आपला देह आणि आपलं मन हे दोन्ही आज भौतिक जगात जखडलं आहे. त्यामुळेच देहाच्या आणि मनाच्या सर्व अवस्थांत भौतिक जगाचाच प्रभाव आहे. भौतिक जग हे अशाश्वत आहे. त्यामुळे देह आणि मनावर तसेच देह आणि मनाच्या अवस्थांवर अशाश्वताचाच प्रभाव आहे. आता धनाचा विचार करू. धन म्हणजे आपल्याला पैसा वाटतो. प्रत्यक्षात धन म्हणजे माझ्याकडे जे जे आहे ते. या धनाचे तीन प्रकार सांगता येतील. त्यातील दोन प्रकार म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म. माझ्याकडे स्थूल असे भौतिकही आहे त्याचप्रमाणे सूक्ष्म अशा क्षमताही आहेत. देहापासून ते भौतिक पसाऱ्यापर्यंतचे सारे काही स्थूल आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा समस्त क्षमता या सूक्ष्म आहेत. हे समस्त जगत स्थूल आणि सूक्ष्माने भरले आहे. त्याबरोबरच त्याची जी तिसरी अज्ञात मिती आहे ती दिव्य आहे! या चराचरात परमात्मा भरला आहे. तो जाणवेल तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म भौतिकातील दिव्यत्वही जाणवू लागेल. आता साधकापुरता थोडा विचार करू. देह आणि देहाच्या तीन अवस्था, मन आणि मनाच्या तीन अवस्था यांचा विचार केला की जाणवेल स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि त्यानंतर अतिसूक्ष्माकडे असा त्यांचा क्रम आहे. कारण देह आणि सुषुप्ती अवस्था या अतिसूक्ष्माचा संकेत करतात. भौतिकातील स्थूल आणि सूक्ष्मानंतर दिव्याची पातळी ही अतिसूक्ष्म आहे. तन, मन आणि धनाचं जसजसं समर्पण होत जाईल तसतसं या तिन्हींच्या अतिसूक्ष्म अवस्थेपर्यंत साधक पोहोचेल त्यानंतर त्याचं जीवन दिव्य होईल. आज आपण सद्गुरूंना आपण तन, मन, धन समर्पित केल्याचं नुसतं म्हणतो. प्रत्यक्षात त्या समर्पणाचा खरा अर्थही आपल्याला माहीत नसतो. तन, मन आणि धनाचं समर्पण म्हणजे काय? देहाचं समर्पण म्हणजे देहाच्या सवयींचा, देहबुद्धीचा, देहाच्या सुखासीनतेचा त्याग. मनाचं समर्पण म्हणजे मनाच्या सवयींचा, मनाच्या विकारवशतेचा, मनाच्या वासनालोलुपतेचा त्याग. धनाचं समर्पण म्हणजे धनासक्तीचा, भौतिकाच्या आसक्तीचा, भौतिकालाच सर्वस्व मानण्याच्या वृत्तीचा, भौतिकावर विसंबण्याच्या सवयीचा त्याग. आता तन, मन आणि धन या क्रमवारीतील धनाचा खरा अर्थ पाहू. हे धन म्हणजे आत्मा! आत्मस्वरूप हाच जिवाचा खरा आधार आहे. परमात्म्याचा हाच दिव्यांश आहे. त्या आत्मस्वरूपाची जाणीव होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन दिव्यत्वानं भरून जाईल. माणूस म्हणजे नुसतं शरीर किंवा मन नव्हे. शरीर, मन आणि आत्मा यांची तो त्रयी आहे. पू. बाबा बेलसरे यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘शरीर आणि मन यांना सर्वस्व मानून आत्म्याला विसरणे म्हणजे आत्महत्याच आहे!’ तेव्हा शरीर आणि मनात ज्या आसक्तीनं मन अडकलं आहे त्या आसक्तीचा त्याग म्हणजे तन आणि मनाचं समर्पण आहे. त्यानंतर आत्मधनाची जाणीव होईल. ते आत्मधनही त्यांच्याच चरणीं समर्पित करणं म्हणजे तन, मन आणि धनाचं पूर्ण समर्पण. मग सर्व काही ज्याला हे साधेल तोच ‘आपुलें मरण पाहिले म्यां डोळां। तो झाला सोहळा अनुपम्य।।’’ म्हणू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2013 रोजी प्रकाशित
चैतन्य चिंतन १७७. धन
आपला देह आणि आपलं मन हे दोन्ही आज भौतिक जगात जखडलं आहे. त्यामुळेच देहाच्या आणि मनाच्या सर्व अवस्थांत भौतिक
First published on: 09-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 177 wealth