इंग्रज इतिहासकारांनी मराठय़ांच्या बाबतीत मुद्दाम बदनामीकारक कथा प्रसृत केल्या. ते  त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक होते. मराठय़ांना होता होईल तो उपेक्षेने वा अनुल्लेखाने मारणे आणि जेथे त्यांचा उल्लेख टाळता येणारच नाही, तेथे त्यांची बदनामी करणे, त्यांचा तेजोभंग करणे हे इंग्रजांचे धोरण होते. मात्र फकीर मोहन सेनापती यांच्यासारखा स्वातंत्र्यसेनानीही मराठय़ांचे असेच चित्र   रंगवतो, हे खेदजनकच..
मराठी समाजाच्या गेल्या काही शतकांमधील चलनवलनाचा विचार भारतीय पातळीवरून केला, तर असे नि:संशयाने म्हणता येते, की इतिहासातील अठरावे शतक हे मराठय़ांचे शतक होते. उत्तर हिंदुस्थानात महादजी शिंद्यांसारखे कर्तबगार दिल्लीच्या मोगल बादशाहला आपल्या नियंत्रणात ठेवून त्याच्या माध्यमातून सत्ता राबवीत असताना दक्षिण हिंदुस्थानात तंजावरच्या भोसले घराण्यातील सरफोजी राजांसारखे तत्त्वज्ञ सत्ताधारी विद्या, कला आणि विज्ञान यांचा प्रसार आपल्या प्रजेत करीत होते. केशवमिश्रांचे वेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित ‘प्रबोधचंद्रोदय’ आणि विशाखादत्ताचे चंद्रगुप्त-चाणक्य आणि धनानंद-राक्षस यांच्या राजकीय संघर्षांवर आधारित ‘मुद्राराक्षस’ या दोन संस्कृत नाटकांचे मराठी भाषांतर करणाऱ्या भोसले कुलोत्पन्न राजाने प्रस्तावनेत खुलासा केला, की आपल्या प्रजेचे कल्याण हे राजाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मात्र राजाने प्रजेच्या ऐहिक-जैविक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारांच्या कल्याणाची काळजी घ्यायला हवी. ‘मुद्राराक्षस’ वाचून, पाहून प्रजा लौकिक व्यवहारातील शहाणपण शिकेल आणि ‘प्रबोधचंद्र’ यामुळे तिला मोक्षाचा मार्ग सापडेल. अशी व्यापक दृष्टी असलेला राजा संपूर्ण हिंदुस्थानात शोधून सापडणार नाही हे वेगळे सांगायची गरज नाही. दक्षिणेतील सांस्कृतिक संचिताची जपणूक करून शिवाय आधुनिक युरोपीयन विचारांची तेथे रुजवण करण्यात तंजावर भोसल्यांनी किती हातभार लावला आहे याचा अभ्यास अजूनही शहाण्यासुरत्या अभ्यासकाची वाट पाहत आहे!
पण मुद्दा एका तंजावरच्या राजघराण्याचाही नाही. आधी शहाजी राजांनी आणि नंतर शिवाजी महाराजांनी दक्षिणेत राज्यविस्तार करताना तेथील महसुलादी प्रशासनाची व्यवस्था लावण्याकरिता महाराष्ट्रातील अनेक ब्राह्मणांना तिकडे नेऊन वसवले. पुढे तेथील मराठय़ांची सत्ता संपुष्टात आल्यानंतरही मराठी ब्राह्मणांची ही घराणी तेथेच राहिली. तेथील लोकजीवनाशी एकरूप झाली. त्यांची नावेसुद्धा बदलली गेली. या लोकांनी दक्षिणेच्या ब्रिटिशकालीन इतिहासातही विशेषत: अभ्यास आणि प्रशासन या क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. (त्यातल्या त्यात माहीत असलेले नाव म्हणजे सर टी. माधवराव.) यात निजामाच्या पदरी नोक ऱ्या केलेल्यांचाही समावेश करायला हरकत नसावी.
उत्तरेतील मराठय़ांच्या सांस्कृतिक कामगिरीचे संशोधन व मांडणीही अद्याप नीट झाली नाही. निदान त्यांच्या राजकीय कामगिरीबद्दल कोणी शंका घेऊ नये. रोहिले, जाट आणि राजपूत या तीन मुख्य प्रतिस्पध्र्याना मराठय़ांनी किती वेळा नमवले असेल याची गणती नाही. राजपूत संस्थानांनी कधी एकेकटय़ाच्या हिमतीवर, तर कधी एकत्रितरीत्या मराठय़ांचा प्रतिकार करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश यायचे नव्हते.
