श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘मनासारखे न घडणे, सारखे बदलणे हाच मुळी प्रपंचाचा धर्म आहे. म्हणून अनिश्चित प्रपंचात राहावे पण आधार धरावा भगवंताचा. तरच समाधान टिकेल.’ प्रपंच अनिश्चित आहे. याचा अर्थ प्रपंचाचा जो प्रवाह आहे, त्यात जे चढउतार आहेत त्याबद्दल मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही. मी अपेक्षा करतो त्याप्रमाणे अर्थात माझ्या मनासारख्या गोष्टी प्रपंचात घडतीलच, हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. तेव्हा हा प्रपंच अनिश्चित आहे. त्याचं रूप सतत बदलणारं आहे. मी स्वतसुद्धा किती बदलत असतो! वय, विचार, प्रकृती यानुसार माझ्याही जीवनात प्रत्येक वळणावर किती पालट होत असतो. एक सुशिक्षित वयोवृद्ध गृहस्थ श्रीमहाराजांना भेटले. नोकरीतून ते निवृत्त झाले होते. आपला कर्ता मुलगा आपलं ऐकत नाही, अशी त्यांची तक्रार होती. आपण आजवर अनंत अडचणी सोसून त्याला मोठं केलं. त्यानं आता आपल्या कष्टांची जाण ठेवावी आणि आपल्या मनाविरुद्ध वागू नये, अशी त्यांची अपेक्षा होती. श्रीमहाराजांनी सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाले, ‘त्याच्याकडे फारसा दोष नाही, असं मला वाटतं.’ श्रीमहाराजांचं हे उत्तर त्या गृहस्थाला अनपेक्षित होतं. त्यानं एक-दोन प्रसंग सांगितले आणि मुलाचं वागणं कसं चूक आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरी महाराज म्हणाले, ‘त्याची काही चूक नाही.’ आश्चर्यानं तो गृहस्थ म्हणाला, ‘महाराज, आपल्याला काय म्हणायचं आहे, माझ्या लक्षात येत नाही.’ महाराज म्हणाले, ‘‘आज तो ज्या वयाचा आहे त्या वयाचे आपण होतो तेव्हा आपण आपल्या वडिलांशी कसे वागलो होतो हे आठवावे. मग तेव्हा आपण तसे वागलो नाही, हे आपल्याला आठवल्यावर मुलाच्या वागण्याचा विषाद कमी होईल!’’ म्हणजेच मुलाच्या वयाचा असताना वडिलांकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या वडिलांच्या वयाचा झाल्यावर बदलल्या! थोडं वय वाढलं की घराबाहेरच राहायला मुलांना आवडतं. ‘मी बाहेर जाऊन येतो,’ एवढंच सांगून आपणही थोडं जाणत्या झालेल्या वयात घराबाहेर भटकत होतोच. आता बाप झाल्यावर मुलानं तेच सांगितलं तर आपली प्रतिक्रिया बदलते! तर सांगायचा मुद्दा वयाच्या फरकानं आपल्यातसुद्धा किती बदल होतो. वर्तनातला, अपेक्षांमधला हा बदल प्रत्येक नात्यात होतो आणि नात्यांनुसारसुद्धा तो बदलतो. एका बाईंची मुलगी गावातच दिली होती आणि सूनही गावातलीच होती. श्रीमहाराजांनी नव्या सुनेबद्दल विचारलं तेव्हा बाई म्हणाल्या, ‘तशी चांगली आहे पण एकच खोड आहे. आठवडय़ातून दोन-तीनदा माहेरी गेल्याशिवाय तिला चैन पडत नाही.’ मग मुलीचा विषय निघताच मायेनं बाई म्हणाल्या, ‘ती सुखात आहे आणि हो आम्हाला विसरलेली नाही. एक दिवसाआड मला भेटायला येतेच येते!’ तेव्हा प्रपंचातला आपला वावर असा वयागणिक, प्रसंगागणिक, नात्यागणिक बदलताच असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change
First published on: 15-01-2013 at 11:51 IST