श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘ज्याने प्रपंच जिंकला त्याने जग जिंकले. ज्याने आपल्याला जिंकले त्याने प्रपंच जिंकला. मी देवाचा दास झालो तर मीजिंकला जाईल.’’ जग जिंकायचं असेल तर आधी त्या जगाचा एक भाग असलेला प्रपंच जिंकला पाहिजे. प्रपंच जिंकायचा असेल तर आधी स्वत:ला जिंकावे लागेल. भगवंताचा दास बनलो तरच स्वत:ला जिंकता येईल, असा हा क्रम आहे. तेव्हा जग जिंकायचं असेल तर आधी स्वत:ला जिंकता आलं पाहिजे. आता स्वत:ला जिंकायचं म्हणजे तरी नेमकं कोणाला जिंकायचं? आपण आपल्यालाच जिंकायचं, म्हणजे काय? याची उकल करण्यासाठी आधी ‘मी’ कोण आहे, हेच तपासावं लागेल. मी खरा कोण आहे, हा तत्त्वज्ञानातला गहनगंभीर प्रश्न या घडीला सोडून देऊ, पण आज मी स्वत:ला जे काही मानतो, जे काही ओळखतो ती ओळख तरी खरी आहे काय? माझ्या अंतरंगात किती सुप्त वासना आणि विकार आहेत आणि त्यांच्या प्रेरणेनुसार मी कसा जगत असतो, हे अलिप्तपणे आपण कधी जाणतो काय? या विकार-वासनांनी भारलेला जो ‘मी’ आहे तो भ्रम, अज्ञान, मोह यांच्या पायावरच उभा आहे. या ‘मी’लाच मी खरा मानतो. त्याच्या विकार-वासनाशरण जगण्यालाच मी खरं जगणं मानतो. या ‘मी’च्या समस्त इच्छा या भ्रामक व अज्ञानमूलकच असतात. त्या इच्छांच्या पूर्तीलाच मी जीवनाचं सर्वोच्च ध्येय मानत असतो. तेव्हा या भ्रामक ‘मी’ला जिंकणं, हेच स्वत:ला जिंकणं आहे. हा भ्रामक ‘मी’ जर पराभूत झाला, जिंकला गेला तर त्याचा जो ‘माझे’पणाचा पसारा आहे, तो प्रपंचही आपोआप जिंकला जाईल. तो जिंकला गेला तर या ‘माझे’पणाचा अर्थात प्रपंचाचा विस्तार असलेलं माझं ‘जग’ही आपोआप जिंकलं जाईल. तेव्हा ‘मी’ला जिंकणं, ही सुरुवात आहे आणि या ‘मी’लाजिंकायचं असेल तर मला भगवंताचं दास्य पत्करायला हवं. आता हे दास्य पत्करणं म्हणजे तरी काय? आपल्याला वाटतं की माणसानं स्वतंत्र वृत्तीचं असलं पाहिजे. भगवंताचं दास्य वगैरे तर वेडेपणा आहे. भ्रामक कल्पना आहे. प्रत्यक्षात आपण स्वतंत्र असतो का? आपण जगाचे, प्रपंचाचे आणि आपल्या वासना-विकारांचेही गुलामच असतो. त्यांच्या पकडीत, त्यांच्या कलानं जगताना आपण सुखी होण्याचा आणि सुखी राहाण्याचा अविरत प्रयत्न करीत असतो. तेव्हा जगाची, बाह्य़ प्रभावाची गुलामी सोडून अंतरात्म्याशी स्वत:ला जोडून घेणं म्हणजे भगवंताचं दास्य पत्करणं आहे. वासनेतून जन्मलेल्या आणि वासनेच्या आधारावर पोसल्या जात असलेल्या भ्रामक ‘मी’ला निर्वासन करणं आणि त्याच्या वा जगाच्या कलानं नव्हे तर भगवंताच्या इच्छेनुसार जगणं म्हणजे भगवंताच्या आधारावर जीवन जगणं आहे.  ते जगणं अधिक व्यापक असेल, आनंदानं ओतप्रोत भरलेलं असेल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘वासनेत जन्माला येऊन देवाला दत्तक गेल्यावर आपले मरण आपल्या डोळ्यांना दिसेल’’ (बोधवचने, क्र. ६०१).