जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार असला तरी प्रत्येकजण काही परमार्थाच्या मार्गावर वाटचाल सुरू करतोच, असं नाही. काहीजण चांगला माणूस होण्याचं ध्येय बाळगून तसं जगण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातही गैर काहीच नाही. ‘माणुसकीला साजेसं वर्तन आपल्याकडून व्हावं, बाकी भगवंत वगैरे मी मानत नाही की जाणत नाही’, असा प्रामाणिक भाव असलेलेही काहीजण असतात. ढोंगी पारमार्थिकापेक्षा अशा स्पष्ट प्रापंचिकांमुळे समाजात काही चांगल्या गोष्टीही घडतात. अर्थात ‘चांगला माणूस’ बनणंदेखील सोपं नसतं. ज्याचं आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे तोच खऱ्या अर्थानं स्वतंत्र असतो आणि तोच चांगला माणूस बनू शकतो. तेव्हा साधक वगैरे सोडून द्या, ज्याला चांगला माणूस बनायचं आहे त्यालाही मनावर ताबा असेल तरच आपल्याकडून चांगलं वर्तन होऊ शकतं, हे जाणवल्याशिवाय राहात नाही. मनाच्या ओढीमुळे वाहावत आपण माणसाच्या शरीरात राहूनही पशुवत कृत्ये करतो. मनाच्या ओढीमुळेच दगदग ओढवून घेतो आणि आपली शक्ती, क्षमता, पैसा तसेच वेळ वाया घालवतो. तेव्हा मन ताब्यात असण्याची गरज प्रत्येकालाच आयुष्यात कधी ना कधी जाणवतेच, पण ते ताब्यात आणता मात्र येत नाही. मन ताब्यात आणायचं म्हणजे तरी नेमकं काय हो? मन ताब्यात आणण्याची गरज आपल्याला का वाटते? समाजात वावरताना आपण मन ताब्यात आणण्याचे प्रयत्न करतोही आणि अनेकदा ते साधतातही, असाही प्रत्येकाचाच अनुभव असेल. घरात पती-पत्नीचं भांडण सुरू असतानाच कुणी पाहुणे आले तर दोघेही आपल्या मनाला आवर घालून म्हणजेच मनात जोडीदाराविषयी उसळलेल्या विरोधी ऊर्मीना आवर घालून पाहुण्याचे हसतमुखानं स्वागतही करतात. त्याच्याशी गप्पा मारताना आपल्यातला तणाव जाणवू नये, अशी काळजीही घेतात. कार्यालयात असताना दूरध्वनीवरून कुणाशी तुमचा वाद झाला आणि तेवढय़ात साहेबानं बोलावलं तर त्याच्यासमोर जाताना आपण हसतमुखाने जायचाच प्रयत्न करतो. तेव्हा मनाला आपणही आवर घालतो. त्यात हेतू हा आपली बाजू पडू नये, हाच असतो. आपल्या काही सवयी या लाडाच्याही झाल्या असतात. म्हणजे, सकाळी जाग आल्यावर चहा प्यायलाशिवाय मी काही काम सुरू करूच शकत नाही, जेवणात गोडाचा पदार्थ नसेल तर मला जेवण जातच नाही, चहात अमुक चमचे साखर मला लागतेच अशा लहानसहान सवयींपासून राहणीमान, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर, कौटुंबिक वारसा प्रतिबिंबित होणाऱ्या सवयीही मनाला जडल्या असतात. परमार्थाचा मार्ग हा तर ‘मी’ आणि ‘माझे’पणावरच घाव घालणारा आहे. त्यामुळे या मार्गात सर्वच तऱ्हेच्या सवयींना मुरड घालावीच लागते. त्यासाठी मनाच्या सवयींच्या उलट जाण्याचे ‘कष्ट’ टाळता येणार नाहीत. असे असले तरी मनाची सवय मोडणे आपल्याला फार कठीण जाते. मनाच्या सवयीविरुद्ध जाणे म्हणजे मनाविरुद्ध घडू देणे, यासारखी मोठी कष्टाची गोष्ट दुसरी नाही. समर्थही म्हणतात, ‘न होता मनासारिखे कष्ट मोठे!’
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2013 रोजी प्रकाशित
१४६. कष्ट मोठे!
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताच्या प्राप्तीचा अधिकार असला तरी प्रत्येकजण काही परमार्थाच्या मार्गावर वाटचाल सुरू करतोच, असं नाही.
First published on: 25-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan good human being