या संघर्षांबद्दल मराठय़ांना बोल लावण्याची प्रवृत्ती अभ्यासकांमध्ये आढळून येते. राजपूतांचा इतिहास लिहिणाऱ्या कर्नल टॉड याने या प्रक्रियेस सुरुवात केली व नंतरच्या इतिहासकारांनी त्याचीच री ओढण्यात धन्यता मानली.
पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला हवे, की मराठे ही कधीही युद्धखोर जमात नव्हती. शांततेच्या काळात शेतीवर उपजीविका करणाऱ्या या समाजाचा दोष कोणता असेल, तर ते म्हणजे ‘स्वातंत्र्यप्रियता’. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व गेलेले स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी तलवार घेणे याला गुन्हा समजायचे असेल तर खुशाल समजावा. टॉडनेसुद्धा शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्यप्रियतेला व त्यातून त्यांनी उभारलेल्या स्वराज्याला दाद दिली आहे. त्याची तक्रार उत्तरकालीन मराठय़ांनी केलेल्या उत्तरेतील राज्यविस्ताराविषयी आहे. मराठय़ांचे हे कृत्य अस्वाभाविक, अनैतिक असल्याचा त्याचा दावा आहे. दक्षिणेतील मराठय़ांचे उत्तरेत काय काम, असा प्रश्न तो विचारतो.  They had no business to do so, असे त्याचे म्हणणे आहे.
या प्रकाराचे वर्णन ‘दांभिक दुटप्पीपणा’ यापेक्षा वेगळ्या प्रकारे करता येत नाही. अरब, तुर्क, मोगल यांनी आपापली भूमी सोडून िहदुस्थानात येऊन येथे राज्य करायला टॉडची हरकत नाही. या प्राचीन आक्रमकांचे जाऊ द्या, पण स्वत: टॉडच्या जातभाईंनी म्हणजे इंग्रजांनी सातासमुद्रांच्या पलीकडून हिंदुस्तान  यावे व राज्य करावे या प्रकारातही त्याला काहीच अनैसर्गिक वा अनैतिक वाटत नाही. मात्र मराठय़ांना त्यांनी न मागितलेले ना-हरकत प्रमाणपत्र द्यायला त्याचा हात थरथरतो.
टॉडचा जास्त रोष शिंद्यांवर, अर्थात महादजींवर आहे. शिंद्यांनी राजपूत संस्थानांकडून वसूल केलेल्या रकमांचे त्याने कोष्टकच सादर केले आहे!
या प्रकारामागची वस्तुस्थिती निदान महाराष्ट्रातील लोकांना तरी माहीत पाहिजे. अंतर्गत बंडाळी आणि बाह्य़ आक्रमण यांच्यापासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी दिल्लीच्या मोगल बादशाहने त्यासाठी मराठय़ांना पाचारण करून सर्व प्रशासन त्यांच्या हाती सोपवले. मोबदल्यात मराठय़ांनी महसुलाच्या वसुलीतील चौथा हिस्सा घ्यायचा होता. या करारानुसार दिल्लीच्या मांडलिक राजांकडून येणे असलेल्या रकमेची वसुली करण्याचे काम मराठय़ांकडे आले. दरम्यानच्या काळात बादशाह दुर्बल झाला आहे हे पाहून राजपूत संस्थानिकांनी बादशाहला द्यायची खंडणी देणे थांबवले होते. वस्तुत: अशा प्रकारची खंडणी राजपूत राजे अकबराच्या काळापासून तरी देत होते व त्यामुळेच त्यांची राज्ये सुरक्षित राहिली होती. मराठय़ांनी त्यांच्यावर वसुलीसाठी जी काही जुलूमजबरदस्ती केली असेल ती हे राजेमहाराजे करारानुसार देय असलेल्या रकमा वेळच्या वेळी भरण्याऐवजी थकवीत होते म्हणून. मराठय़ांना लढायांची हौस नव्हती. वारंवार स्मरण देऊन, इशारे देऊनसुद्धा हे सत्ताधीश त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, तेव्हा मराठय़ांना युद्धाखेरीज दुसरा पर्यायच उरत नसे. बरे हे प्रकरण येथेच थांबण्याइतके सरळ सोपे नसायचे. मराठय़ांकडून मार खात आहोत हे लक्षात आल्यावर हे लोक युद्ध थांबवून तहाची बोलणी सुरू करायचे. एकूण थकबाकीतील परवडतील तेवढे पैसे भरून उरलेली रक्कम नंतर द्यायचे कबूल करायचे. मराठेही मामला तेवढय़ावर सोडून, ते देतील तेवढी रक्कम घेऊन माघारी फिरत.
