‘एरवी थोरबीर मानले गेलेल्यांना कसे मस्त फटके मारले आहेत बघा’ ही काही या पुस्तकाची ओळख होऊ शकत नाही. ‘अ‍ॅण्टिफ्रजाईल’ या पुस्तकाची ओळखही तशी करून देता येणार नाही. अनेक नामवंत व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्थांसह अनेकांवर लेखक तालेब यांनी टीकेचे आसूड ओढले आहेत, हे खरं आहे. पण ही टीका आनुषंगिक आहे. तालेब यांचा खरा हल्ला आहे तो आधुनिकतेवर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस, आधुनिक राजकीय तत्त्ववेत्ता ज्याँ पॉल सात्र्, जागतिकीकरणवादी विचारवंत जोसेफ स्टीगलिट्झ, अर्थतज्ज्ञ-पत्रकार थॉमस फ्रिडमन यांच्यात काय साम्य आहे? किंवा अर्थतज्ज्ञ, बँकर्स, पत्रकार, डॉक्टर्स, विद्यापीठीय विद्वान, फिटनेस इन्स्ट्रक्टर यांच्यात काय साम्य आहे? किंवा अमेरिकेतील हॉर्वर्ड बिझनेस स्कूल, एके काळचे सोविएत विचारकुल, मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्यात तरी काय साम्य शोधायचे? खरं तर हे तीनही प्रश्न मुळातच गोंधळात टाकणारे आहेत. ‘वेगळ्या स्थळकाळातल्या, वेगळ्या क्षेत्रातल्या, वेगळ्या स्तरावरच्या या व्यक्ती, व्यावसायिक आणि संस्थांमध्ये साम्य शोधण्याचा हा खटाटोप तरी मुळात कशासाठी?’ असा (चौथा) प्रश्न मनात येऊ शकतो. पण नस्सीम निकोलस तालेब यांचे ‘अ‍ॅण्टिफ्रजाईल’ हे पुस्तक वाचले तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यांच्या मते हे सगळे फ्रजाईल म्हणजे भंगुर किंवा ठिसूळ विचारांचे आणि कृतीचे पाईक आहेत. म्हणूनच नुकसानकारकही आहेत. तालेब यांच्याच तिरकस शैलीत सांगायचे झाले तर हे सगळे ‘भंगुरीस्तान’ (फ्रजालिस्तान)चे रहिवासी आहेत.
आता ‘एरवी थोरबीर मानले गेलेल्यांना कसे मस्त फटके मारले आहेत बघा’ ही काही एखाद्या पुस्तकाची ओळख होऊ शकत नाही. शिवाय या व्यक्ती, व्यवसाय आणि संस्था मोठय़ा असल्याने ही टीका नजरेत भरते इतकेच. एरवी त्यांची टीका आनुषंगिक आहे. तालेब यांचा खरा हल्ला आहे तो आधुनिकतेवर. शक्याशक्यतांनी, तक्र्य-अतक्र्यतेने भरलेल्या आणि खूप प्रमाणात ‘अज्ञेय’ असलेल्या जगात आधुनिकतेने प्रस्थापित केलेल्या (काही) बाळबोध विचारांवर, पद्धतींवर आणि व्यवस्थांवर हा हल्ला आहे. अकल्पित, अतक्र्य घटना आणि प्रक्रियांनी भरलेल्या या जगावर आधुनिकतेची तोकडी अंगडी-टोपडी चढवण्याच्या अट्टहासामुळे आपण आणि आपल्या आधुनिक व्यवस्था स्वत:ला उघडे (आणि प्रसंगी नागडेही) करून घेत असल्याबद्दलचा हा राग आहे. परंतु सोबतच आधुनिकतेने जिला हटवून आपले राज्य निर्माण केले त्या पारंपरिकतेतील शहाणपण आणि सुदृढता पाहण्याचे एक आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्या चार-पाचशे वर्षांत आक्रमकपणे दृढ होत गेलेल्या आधुनिक विचारप्रणाली आणि व्यवस्थांवर तशी बरीच टीका झाली आहे. आजही होते. ती दोन बाजूंनी होत असते. पहिली बाजू अर्थातच परंपरावाद्यांची. त्यांच्या टीकेला बरेचदा धार्मिकतेची धार असते, सांस्कृतिकतेची मूठ असते आणि ‘गेले ते दिन गेले’ छाप रोमँटिसिझमचा मुलामा असतो. दुसरी बाजू आधुनिकतेला हटवू पाहणाऱ्या उत्तर आधुनिकतावाद्यांची. थिअरीविरोध हे त्यांच्या टीकेचे इंधन असते, जगण्यातील हेतुविहीनता