आपण भगवंताचे होऊन गेलो तर काळ आपल्यापुढे ‘जी जी’ करील, अर्थात आपला दास होईल, असा श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या सांगण्याचा आशय आहे. काळावर आपली सत्ता गाजवता येईल, यावर आपला मात्र या घडीला विश्वास बसत नाही. मुळात काळ दास होईल, म्हणजे काय, हेदेखील आपल्याला नीटसे उमजत नाही. आता जिथे दास आहे, तिथे मालकही आला. सध्या काळ हा मालक आहे आणि आपण त्याचे दास आहोत. म्हणजेच काळाची आपल्यावर सत्ता आहे. काळाच्या पकडीत आपण जगत आहोत. जर आपण भगवंताचे झालो तर हे चित्र पालटेल. नारदमुनींच्या रूपाने ‘एकनाथी भागवता’त हीच गोष्ट बिंबवली आहे. नारदांनी दक्षाच्या सर्व पुत्रांना परमार्थाकडे वळविले. ऐहिकाबाबत उदासीन झालेले आपले पुत्र पाहून दक्ष खवळला. आपले पुत्र आपल्या सांगण्यानुसार भौतिक वाढविण्यासाठी धडपडण्याऐवजी नारदांच्या सांगण्यानुसार भगवंताच्या भक्तीत गढले आहेत, हे पाहून दक्षाच्या मनात नारदांबद्दल संताप खदखदत होता. त्या भरात दक्ष नारदांना म्हणाला, ‘भगवंताची भक्ती मीदेखील करतो. परमार्थ मीदेखील करतो. पण ज्यांनी संसाराचा अनुभवही घेतलेला नाही अशा माझ्या पुत्रांना तू संसार करण्याआधीच परमार्थाकडे वळवत आहेस. माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये तू फूट पाडत आहेस. साधूच्या वेशातला तू राक्षसच आहेस.’ (प्रपंचात ‘दक्ष’ असलेल्यांची आजही हीच भावना आहे की परमार्थ ही म्हातारपणाची गोष्ट आहे किंवा परमार्थ सुरू केला की प्रपंच संपलाच!) त्यानंतर दक्षाने नारदांना शाप दिला की, ‘तुम्ही त्रलोकात संचार कराल, पण एका ठायी मुहूर्तभरदेखील तुम्हाला थांबता येणार नाही. थांबलात तर काळाचा घाला पडलाच समजा.’ नारदांनी या शापाला ‘तथास्तु’ असा वर दिला! तेव्हापासून नारद मुहूर्तभरदेखील एके ठिकाणी थांबत नाहीत. पण त्याला अपवाद आहे तो द्वारकेचा. उलट ते वारंवार द्वारकेत येतात. याचं कारण उलगडताना ‘एकनाथी भागवता’त म्हंटलं आहे की, ‘‘हो कां जे द्वारकेआंत। न रिघे भय काळकृत। जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ। असे नांदत निजसामथ्र्ये।। दक्षशापु नारदासी पाहीं। मुहूर्त राहों नये एके ठायीं। तो शापु हरिकीर्तनीं नाहीं। यालागीं तो पाहीं कीर्तननिष्ठु।। ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती। तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती। तेथें शापबाधेची न चले प्राप्ती। यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें।। (अध्याय २/ ओव्या- २५, २६,२७) ऐकें बापा नृपवर्या। येऊनि उत्तमा देहा या। जो न भजे श्रीकृष्णराया। तो गिळिला माया अतिदु:खें।। ३०।। त्यजूनि परमात्मा पूर्ण। नाना साधनें शिणती जन। त्यासी सर्वथा दृढबंधन। न चुके जाण अनिवार।।३३।। सांडूनि श्रीकृष्णचरण। इंद्रादि देवांचें करितां भजन। ते देव मृत्युग्रस्त पूर्ण। मा भजत्याचें मरण कोण वारी।।३४।। असोनि इंद्रियपाटव पूर्ण। जो न भजे श्रीकृष्णचरण। त्यासी सर्वत्र बाधी मरण। क्षणक्षण निर्दाळी।।३५।।’’ (अध्याय २). या ओव्यांमध्ये मोठा गूढार्थही भरला आहे. त्याचबरोबर भगवंताच्या आधाराने महाभयातूनही कशी सुटका होते, ते सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan lord and slave
First published on: 25-06-2013 at 12:03 IST