कल्पनाशक्तीचा दुरुपयोग म्हणजे काय, हे पाहाण्यासाठी आधी मुळात कल्पना कशाच्या आधारावर चालते, तिचा उगम कुठे असतो, हे पाहिले पाहिजे. आपण कल्पना करतो त्यांना आधार कशाचा असतो? त्यांना आधार असतो तो विचाराचा. आपण विचाराच्या आधाराशिवाय कल्पना करू शकत नाही. हा विचार कशाच्या आधारावर चालतो? तो बुद्धीच्या आधारावर चालतो. थोडक्यात बुद्धी जो बोध करते त्यानुसार आपण विचार करतो. आता उत्तम साहित्य, उत्तुंग कलाविष्कार, क्रांतिकारक शोध यांच्या मुळाशी जी कल्पना असते ती सूक्ष्म सद्बुद्धीतूनच उगम पावली असते. आपली बुद्धी कशी आहे? आपली बुद्धी केवळ ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या चौकटीत चिणलेली आहे. ती देहबुद्धी आहे. संकुचित आहे. कित्येकदा ती कुबुद्धीच भासते. विपरीत बुद्धीच भासते. अशा संकुचित देहबुद्धीद्वारे विचाराऐवजी अविचार आणि कुविचारच प्रसवतात. अविचारातून ज्या कल्पना उत्पन्न होतात त्या काळजीच वाढवतात. या कल्पना काळजी, अस्थिरता, अनिश्चितताच निर्माण करतात. हा कल्पनाशक्तीचा दुरुपयोग आहे! आता कसा का असेना आपल्या कल्पनेचा उगम बुद्धीतच आहे. आता या काळजीचा उगम कुठे आहे? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘काळजी ही आपल्या काळजापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत असते; नव्हे ती आपल्या काळजापाशीच असते!’’(चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. १६). तेव्हा बुद्धीतून कल्पना आणि हृदयातून काळजीचे पोषण होते. हृदय आणि बुद्धीचा हा असा संगम सुखावह नसतो. तो जीवनात आंतरिक अशांती आणि आंतरिक अस्थिरताच आणतो. काळजी ही काळजात खोलवर सुरू असताना ती आपला किती आंतरिक घात करते, ते जाणवतही नाही. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘काळजी ही वाळवीसारखी आहे. काही खाताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे आपली निष्ठा कमी करीत असताना काळजी दिसत नाही. परंतु नंतर मात्र ती दिसते’’ (चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. २०). वाळवी फार सूक्ष्म असते. तशीच काळजी फार सूक्ष्म असते. वाळवी जसे अख्खे पुस्तक नष्ट करून टाकते तशी ही काळजी आपली निष्ठा नष्ट करते. वाळवी जशी पुस्तक खाताना दिसत नाही तशीच काळजी ही निष्ठा कमी करताना जाणवत नाही. एकदा निष्ठा पूर्ण नष्ट झाली की ती काळजी दिसते. आता काळजीनेच निष्ठा नष्ट होते आणि नंतर काळजी दिसते म्हणजे काय? संकट ओढवलं असलं तरी निष्ठा टिकून असेल तर माणूस धीराने त्या संकटाला तोंड देतो. पण संकट ओढवलं असताना जर काळजी लागली तर ती हळुहळू निष्ठाच नष्ट करू लागते. ‘आम्ही श्रीमहाराजांसाठी एवढं करतो मग हा प्रसंग आमच्यावर का? त्यांना आमची काहीच काळजी कशी नाही?’ हे या वाळवीचं निष्ठा खाणं आहे! एकदा या काळजीनं निष्ठा नष्ट केली की मग? निष्ठा होती तोवर निदान संकटाला तोंड देता येत होतं आता तीच नष्ट झाली की अधिकच उग्ररूपाने काळजीच दर्शन देते!
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2013 रोजी प्रकाशित
११५. वाळवी
कल्पनाशक्तीचा दुरुपयोग म्हणजे काय, हे पाहाण्यासाठी आधी मुळात कल्पना कशाच्या आधारावर चालते, तिचा उगम कुठे असतो, हे पाहिले पाहिजे. आपण कल्पना करतो त्यांना आधार कशाचा असतो? त्यांना आधार असतो तो विचाराचा. आपण विचाराच्या आधाराशिवाय कल्पना करू शकत नाही. हा विचार कशाच्या आधारावर चालतो? तो बुद्धीच्या आधारावर चालतो.
First published on: 12-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan termite