दाखविणे ही दिशा असते आणि उपरोध किंवा खिल्ली हे आवरण. तालेब यांच्या टीकेमध्ये या दोन्ही गटांचे बेमालूम मिश्रण आहे. प्रसंगी धार्मिक आचारांमधील शहाणपण ते दाखवतात. पण अध्यात्म, देव, पाप-पुण्य वगरेंच्या बाता ते करत नाहीत. परंपरांमधील सुदृढतेचा ते कैवार घेतात, पण सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादाला वगरे अजिबात थारा देत नाहीत. थिअरीला विरोध करतात, पण म्हणून ‘सब झूठ है’ टाइप अराजकवृत्तीचे समर्थन करत नाहीत. जगण्यातील हेतुविहीनता- क्षणभंगुरत्व वगरे निराशेला तर ते जवळ फिरकूही देत नाहीत. प्रसंगी रोमँटिक होतात, पण भाबडे होत नाहीत. खिल्ली उडवतात, पण ती आचरट होऊ देत नाहीत. एका भविष्यकेंद्री, उपयोगवादी, व्यावहारिक आणि तरीही नतिक व शहाण्या अशा अस्सल ऐहिक जगण्यासंबंधी तिथल्या व्यवस्था आणि प्रक्रियांसंबंधी ते सांगत राहतात.हे सांगण्यामागचे त्यांचे मूळ सूत्र साधे, परंतु गहिरे आहे. त्यांच्या मते जग मूलत: फार गुंतागुंतीचे आहे. इथे कल्पितापेक्षा अकल्पिताचे, तक्र्य गोष्टींपेक्षा अतक्र्यतेचे, सरळ रेषेपेक्षा वाकडय़ात चालणाऱ्या प्रक्रियांचे, साध्या कार्यकारणभावापेक्षा बहुआयामी सहसंबंधांचे आणि निश्चिततेपेक्षा अनिश्चिततेचे वर्चस्व जास्त. त्यामुळे जगात आणि जगण्यात भविष्याकडून अकल्पित फटके बसण्याच्या शक्यताही भरपूर. अशा फटक्यांनी जे गारद होते ते फ्रजाईल म्हणजेच भंगुर किंवा ठिसूळ. हे आघात पचवून जे टिकून राहते ते रोबस्ट म्हणजे अभंगुर आणि जे या आघातांमुळे वाढते, तरारून उठते ते अ‍ॅण्टिफ्रजाईल म्हणजेच प्रतिभंगुर. छाटल्यामुळे झाडे अधिक जोमाने वाढतात तसे. म्हणूनच तालेब ‘की तोडिता तरु फुटे आणखी भराने’ तत्त्वावर चालणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवस्था उभारण्याचा आग्रह धरतात. आणि त्याच्या मार्गात येणाऱ्या व्यक्ती, विचार, प्रक्रिया आणि व्यवस्थांवर खरपूस टीका करतात. त्यांचा आधुनिकतेला विरोध यासाठी की, आधुनिकता जग हे मुळात नियमबद्ध, तक्र्य, कार्यकारणभावाने बांधलेले, एकरेषीय, सुनिश्चित आणि मुख्य म्हणजे वर्णनाने पूर्णपणे सांगता येईल असे मानते. त्यातून मग आधुनिकता, सपक थिअऱ्या, यांत्रिक व्यवस्था आणि सहेतुक-दीर्घकालीन नियोजनांचा आग्रह धरते. म्हणून मग आपण अधिकाधिक भंगुर होत जातो. त्या मानाने अशा कोणत्याही थिअऱ्या निर्माण न करता, वर्णनाच्या, व्याख्यांच्या आणि बारकाव्यांच्या फंदात न पडता आधुनिकतेआधीच्या परंपरांनी एका जैविक-नसíगक शहाणपणातून प्रतिभंगुर जीवनशैलीच्या अनेक युक्त्या-प्रयुक्त्या, रीती-रिवाज, प्रघात निर्माण केले. अनेक कथा-उपकथा, म्हणी, मिथककथांमधूनही ते पिढय़ान्पिढय़ा जपले.
अ‍ॅण्टिफ्रजाईलमधून तालेब अनेक दाखले देत, तपशीलवार वर्णन करत आणि मार्मिक विश्लेषण करत आधुनिकतेचे ठिसूळपण आणि परंपरांमधील शहाणपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्या या मांडणीचा आवाका प्रचंड आहे. तिथे वैद्यकीपासून ते वास्तुरचनाशास्त्रापर्यंत, तत्त्वज्ञानापासून राजकारणापर्यंत, संस्कृतीपासून ते अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषय व प्रवाहांचे भरगच्च संदर्भ देतात.
