श्रीगोंदवलेकर महाराजांनी आनंदाच्या प्राप्तीसाठी जो उपाय सांगितला आहे ती म्हणजे आनंदाकडे नेणारी पायवाटच आहे! श्रीमहाराजांचे जे बोधवचन आपण पाहात आहोत, त्या संदर्भात पायवाट या शब्दाला फार अर्थगर्भ छटा आहेत. मुक्कामाला लवकर पोहोचविणाऱ्या जवळच्या मार्गाला आपण पायवाट म्हणतो. नेहमीच्या रस्त्यासारखी ती सुखदायी नसते. ती दगडमातीची, प्रसंगी डोंगरदऱ्यातूनही जाणारी असू शकते. पण तीच सर्वात जवळचा मार्ग असते. पायवाटचा दुसरा अर्थ असा की ती केवळ पायांनीच कापता येते. म्हणजेच आचरण करूनच हा मार्ग क्रमावा लागतो, तरच आपण मुक्कामाला पोहोचतो. मग श्रीमहाराजांनी सांगितलेली आनंदाची ही पायवाट कोणती आहे? श्रीमहाराजांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘राम कर्ता मानून स्मरणात राहणे हाच आनंदाचा खरा मार्ग होय. ज्या भगवंताजवळ आनंद राहतो त्याचे होऊन राहिले तरच अखंड आनंदी होता येईल!’’ म्हणजेच कर्तेपण भगवंताकडे देणे, त्याच्याच स्मरणात राहणे आणि त्याच्याच जवळ राहणे, हीच आनंदाकडे नेणारी पायवाट आहे. आता आपणही जन्मापासून मरेपर्यंत आनंद मिळावा, याच हेतूने धडपडत असतो. आनंद मिळावा म्हणून आपले कित्येक जन्म खर्ची पडले पण अतृप्त मनानेच आपण जग सोडत आलो आहोत. या आनंदाचा खरा शोध संतांनीच केला, असं श्रीमहाराज सांगतात. आता सर्वच संतांची चरित्रं डोळ्यासमोर आणून पाहा. घरची माणसं दुष्काळानं अन्नाअभावी दगावणं, ऐश्वर्य नष्ट होऊन गरिबी येणं, लोकांनी सतत अपमान करीत राहणं, ही संकटं काय कमी आहेत? तुकाराममहाराजांनी आयुष्यभर ती भोगली. (आता तुकोबांच्या दु:खात कोणी पत्नीची साथ नसणं, हे दु:खंही जोडतील. पण तुकाराममहाराज जसे विठ्ठलाला सर्वस्व मानून अखंड ध्यानमग्न असत तशी आवलाई ऊर्फ जिजाबाई ही तुकाराम महाराजांना सर्वस्व मानून दिवसरात्र त्यांच्याच स्मरणात असे. ‘काळतोंडय़ा’ म्हणून का होईना, विठ्ठलाचं तिला सतत स्मरण असे आणि दोन-तीन डोंगर पालथे घालून पतीला खाऊ घातल्याशिवाय ती अन्नाचा घास घेत नसे. या भक्तीची अलौकिकता आपल्याला कशी समजणार?) संत सखूला टोकाचा सासुरवास होता, चोखामेळा महाराजांना जात्यंधांचा जाच होता, ज्ञानेश्वर व सर्वच भावंडांना समाजाने वाळीत टाकले होते.. प्रत्येक संतांचं लौकिक चरित्र असं अपमान, अत्याचार, उपेक्षा यांनी भरलेलं आहे. त्यांच्या तुलनेत आपलं जीवन वरकरणी कितीतरी सुखाचं आहे तरी आनंदाचा शोध संतांनाच लागला आणि आम्ही अतृप्तच का? त्यातही विशेष गोष्ट अशी की संतांना त्यांच्या जीवनकार्याच्या अखेरी अखेरीस लोकांकडून मान मिळू लागला. म्हणजेच त्यांचं बहुतांश जीवन वरकरणी पाहता दु:खांनीच भरलं होतं. तरीही त्याच जीवनात त्यांना आनंदाचा शोध लागला आणि चांगले दिवस आले तरी आम्ही आनंद गवसल्याचा दावा करू शकत नाही. असे का? कारण, आनंदाची पायवाट केवळ संतांनीच तुडवली. आम्ही पहिल्या पावलावरच अडखळतो!
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2013 रोजी प्रकाशित
१८०. आनंदाची पायवाट
श्रीगोंदवलेकर महाराजांनी आनंदाच्या प्राप्तीसाठी जो उपाय सांगितला आहे ती म्हणजे आनंदाकडे नेणारी पायवाटच आहे
First published on: 13-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan 180 path to happiness