कुणाला मदत करण्यात काही गैर आहे काय, असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. एक गोष्ट खरी आहे की असा विचार मनात येणंही आजच्या काळात कठीण आहे. कारण आज आपलं जगणं इतकं स्वकेंद्रित झालं आहे की आपल्यापलीकडे दुसऱ्या कुणाच्या दुखाचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. तेव्हा हा विचार मनात येणं चांगलंच आहे पण या विचारामागे आपल्याच अज्ञात मनात काही सुप्त हेतू दडलेले असतात की त्यांची आपल्याला जाणीवही नसते. त्यामुळे आपल्या या भावनेचा सच्चेपणाही तपासला पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक वाक्य आहे. त्यात ते सवाल करतात, ‘‘ज्याला कोणी नाही त्याचे करणे ही देवाची सेवाच नाही का?’’(बोधवचने, क्र. ४७०). या वाक्याचा खरा व्यापक अर्थभेद आपण नंतर पाहाणारच आहोत, पण वरकरणी तरी हे वाक्य वाचून हेच जाणवतं की ज्याचं कुणी नाही अशा व्यक्तीच्या हितासाठी काही करणं, अशा व्यक्तीला आधार देणं हीसुद्धा देवाचीच सेवा आहे. यालाच सामान्यत: परोपकार म्हटलं जातं. पण परोपकार इतका सोपा असतो का? खरा परोपकार कोण करतो? श्रीमहाराज शेताची उपमा देऊन सांगतात की एका शेतात पाणी भरपूर साचून राहात असेल, पुरून उरत असेल तर ते बाहेर, इतर शेतात टाकता येते. गरजेपेक्षा पाणी साचून राहिलं तर पिकाचीही हानी होते. त्यामुळे असे पाणी दुसऱ्या शेतात टाकणे हे ते या शेताच्याही हिताचेच होते. पण मुळात या शेतालाच जर पुरेसं पाणी मिळत नसेल तर काय उपयोग? हे रूपक नमूद करीत श्रीमहाराज २७ मेच्या प्रवचनात स्पष्ट सांगतात, ‘‘ज्या महात्म्यांनी स्वतचा उद्धार करून घेऊन, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा खरा अधिकार!’’ अर्थात ज्यानं स्वतचं आत्मकल्याण साधून घेतलं आहे तोच दुसऱ्याचं कल्याण करू शकतो. आता इथे एक भावुक प्रश्नही आपल्या मनात येतो. भले माझं पोट भरलं नसेल आणि माझ्याकडे एकच भाकर असेल आणि एखादा उपाशी माणूस समोर उभा ठाकला तर माझ्यातली अर्धी भाकर त्याला देण्यात चूक काय? अगदी याचप्रमाणे भले मी आत्मकल्याण साधून घेतलं नसेल पण दुसऱ्याचं कल्याण साधून देण्यासाठी प्रयत्न करण्यात गैर काय? श्रीमहाराजांनाही या प्रश्नाची जाणीव आहे. म्हणूनच त्या प्रवचनात ते सांगतात, ‘‘ज्या महात्म्यांनी स्वतचा उद्धार करून घेऊन, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा खरा अधिकार. मग प्रश्न असा येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवूच नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरुर आहे. पण परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम होऊ न देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. पण हे वाटते तितके सोपे नाही..’’ हा परोपकार का सोपा नाही? ते आता पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charity
First published on: 20-05-2013 at 02:36 IST