डोक्यावर ओझे घेऊन जाणाऱ्या एका भारतीय स्त्रीच्या छायाचित्राशिवाय या भल्या मोठय़ा पुस्तकात भारतातील कुठलेही संदर्भ येत नाहीत. पण त्याने फार बिघडत नाही. कारण भंगुर रचना आणि व्यवस्थांचे वर्णन इतके प्रत्ययकारी आहे की लगेच आपल्यापुढे पंचवार्षकि योजनांपासून ते धरणबांधणी प्रकल्पांपर्यंत आणि नोकरशाहीपासून ते विद्यापीठीय विद्वानांच्या पंडिती जगापर्यंतची अनेक उदाहरणे तरळून जातात. याउलट तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये दडलेले अ‍ॅण्टिफ्रजाईल शहाणपण तर इतके जाणवते की तालेब यांना तुकाराम माहीत असते तर ते त्यांना कदाचित ‘आय अ‍ॅम युअर फॅन बडी’ म्हणाले असते. थोडे अजून संदर्भ माहीत असतील तर वेदांमधील, बौद्धदर्शनातील लोकायत विचारधारेतील, न्यायदर्शनातील, आयुर्वेदामधील, उपासतापासामधील आणि अनेक साऱ्या परंपरांमधील प्रतिभंगुर शहाणपणाच्या शिकवणीची अनेक उदाहरणे लक्षात यायला लागतात.
तालेब यांच्या या पुस्तकाला आधार आहे तो त्यांनी आधी लिहिलेल्या ‘फूल्ड बाय रँडमनेस’ आणि ‘ब्लॅक स्वान’ या पुस्तकांतील भक्कम मांडणीचा. जगाचे मूळ अनियमित रूप सांगणे (फूल्ड बाय रँडमनेस) त्यातील अकल्पिताची परिणामकारकता दाखवणे (ब्लॅक स्वान) आणि मग अनियमितता, अकल्पितता पचवण्याचे, त्यातून वाढण्याचे मार्ग सांगणे (अ‍ॅण्टिफ्रजाईल) असा वैचारिक आलेख तालेब यांनी या तीन पुस्तकांतून मांडला आहे. पण अर्थात अ‍ॅण्टिफ्रजाईल वाचण्यासाठी आधीच्या दोन पुस्तकांची ओळख असलीच पाहिजे असे काही नाही.
तालेब यांच्या मांडणीला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे एक वेगळे परिमाण आहे. ते मूळ भूमध्यसमुद्री पट्टय़ातील लेबनॉन या इस्लामी- ख्रिश्चन देशातले. लेबनॉनमधील यादवी आणि युद्ध त्यांनी जवळून अनुभवले. तिथून ते अमेरिकेत आले. स्टॉक मार्केट, फ्यूचर ट्रेडिंगसारख्या अस्सल रोकडय़ा, व्यावहारिक जगात नाव आणि यश कमावले आणि मग कोणत्याही विद्यापीठीय आधाराशिवाय, स्वतंत्रपणे आणि पूर्णकाळ लिखाणाच्या क्षेत्रात ते उतरले. म्हणूनच त्यांच्या लिखाणात ग्रीक, अरबी, लॅटिन, फ्रेंच, इंग्लिश अशा भाषा आणि संस्कृतीतले, ख्रिश्चन आणि इस्लाममधले, अर्थव्यवस्था आणि स्टॉक मार्केटमधले, भाषाशास्त्र आणि तत्त्वज्ञानातले आणि अर्थातच अनेक परंपरांमधले संदर्भ येत राहतात. त्यांच्या उपायांना पंरपरांसोबतच रोकडेपणा, व्यावहारिकता, परिणामकारकता आणि दूरदृष्टीचा आधार आहे.
म्हणूनच ‘व्यवसायकेंद्री पंडितांचे ज्ञान म्हणजे वेश्येचे प्रेम’ अशी विखारी टीका करतानाच ते म्हणतात- ‘‘व्यवस्थेची प्रतिभंगुरता त्याच्या सुटय़ा भागांच्या मर्त्यतेतून येत असते. मी मानव या व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून या मानवाच्या सामुदायिकतेसाठी मी हीरोसारखे मरण पत्करायला पाहिजे. पुत्र, पौत्र, प्रपौत्र यांच्या अखंड मालिकेतून काळाच्या आघातापुढे टिकून राहिले पाहिजे, आणि या मालिकेच्या अखंडपणासाठी कष्ट आणि सुदृढ व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. मी मर्त्यच आहे, पण माझी माहिती म्हणजे माझे जीन्स हे माझ्यातले प्रतिभंगुरत्व आहे. ते टिकले पाहिजे. मी नाही.’’ आता अशा प्रार्थनेनंतर कोणाला शांति: शांति: शाति: किंवा आमेन किंवा इन्शाल्ला असे म्हणावेसे वाटणार नाही?

मराठीतील सर्व बुक-अप! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of antifragile
First published on: 09-11-2013 at 12:07 IST