सर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या  अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल न्या. विकास श्रीधर सिरपूरकर  यांनी दिले. वरोरा आणि विदर्भावर मनापासून प्रेम असलेल्या सिरपूरकरांच्या रोमारोमांत वैदर्भीय अघळपघळपणा भिनला आहे. वैदर्भीय दिलदारपणा भारतात कुठेही दिसून आला नाही, अशी खंतही त्यांना वाटते.
२१ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याप्रीत्यर्थ न्या. विकास श्रीधर सिरपूरकर यांचा वरोऱ्यात नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्या सत्कार सोहळ्याचा झगमगाट बघून सिरपूरकरांसोबत मराठी शाळेत शिकलेले बालपणीचे मित्र नियाझ अली आणि रहमत अली यांचे कुतूहल वाढले. ‘तू बहोत बडा हो गया क्या? अपने मॅजिस्ट्रेट साबसे भी बडा?’ असा प्रश्न करीत आपल्या सवंगडय़ाने यशाचे नेमके कोणते शिखर सर केले, याची ‘जिज्ञासा’ त्यांनी पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ५५ वर्षांत विदर्भाचे प्रथमच प्रतिनिधित्व करणारे न्या. सिरपूरकर यांच्या स्वभावत:च बंडखोर, आक्रमक, खोडकर आणि अघळपघळ व्यक्तिमत्त्वाला त्या निरागस प्रश्नाने अलगद गवसणी घातली होती.  
न्या. सिरपूरकरांचा जीवनपट अस्सल वैदर्भीय आहे. घरातील आणि घराबाहेरील संस्कारांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले. २२ ऑगस्ट १९४६ रोजी जन्मलेल्या सिरपूरकरांचे बालपण वरोऱ्यात गेले. वडील बाबासाहेब ऊर्फ श्रीधर सिरपूरकर अन्न पुरवठा निरीक्षक होते. बाणेदार वृत्तीमुळे त्यांचे वरिष्ठांशी पटत नसे. एकदा लाच देऊ पाहणाऱ्या एका वृद्धाला त्यांनी हात धरून घराबाहेर काढले. ‘इतनी इमानदारी है तो सरकारी नोकरी क्यों करते हो? वकालत क्यों नही करते?’ असे अपमानित परतणारा तो म्हातारा वळून खोचकपणे बोलला. हा टोमणा वर्मी लागला आणि श्रीधर सिरपूरकरांनी तिरमिरीत नोकरी सोडून दिली आणि खरोखरच वकिली सुरू केली. त्यांचा कित्ता गिरवीत मग घरातील बहुतांश सदस्य वकिलीकडे वळले. सिरपूरकर यांची आई, पत्नी, भाऊ, पुत्र, सून सर्व वकील आहेत. त्यांचे धाकटे बंधू संजय चंद्रपुरात नामवंत वकील आहेत. धाकटय़ा भगिनी मंजूषा यवतमाळचे पती लेफ्टनंट जनरल रवींद्र थोडगे यांच्यासोबत संसारात मग्न आहेत. कन्या अदिती बंगळुरूला शिक्षिका आहेत आणि त्यांचे पती शैलेज सहस्रभोजनी ओरॅकलमध्ये संचालक आहेत. पुत्र संग्राम आणि स्नुषा रेणुका नागपुरात विधि व्यवसायात प्रस्थापित झाले आहेत. पत्नी कुमकुम याही एका जमान्यात न्या. सिरपूरकर यांच्या तोडीच्या वकील होत्या, पण पतीच्या वाटचालीत हातभार लावण्यासाठी त्यांनी तूर्तास वकिलीला अर्धविराम दिला आहे. वडिलांचे चार भाऊ आणि तीन बहिणी असे सिरपूरकरांचे विस्तीर्ण कुटुंब आहे. एखाद्या विवाह सोहळ्यात आमचेच संमेलन भरते, असे ते गमतीने म्हणतात.
