आपण सर्वार्थाने श्रीमहाराजांचे नाही तर देहबुद्धीचेच आहोत. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण देहबुद्धीनुरूप कृती करण्यात, देहबुद्धीनुरूप कल्पना करण्यात किंवा देहबुद्धीनुरूप इच्छारूपी संकल्प करण्यात व्यतीत होतो. ही देहबुद्धी संकुचित असल्यामुळे आपली कृती, कल्पना आणि संकल्पसुद्धा संकुचितच असतात. मोहग्रस्त असतात. त्यामुळे ते काळजीच वाढवतात. आपला प्रत्येक क्षण असा अंत:करणात सूक्ष्म रूपाने काळजीचं बीजारोपणच करीत असतो. त्यामुळे आपला प्रत्येक क्षण सार्थकी न लागता व्यर्थच जात असतो. श्रीमहाराज म्हणूनच सांगतात की, ‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला!’ आता कृती, कल्पना थांबविणे आणि कोणतीही इच्छा मनात उमटू न देणे अर्थात संकल्पमुक्त होणे आपल्याला शक्य नाही. मग यावर उपाय काय आणि कोणता, ते आता पाहू. श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितलेल्या दु:खाच्या तीन प्रकारांच्या अनुरोधाने आपण गेले दहा दिवस ‘काळजी’चा विचार करीत आहोत. या तीन दु:खात पहिलं आहे जन्मजात दु:ख, दुसरं आहे परिस्थितीजन्य दु:ख आणि तिसरं आहे कल्पनेचं दु:ख. कल्पनेचं दु:ख कल्पनेनं दूर होत नाही, उलट जितकी कल्पना करावी तितकं ते वाढतच जातं. कल्पनेचं दु:ख म्हणजेच काळजीचं दु:ख. या अनुषंगाने आपण काळजीचा विचार केला. आता ही काळजी तरी का लागते आणि कशाच्या आधारावर टिकते? आपण ज्या परिच्छेदावरून ही चर्चा ११३ व्या भागापासून सुरू केली आहे त्यात श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘काळजी फार भयंकर आहे व ती भगवंताच्या विस्मरणात म्हणजे नसणेपणातच आहे. मायेचा पडदा इतका जोरदार आहे की, भगवंत आहे असे वाटत असूनही काळजी लागते हे खरे’. आता गंमत अशी की जे भगवंताला मानत नाहीत त्यांना काळजी असतेच पण जे आपण भगवंताला मानतो, असं मानतात त्यांनाही काळजी लागते. मग काळजी आणि भगवंताचा काय संबंध असावा? याचा विचार करताना एक मार्मिक प्रसंग आठवतो. हा प्रसंग ल. ग. मराठे यांनी संकलित केलेल्या ‘हृद्य आठवणी’ पुस्तकामध्ये आहे. प्रपंच करीत असतानाच भगवंताची भक्ती करावी, असे श्रीमहाराज नेहमी सांगत. म्हणून एकाने त्यांना प्रश्न केला की, ‘भगवंताची भक्ती करणे अगदी जरूरच आहे का? ती नाही केली तर नाही का चालणार?’ यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘मलासुद्धा अलीकडे प्रपंचात ईश्वरभक्तीची लुडबुड असू नये असे फार वाटते. प्रपंचात मन सर्वस्वी मुरल्यावर प्रापंचिक सुखे भोगण्यास माझी पूर्ण परवानगी आहे. पण माझी एक अट आहे ती अशी की प्रपंच करीत असता तुम्ही जी काळजी करता ती कदापि करायची नाही. कोठल्याही परिस्थितीत काळजी न करता प्रपंच केला तर ईश्वरभक्ती न करण्यास माझी पूर्ण संमती आहे.’ प्रश्नकर्ता म्हणाला, ‘प्रपंचात परिस्थिती नेहमीच अनुकूल राहते असे नाही. प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे काही म्हटले तरी काळजी उत्पन्न होतेच.’ आता यावर श्रीमहाराज काय उत्तर देतात, ते पाहू.