१७ नोव्हेंबर १९८९ हा दिवस त्या कुटुंबासाठी दुर्दैवी ठरेल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणीला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने उडवले. त्यात तिचा साखरपुडय़ाच्या आधीच मृत्यू झाला. तिचे नाव राजश्री परमार. या घटनेनंतर तिचे वडील चांदमल परमार यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व लक्षात आले. दु:ख व्यक्तिगत असले तरीही आपले सारे आयुष्य याच कारणासाठी वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले.
गेली दोन दशके त्यांच्या राजश्री परमार मेमोरियल फाऊंडेशनतर्फे पुण्यात आणि राज्यात विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा या विषयावर अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. १९९० मध्ये इतरांच्या कुटुंबीयांवर अशी वेळ येऊ नये यासाठी राजश्रीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे वापरून या फाऊंडेशनची स्थापना केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी या संस्थेने मोठे काम केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्यांची नेमणूक रस्ते सुरक्षा मंडळावर सदस्य म्हणून केली होती. त्यांना केंद्र सरकारचा भारतीय सुरक्षा पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही मिळाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सिटिझन फोरमशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्याच्या माध्यमातूनही त्यांनी रस्ता सुरक्षेसाठी काम केले. भारतात गेल्या दहा वर्षांत १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत, त्यामुळे परमार यांनी या क्षेत्रात केलेले काम किती महत्त्वाचे आहे हे समजते. त्यांच्या मूळ राज्यात म्हणजे राजस्थानात त्यांनी राजश्रीच्या नावाने साद्री खेडय़ात शेठ मोतीलाल हिराचंद परमार शाळा सुरू केली होती. सिम्बायोसिसचे प्रमुख शां. ब. मुजुमदार व उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या मदतीने त्यांनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल शिवाजीनगर येथे सुरू करण्यात मोठा वाटा उचलला. परमार यांनी राज्यातील ५० हजार किलोमीटरचे रस्ते अभ्यासले होते व तिथे किमान ४ हजार अपघातप्रवण जागा शोधल्या होत्या. ग्रामीण भागात परमार फाऊंडेशनने बैलगाडय़ांना १२ हजार परावर्तक पुरवले होते, त्यात मोटारी बैलगाडय़ांवर आदळू नयेत हा हेतू होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करताना त्यांनी सरकारबरोबर काम केले. मुले व पालक यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवताना त्यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे त्यांच्याच फायद्याचे आहे, असा आग्रह धरला होता. अपघातग्रस्तांना जे वाचवतात त्यांनाच पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला तोंड द्यावे लागते ते प्रकार बंद व्हावेत, असे परमार यांनी प्रथम पोलीस खात्यास सांगितले होते. त्यांच्या निधनानंतरही रस्ता सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची कायम आठवण राहील यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandmal parmar profile
First published on: 20-08-2015 at 03:41 IST