संतांच्या साहित्यातील विपुल विचारधनानं केवळ बुद्धीची सजगता वाढली, असं नाही, तर अंतरंगही भावसंपन्न झालं, हे हृदयेंद्रचं म्हणणं मनाला भिडलं. तो म्हणाला..

हृदयेंद्र – ज्या विठ्ठलाच्या द्वारी भावतन्मयतेच्या वारशासाठी ‘नामयाची पोरं’ भांडली ना, त्या द्वारी नामदेवांची भावनिष्ठा कशी होती? ऐका हं.. (गोंदवल्याचं नित्यपाठाचं पुस्तक कपाटातून काढतो. चाळता-चाळता पृष्ठ एकशेपन्नासवर थबकतो.. मग मित्रांकडे पहात नामदेव महाराजांचा अभंग म्हणू लागतो..)
देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी।।
पाषाण करिसी तरी पायरीचेनि मिषें।।
देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी।।
काष्ठ करिसी तरी स्तंभाचेनि मिषें।। देवा..।।
वृक्ष करिसी तरी तुलसीचेनि मिषें।। देवा..।।
पक्षी करिसी तरी शुकाचेनि मिषें।। देवा..।।
श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषें।। देवा..।।
नामा म्हणे मज कीर्तनाचेनि मिषें।।
देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी।।
योगेंद्र – वा! विलक्षण आर्तता आहे या अभंगात..
हृदयेंद्र – हे विठ्ठला, मला कोणताही जन्म येऊ दे.. कुत्र्यापासून दगडापर्यंत कोणत्याही रुपात जन्म येऊ दे.. पण कोणत्याही जन्मात तुझ्या दारापासून मला दूर होऊ देऊ नकोस.. मला अंतरू नकोस! सुरुवात कुठून करतात? काष्ठापासून.. लाकूडच करणार असशील तर मला स्तंभ म्हणजे खांब कर..
कर्मेद्र – खांब म्हणजे?
हृदयेंद्र – हा देवळातला खांब आहे.. पूर्वीच्या काळी देवळात लाकडी खांब असत ना? तर नामदेव महाराज काय म्हणतात? हे देवा मला लाकूडच करायचं असेल तर तुझ्या देवळातला खांब कर, म्हणजे तुझ्यासमोर अखंड उभं ठाकता येईल! मग म्हणतात, वृक्ष करायचं असेल तर तुझ्याशी एकरूप असलेल्या तुळशीचा जन्म दे!
कर्मेद्र – इथे मला एक शंका आहे.. (हृदयेंद्रचा चेहरा प्रश्नार्थक होतो) आधी म्हटलंय लाकूड करशील तर तुझ्या देवळातला खांब कर, नंतर म्हटलंय वृक्ष करशील तर तुळशी कर.. आता लाकूड हे झाडाचंच असणार ना?
हृदयेंद्र – वा! शंका आहे चपखल.. या क्षणी तरी मला त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही.. पण मला वाटतं, या अभंगात एक क्रम आहे.. झाड, तुळशी, पक्षी, कुत्रा.. सुरुवात आहे ती झाडापासून.. मग ते कोणतंही का असेना.. त्या लाकडाचा संपूर्ण जन्म देवळात जावा, असा भाव आहे.. मग आहे त्याच वृक्षसमूहातलं देवाच्या अंतरंगात स्थान मिळवणारं तुळशीचं झाडं.. नंतर आहे पक्षी.. पक्षीच करणार असशील तर केवळ तुझ्याच लीलाचरित्रात आकंठ बुडालेल्या शुकमहाराजांसारखा जन्म दे, अशी आळवणी आहे.. शुकमहाराज हे मोठे ज्ञानी होते.. आता तुळशी आणि शुकमहाराज यांच्याद्वारे भक्ती आणि ज्ञान यांचा संकेत आहे, बरं का! पण त्यापुढे जाऊन काय म्हणतात? तर हे देवा मी जर तुळशीसारखा तुझा अनन्य भक्त नसेन किंवा शुकमहाराजांसारखा ज्ञानीभक्त नसेन तर निदान मला कुत्रा तरी कर! हा कुत्रा कसा असावा? तर तुझ्या दारी पडून राहाणारा.. तू टाकलेल्या भाकरतुकडय़ावरच जगणारा! या कुत्र्याला ज्ञान नाही की भक्ती नाही. त्याला केवळ एकच माहीत की मालकाच्या दारासमोरून हलायचं नाही.. मालकानं पाठीत काठी घातली तरी त्याला सोडायचं नाही.. आणि हे देवा जर मला माणूसच करायचं असेल तर तुझ्या द्वारी अहोरात्र तुझ्या कीर्तनात रंगलेला जन्म दे! नामदेवांची हीच अनन्यता त्यांच्या पत्नीत, मुलांत, सुनांत संक्रमित झाली होती..
योगेंद्र – एकाच विचारानं, एकाच भावनेनं भारलेली माणसं एकाच घरात असणं, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.. एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर यांची उदाहरणं आहेतच.. कबीर आणि कमाल ही बापलेकाची जगावेगळी जोडीही आहेच..
हृदयेंद्र – असे अनेक संत या देशात होऊन गेले असतील, त्यांची माहिती आपल्याला नाही.. पण नामदेवांइतकेच विठ्ठलभक्तीत तन्मय झालेले आणि पत्नी, बहिण, मुलगा, मेहुणा यांनादेखील या भक्तीप्रेमाचा वारसा दिलेले फार मोठे संत झाले चोखामेळा! त्यांचं गुणगान नामदेवांनीही गायलं आहे..

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…