांत बिस्मिल्ला खान आयुष्यभर आपली सनईसेवा रुजू करीत. त्याचा ना कधी अल्लातालास गुस्सा आला ना त्यामुळे शंकर महादेव सैरभैर झाले. पण सध्या या हिंदूत्वाचा लंबक बिस्मिल्ला खान यांच्यापासून दूर जात बसवराजबाबूंकडे गेल्याचे दिसते. पुढे बिस्मिल्ला खानांची सनई, सुलतान खानांची सारंगी, अहमदजान थिरकवा यांचा तबला, विलायतखाँ साहेबांची सतार, अख्तरीबाईंची ठुमरी वा गजम्ल, साहिर लुधियानवी वा फैज अहमद फै ज वा जिगर मुरादाबादी वा शकील बदायुनी यांची शायरी आदींवर गदा येणार नाही ही आशा!