श्रद्धा कुंभोजकर

इतिहास राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

उतरंडीची रचना, सामान्य माणूस असण्याबद्दलची अवहेलना आणि बुद्धीविषयीचे दृढ समज, श्रमांना बेदखल करणं.. असे अनेक मानवी दोष इतिहासात दिसून येतात. त्यातून निघणारे निष्कर्ष आजच्याही वास्तवात दिसतात. पण त्यांच्यावर आपापल्या परीनं मात करण्यासाठी धडपडणाऱ्यांचाही इतिहास पाहायला हवा..

आटपाट आकाशगंगेमध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. त्यावर समता, बंधुतेची स्वप्नं पाहणारी काही माणसं आहेत. त्याच ग्रहावर इतरही अनेक झाडं, प्राणी, माणसं राहतात. त्यातल्या काहींना विषमता, न्याय, मानवता यांच्याबद्दल कधी कधी बरेच प्रश्न पडतात. पण अनुभवांती कळतं की, सगळ्या सवालांना निरुत्तर करणाऱ्या प्रदेशात आणि संस्कृतींत आपण जगत आहोत.

जगभरातल्या अनुभवांकडे नीट पाहिलं तर लक्षात येतं, की बहुतेक सर्व संस्कृतींचा पाया मजबूत करताना त्यात काही दुर्बल माणसांना चिणून त्यांच्या बळावर विविध व्यवस्थांचे डोलारे उभे केलेले असतात. कधी हे दुर्बल म्हणजे काळे गुलाम असतात, कधी असंघटित श्रमिक, कधी बायका, कधी जातवर्गाच्या उतरंडीत खालचं स्थान दिलं गेलेले समूह. त्यांना पायतळी चिणणं हे अनेक पद्धतींनी अमलात आणलं जात असतं. कधी मालक त्यांचे श्रम चोरतात, कधी नेते त्यांच्या कर्तृत्वाला बेदखल करतात, कधी प्रतिष्ठित लोक त्यांच्या भाषा-संस्कृतीची हेटाळणी करतात, कधी परंपरेच्या नावाखाली नात्यागोत्यांच्या, गावकी-भावकीच्या रेशीमगाठीत त्यांना गुंतवतात, कधी पुरुषसत्ताक, उच्चजातीय हिंसेच्या दहशतीखाली त्यांना जनावराहून वाईट अवस्थेत जगण्याची सवय लावली जाते.. कधी सरळसोपं मारून टाकलं जातं.

पण या सगळ्या माणसांना बहुतेक जगायला आवडत असणार, त्यामुळे ती मिळेल त्या अवकाशात तगून राहण्याची धडपड करत असावीत. या समाजघटकांचं शोषण, त्यांचं दुबळेपण हेच सतत अधोरेखित करत न राहता; निरुत्तर भासणाऱ्या परिस्थितीला त्यांनी कसं तोंड दिलं, कशी वाट शोधली, याचे दस्तावेज जपले जावेत, लोकांसमोर मांडले जावेत असं वाटतं. जर हे जग समजून घेऊन आपलं सर्वाचं जगणं अधिक आनंदाचं करणं हा विज्ञान, मानव्यविद्या आणि एकूणच जगण्याचा अंतिम हेतू असेल, तर माणसांच्या धडपडीचा, कर्तेपणाचा इतिहास लिहिणं अत्यावश्यक ठरतं.

मुक्ता सर्वगोड यांच्या ‘मिटलेली कवाडे’ या आत्मकथनातून दिसणारं हे एक चित्र..

‘आषाढसरावन म्हंजी लई भारी गोरगरिबाला.. जुना दाना सरलेला, नवा पदरात पडायला टाइम आसतो. पावसात मोलमजुरीही मिळत नाही.. आंबाडीची, पाथरीची, तांदुळाची जी मिळेल ती भाजी ओरबाडायची, खळाखळा धुवायची, मिठाचा खडा टाकून उकडून घ्याची.. ते मिसळून भाकरी करायच्या, त्याभी पोटभर मिळत नाहीत खायला.’