बाबा आमटेंच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेल्या सिरपूरकरांच्या घरात सुधारकी वातावरण होते. त्यांचे मित्र अठरापगड जातींचे. आई आणि वडील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते. घरात जात किंवा अस्पृश्यतेचा गंधही नसायचा. वरोऱ्याच्या गव्हर्नमेंट नेताजी हायस्कूलमध्ये ते शिकले. दीड-दोन मैलांची पायपीट करीत शाळेत जायचे. सातवीपर्यंत त्यांनी चपला घातल्या नाहीत, कारण पायात चपला दिसल्या की मुलगी आहे काय, असा खवचट प्रश्न मित्र विचारायचे. सिरपूरकरांच्या आई सुनंदा वरोऱ्यातील पहिल्या पदवीधर महिला. विवाहानंतर १३ वर्षांनी त्यांनी एलएलबी केले. ‘आई, परीक्षेत पास हो, नाही तर मित्र हसतील,’ असा इशारा द्यायचे. त्याचा परिणाम होऊन त्यांच्या आई पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. मॅट्रिकच्या परीक्षेत जिल्ह्य़ात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर सिरपूरकरांनी इंजिनीअरिंगकडे वळण्याऐवजी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यासाठी नागपूरच्या मॉरिस कॉलेज म्हणजे आजच्या नागपूर महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना सिगारेटचे व्यसन लागले. ते तब्बल २६ वर्षांनंतर सुटले. कॉलेजला दांडय़ा मारून मनसोक्त हुंदडण्याच्या मानसिकतेने ते विद्यार्थी जीवन जगले. वरोऱ्याला खो-खो खेळणारे सिरपूरकर महाविद्यालयीन जीवनात क्रिकेट, टेनिस, जलतरण आदी खेळांमध्ये निष्णात झाले. नाटकात काम करण्याचीही आवड निर्माण झाली. अभ्यासात साहित्याचे विषय असल्यामुळे कळत नकळत त्यांचे भरपूर इंग्रजी आणि मराठी साहित्य वाचन झाले. उत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी महाविद्यालयाच्या संघात स्थान मिळविले.
नागपूरच्या विधि महाविद्यालयातून एकविसाव्या वर्षी कायद्याची पदवी मिळवून वरोऱ्याला परतल्यावर सिरपूरकरांनी वरोऱ्याच्या कोर्टात पाच आठवडे वडिलांसोबत प्रॅक्टिस केली, पण याच काळात त्यांना राजकारणाचे आकर्षण वाटू लागले. खादीचे कपडे शिवून त्यांनी ‘भाईयों और बहनों’ सुरू केले. प्रकरण कुठे जाणार याची वडिलांना कल्पना आली. ‘आपण फार विद्वान आहात. आपल्या बुद्धीला हे क्षेत्र फार अपुरे पडणार आहे. आता घरातून बाहेर पडा आणि काय वाटेल ते करा,’ असा व्यावहारिक सल्ला देऊन त्यांच्या वडिलांनी हाती २०० रुपये ठेवून नागपूरचा रस्ता धरायला लावला. सिरपूरकरांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा तो क्षण होता. नागपूरला जाऊन त्यांनी जिद्दीने आणि निर्धाराने वकिलीचा व्यवसाय केला. अनेकदा एका रुपयात पोट भरण्याची त्यांच्यावर वेळ आली. मित्राचे वडील ज्येष्ठ विधिज्ञ स. ना. खेर्डेकर यांच्याकडे दीडशे रुपये पगाराने चार-साडेचार वर्षे दिवाणी आणि महसुली कायद्यात नैपुण्य संपादन केल्यानंतर नावाजलेले वकील राव बहादूर सरंजामे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदारी कायद्याच्या क्षेत्रात सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पाच-सहा वर्षे न्यायमूर्ती असताना हीच वरिष्ठ मंडळी त्यांच्यापुढे युक्तिवाद करू लागली. १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रिखबचंद शर्माचा पराभव करून जांबुवंतराव धोटे निवडून आले. शर्मानी त्यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. धोटेंचे वकीलपत्र सिरपूरकर यांच्याकडे, तर अ‍ॅड्. धर्माधिकारींसोबत पाहणाऱ्या कुमकुम डे शर्माच्या वकील. हा खटला धोटेंनीजिंकला आणि कुमकुम डेंनाजिंकले ते सिरपूरकर यांनी. विधि महाविद्यालयातील दिवसांत त्यांचा परिचय होताच. त्याची परिणती प्रेमात आणि विवाहात झाली. कालांतराने धर्माधिकारी न्यायमूर्ती झाले. ‘तू बहोत बदमाश है, एक वकील से शादी किया, दुसरे को जज बना दिया,’ असे रिखबचंद शर्मा आपल्याला गमतीने म्हणायचे, असे न्या. सिरपूरकर सांगतात. कुमकुम डे यांचे आजोबा नागपुरात जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. सिरपूरकरांचा प्रेमविवाह वकिलीच्या व्यवसायात असलेले त्यांचे सासरे व्ही. के. डे यांना मान्य नव्हता. खरे तर व्ही. के. डे हे श्रीधर सिरपूरकर यांचे वर्गमित्र होते. शेवटी १४ वर्षांनंतर मुलाच्या मुंजीच्या निमित्ताने डे कुटुंबीयांचा सिरपूरकरांशी असलेला दुरावा संपला. नंतर त्यांचे सासरे त्यांच्या घरचे सदस्यच बनले.