पण हा या राजांच्या धोरणात्मक लबाडीचा, वेळ मारून नेण्याच्या वृत्तीचा भाग होता. पुढच्या वर्षी त्यांनी परत बाकी थकवायची, चालढकल करीत राहायचे, मग मराठय़ांना परत चाल करून येणे भाग पडायचे. हा नित्याचाच खेळ बनत होता. सरळ वागणुकीची अपेक्षा उभयपक्षांकडून करायची असते.
उत्तरेत मराठय़ांचा दरारा होता, दबदबा होता, परंतु दहशत मात्र नव्हती. बंगालच्या लोकांची मराठय़ांबद्दलची तक्रार नेहमी सांगितली जाते. गंगाराम याने लिहिलेल्या ‘शून्य पुराणा’त त्याची चर्चा आहे. बंगालमधील बायका आपली बाळे झोपत नसल्यास त्यांना मराठा येत असल्याची म्हणे धमकी द्यायच्या व बाळे झोपी जायची, असेही सांगितले जाते.
बंगालपर्यंत पोहोचलेल्या मराठय़ांच्या फौजा नागपूरकर भोसल्यांच्या होत्या. भोसल्यांनी संपूर्ण ओरिसा प्रांत ताब्यात घेऊन बंगालवर धडका मारल्या. त्यांनी कलकत्ता घेऊ नये म्हणून तेथील इंग्रजांनी वर्गणी गोळा करून शहराभोवती खंदक खणला. तीच ती प्रसिद्ध Maratha ditch.  
मराठय़ांची दहशत घेतली असेल तर ती इंग्रजांनी. हे सत्य लपवून बायाबापडय़ांच्याच कथा सांगण्यात काय मतलब आहे हे समजत नाही.
ओरिसावरील साठ-सत्तर वर्षांच्या राजवटीत मराठय़ांनी त्या प्रांताला शांतता व स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यापूर्वी ओरिसात मुसलमान सरदार, नबाब यांच्या जुलमाला प्रजा कंटाळली होती. जगन्नाथपुरीच्या मंदिरावर तर वारंवार धाडी पडून तेथील संपत्ती लुटली जाई. मराठय़ांनी हे प्रकार बंद पाडले. जगन्नाथाच्या मंदिराच्या व्यवस्थापनाला शिस्त लावून दिली. यात मंदिराचा जो कारभार चालतो तो मराठय़ांनी घालून दिलेल्या पद्धतीनेच. इंग्रज इतिहासकारांनी मराठय़ांच्या बाबतीत मुद्दाम बदनामीकारक कथा प्रसृत केल्या. ते त्यांना त्यांच्या राजकारणासाठी आवश्यक होते. मराठय़ांना होता होईल तो उपेक्षेने वा अनुल्लेखाने मारणे आणि जेथे त्यांचा उल्लेख टाळता येणारच नाही, तेथे त्यांची बदनामी करणे, त्यांचा तेजोभंग करणे हे इंग्रजांचे धोरण होते. बंगाल्यांना कोणतीही गोष्ट अतिशयोक्तीने सांगायची सवय आणि मराठय़ांमध्ये चांगला इतिहासकार नाही त्यामुळे ही बदनामी वाढतच गेली.
बाकीच्यांचे जाऊ द्या, परंतु फकीर मोहन सेनापती यांच्यासारखा स्वातंत्र्यसेनानी व आद्य उरिया कादंबरीकारही मराठय़ांचे असेच चित्र रंगवतो तेव्हा खेद होतो. खरे तर फकीरबाबूंचे पूर्वज मराठय़ांच्या नोकरीत होते. मराठय़ांच्या अत्याचारांत त्यांचाही हातभार होता? निदान संमती होती?
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: British written maratha history
First published on: 04-07-2014 at 04:22 IST