दारिद्रय़रेषा, शेतीप्रधान अर्थव्यवस्था, श्रममूल्य, स्थानिक प्रजातींचं ज्ञान, कुपोषण.. असले कोणतेही शब्द न वापरता मुक्ताबाईंनी ग्रामीण स्त्रीच्या जगण्याची चित्तरकथा नोंदवली आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे १५ ऑक्टोबर हा ग्रामीण स्त्रियांच्या सन्मानाचा जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. गावांतल्या साध्या बाईमाणसांचा सन्मान करावा असं संयुक्त राष्ट्रांना का वाटतं? तर त्या धडपडतात, खमकेपणानं आपली मुळं जमिनीत रोवतात म्हणून. जर या बायकांना शेती-व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीनं हक्क, साधनं आणि ज्ञान मिळालं, तर शेतीचं उत्पन्न वाढून जगातल्या भुकेलेल्या लोकांमध्ये १० ते १५ कोटींची घट होईल, असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.

‘ते तसलं ग्रामीण, मागास भागात असेल, पण आपल्या शहरी भागात पुरेशी समानता आहे’ असं कुणी मानत असतील, तर अगदी विकसित देशांमधलं चित्रदेखील पाहता येईल. नोबेलविजेत्या स्त्रियांची संख्या कणाकणानं वाढत असेल, तरीही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र या चार विद्याशाखांमधल्या बायकांचं प्रमाण धक्कादायकरीत्या कमी दिसतं. जसजसं या वैज्ञानिक क्षेत्रांत पुढचं शिक्षण घेत वरच्या पदांवर जातात, तसतसं त्या क्षेत्रातून बायका बाहेर ढकलल्या जातात. ‘लिकी पाइपलाइन (गळक्या पाइपलाइनचा) सिद्धांत’ या नावानं ही विज्ञानाच्या क्षेत्रातली बायकांची घटती संख्या अभ्यासली जाते. याचं कारण ‘बायकांना विज्ञान कळत नाही किंवा त्या अभ्यास करत नाहीत’ हे नसून, त्यांच्याबद्दलचे सामाजिक पूर्वग्रह त्यांना या क्षेत्रांच्या परिघाबाहेर ढकलतात हे आहे. ‘शतपथ ब्राह्मणा’त याज्ञवल्क्य ऋषींच्या दोन पत्नींची ओळख करून देतानाच सांगितलं आहे, ‘मैत्रेयी ब्रह्मवादिनी बभूव, स्त्रीप्रज्ञैव तर्हि कात्यायन्यथ ’- मैत्रेयी नावाची पत्नी ही वादपारंगत होती आणि कात्यायनी ही ‘केवळ बायकांसारखी बुद्धी’ असणारी होती. एकीकडे असामान्य असण्याचं कौतुक करतानाच सामान्य माणूस असण्याबद्दलची अवहेलना अभिजात, सुसंस्कृत परंपरेतही अनेक शतकांपासून चालू आहे.

खरं तर हजारो वर्षांपासून माणसाच्या संस्कृतीचा डोलारा उभा करताना मुलाबाळांना जन्म देणाऱ्या आणि संगोपन करण्याचं काम करणाऱ्या काही बायकांना काही काळ सलग घरी राहावं लागे. पण पळत्या जनावराची शिकार मिळाली नाही किंवा कमी पडली, तर अन्नाची खात्री असावी लागते. शिवाय माणसाच्या वाढत्या आकाराच्या मेंदूसाठी अत्यावश्यक पोषकद्रव्यं असणारं अन्न हुडकणं गरजेचं असतं. तसंच शेती, पशुपालन आणि त्यातून मिळणाऱ्या अन्नाची टिकवणूक व्हावी यासाठीची अनेक तंत्रं विकसित करावी लागतात. या सर्व कामांमध्ये बायकांनी पुरुषांच्या बरोबरीनं मोलाची भूमिका बजावली, असं मानवशास्त्रज्ञांचं अभ्यासांती मत झालं आहे. पण श्रमविभागणीच्या नावाखाली घराबाहेरचं जग पुरुषांचं आणि उंबऱ्याच्या आत बायकांचं अशी लिंगभेद करणारी छद्मवैज्ञानिक मांडणी लोकप्रिय झालेली दिसते. यातून संस्कृतीच्या उभारणीतलं स्त्रीपुरुषांचं बरोबरीचं योगदान बेदखल केलं जातं. वर्चस्वावर, शोषणावर आधारलेली उतरंड हीच नैसर्गिक असल्याचं भासवलं जातं.