 ते १९९२ साली न्यायाधीश झाले. पाच वर्षे मुंबई आणि त्यानंतर साडेसहा वर्षे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम केल्यानंतर न्या. सिरपूरकरांची नैनितालला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून दोन वर्षे राहिल्यावर जानेवारी २००७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते दिल्लीत आले. मुख्य न्यायाधीश होताना आणि सर्वोच्च न्यायालयात येताना हितशत्रूंकडून आपल्याला बराच त्रास झाला, याची कटुता मनात दाटलेली आहे, पण त्याचबरोबर आपल्या यशाचे कौतुक करणाऱ्यांच्याही आठवणी ते आवर्जून सांगतात. मॅट्रिकला असताना इंग्रजी व रसायनशास्त्र शिकविणारे सराफसर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून आपला विद्यार्थी कसा दिसतो ते बघण्यासाठी आपल्या सर्व मुलींना घेऊन आले. सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री विलासराव देशमुख भेटायला आले. तुमच्यासाठी काय करू, असा प्रश्न त्यांनी केला. मला काही नको, पण वरोऱ्याला सत्र न्यायालय द्या, असे न्या. सिरपूरकरांनी त्यांना सुचविले. विलासरावांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्या दिवशी सत्र न्यायालयाच्या उद्घाटनासोबत न्या. सिरपूरकरांचा सत्कारही झाला. आपल्या कौतुकाचे हे क्षण त्यांच्या कायम स्मरणात राहिले आहेत. सर्वसमावेशक बुद्धी आणि स्थानिक कायद्यात शिरण्याचे कसब आपल्याला मद्रास हायकोर्टाने शिकवले, असे ते सांगतात. भाषांचे आकर्षण असलेल्या न्या. सिरपूरकरांनी घरी पत्नीच्या सहवासात अस्खलित बंगाली भाषा शिकून घेतली, मद्रासला असताना न्यायालयात स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी तामिळ भाषा शिकली. मुंबईत त्यांचा गुजराती भाषेशी चांगलाच परिचय झाला होता. न्यायदानाच्या प्रक्रियेत त्याचा त्यांना भरपूर फायदा झाला. सर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात पाकिस्तानी अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयात पावणेपाच वर्षे मिळाली. चांगले निकाल लिहिता आले, ज्येष्ठ म्हणून बसता आले याचे त्यांना समाधान वाटते. माणसे किती खुजी आणि किती उंच असू शकतात. त्यांचे विचार किती उच्च आणि हीन दर्जाचे असू शकतात, याचे न्यायमूर्ती म्हणून अनुभव आले. दिल्लीत मुखवटे धारण केलेले लोक फार आहेत. कोण तुमच्याशी कोणत्या उद्देशाने बोलेल यासाठी अतिशय जपून राहावे लागते, असे ते सांगतात. निवृत्तीनंतर वीरप्पा मोईलींच्या आग्रहामुळे ते कॉम्पीटिशन अपीलेट ट्रायब्युनल तसेच एअरपोर्ट इकॉनॉमिक रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी अपीलेट ट्रायब्युनलचे अध्यक्ष कार्यरत आहेत. कॉम्पीटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या अपील्स त्यांच्याकडे येतात.
वरोरा आणि विदर्भावर मनापासून प्रेम असलेल्या सिरपूरकरांच्या रोमारोमांत वैदर्भीय अघळपघळपणा भिनला आहे. वैदर्भीय दिलदारपणा भारतात कुठेही दिसून आला नाही, अशी खंत ते व्यक्त करतात. आपल्या उपजत बिनधास्तपणाला मुरड घालत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अतिशय संयम, निष्ठा आणि गांभीर्याने पार पाडली. त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनातील स्वच्छंदीपणाही मनापासून जोपासला. तरीही बरेच काही करायचे राहून गेल्याचे त्यांना वाटते. तबला शिकायचा होता, संस्कृतचा अभ्यास करायचा होता, अर्थशास्त्र शिकायचे होते, गाणे तांत्रिकदृष्टय़ा शिकायचे होते. ते सर्व करायचे राहून गेले, पण विविध क्षेत्रांतील नामवंत मित्रांच्या गोतावळ्यात साहित्य, क्रीडा, संगीत आणि राजकारणाचा आस्वाद घेता आला याचे त्यांना आत्यंतिक समाधानही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candour of vidarbha
First published on: 06-07-2013 at 12:11 IST