उतरंडीची रचना ही अर्थातच त्यातल्या सर्वात वरच्या थरातल्या घटकांना अतिशय सोयीस्कर असते. मग ती स्थानभेदावर, लिंगभेदावर, वर्ण-जाती-धर्म किंवा वर्गभेदावर आधारलेली असो. जितकं स्थान खालचं, तितका दबाव अधिक सहन करावा लागतो. म्हणजे आपण नुसतेच कृष्णवर्णीय असण्यापेक्षा गरीब, कृष्णवर्णीय आणि आफ्रिकन खेडूत असलो, तर आपल्यावर तितका जास्त दबाव पडणार. नुसतेच गरीब असण्यापेक्षा गरीब, दलित आणि ग्रामीण बाई असलो, तर आपल्यावर रातोरात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता बरीच जास्त असते. श्रीमंत, उच्चजातीय, शहरी बाई असलो, तर आपल्याला वाय दर्जाची सुरक्षादेखील मिळू शकते. एकलव्यानं अशा उतरंडीला बाजूला सारत धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवलं. त्याच्याकडून गुरुदक्षिणेच्या नावाखाली उजवा अंगठा तोडून घेणाऱ्या द्रोणाचार्याना त्या तुटक्या अंगठय़ाचं अप्रूप नव्हतं, पण त्यांना या निषादपुत्रानं धनुर्विद्येत अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होणं हे सहन होत नव्हतं. याचप्रमाणे उतरंडीतील तळाकडच्या माणसांवर होणारे अत्याचार हे त्यांना त्यांची जागा दाखवून देऊन तिथेच राहण्याचे इशारे असतात.

अशा वेळी उच्च कोण, नीच कोण हे ठरवणारी जात, वर्ग, वंश, लिंगभावाची बंधनं तोडणाऱ्यांचं कर्तृत्व समाजापुढं सन्मानानं मांडणं ही उतरंडीच्या रचनेला आव्हान देणारी कृती ठरते. ‘दीनबंधु’ या वर्तमानपत्रात सव्वाशे वर्षांपूर्वी नोंदवल्यानुसार, २५ मार्च १८९४ रोजी मुंबईत ‘जेकब मिलमधील सुमारे ४०० मजूर बायकांनी कामाच्या मानाप्रमाणे त्यांस पैसा मिळत नाही म्हणून त्या दाद मिळवण्यास काम सोडून उभ्या राहिल्या होत्या.’ याच्याच आधी चार महिने गोदावरी पंडित यांनी ‘पाकदर्पण’ हे आपलं स्वयंपाकविषयक पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्या प्रस्तावनेत त्या सांगतात, ‘पण लोकापवादामुळे मी आपलें शिक्षण झांकून ठेवण्याचा यत्न करीत असे. स्नान केल्यावर नेमाधर्माची पोथी वाचणे झाल्यासही मी ती चोरून व हळूं वाचीत असे. कारण शेजारीपाजारी नावें ठेवतील हें भय!.. अशा रीतीनें मी भीतभीत ग्रंथकर्ती या नांवानें आतां प्रसिद्ध झालें आहे.’ जिथे स्वयंपाकाचं पुस्तक लिहिणाऱ्या स्त्रीला भीतभीत वाचन-लेखन करावं लागत होतं, त्याच समाजात कामगार म्हणून आपल्या हक्काच्या वेतनासाठी भांडणाऱ्या, अटक सोसणाऱ्या मजूर स्त्रियांचं कर्तृत्व समाजापुढं आणणं ही अभ्यासकांची आणि वाचकांचीही जबाबदारी ठरते. तसं केलं तर ही आपणच शोधून जगाला सांगण्याच्या उत्तरांची कहाणी संपूर्ण होऊ शकेल.

‘‘..नाती न मानण्याचा

आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये

..चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे

..एक तीळ सर्वानी करंडून खावा

माण्सावरच सूक्त रचावे

माण्साचेच गाणे गावे माण्साने..’’

– नामदेव ढसाळ (‘गोलपिठा’मधील एका कवितेतील काही ओळी)

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com