सात दशकांपूर्वी भारतातून पूर्णपणे नामशेष झालेला चित्ता भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. अवघ्या महिनाभरात तो भारताच्या भूमीवर पाऊल ठेवेल, पण तो येथे स्थिरावेल का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप कोणीही देऊ शकलेले नाही. चित्त्याचा अधिवास असणाऱ्या गवताळ कुरणांची कमतरता, मानव-वन्यप्राणी संघर्ष, चित्त्याच्या खाद्याची अनुपलब्धता अशा अनेक स्तरांवर लढा द्यावा लागणार आहे.

भारतात चित्ता परत आणण्याची कल्पना २००९ साली मांडण्यात आली. नवीन आणि पूर्णपणे वेगळ्या अधिवासात प्राणी स्थिर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तो कुठून आणायचा, कुठे ठेवायचा यावर विचार करण्यात आला, पण भारताचे हे स्वप्न त्यावेळी प्रत्यक्षात उतरू शकले नाही. त्यानंतर तब्बल दशकभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये पुन्हा एकदा चित्ता भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

यापूर्वी अशा प्रकारे अन्य देशांतून चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्याचा प्रयोग आफ्रिका खंडात झाला होता. पूर्व आफ्रिकेतील मलावी या देशात १९८०च्या उत्तरार्धात चित्ता नामशेष झाला होता. तेथे २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून चार चित्ते आणण्यात आले. आता तिथे २४ चित्ते आहेत. त्या प्रयोगातून प्रेरणा घेऊन आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्यावर शिक्कामोर्तब झाले.

भारतात चित्त्यांच्या संवर्धनासाठी अनेक ठिकाणे निवडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मध्य प्रदेशातील मिश्र जंगल आणि गवताळ प्रदेश असलेल्या ७३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्ते आणण्यात येतील. याशिवाय मध्य प्रदेशातीलच नौरादेही वन्यजीव अभयारण्य तसेच राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील शाहगंज येथेही चित्ते आणण्यात येणार आहेत. सुरक्षित अधिवासात प्रजननातून त्यांची संख्या वाढवणे आणि त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

दक्षिण आफ्रिका, नामिबिया तसेच इतर आफ्रिकन देशांतून पाच वर्षांसाठी चित्ते आयात केले जाणार आहेत. या कालावधीत ते जगू शकले नाहीत किंवा प्रजननातून त्यांची संख्या वाढू शकली नाही तर पर्यायी कृती कार्यक्रमाची रचना करण्यात येईल किंवा संपूर्ण कार्यक्रमाचे पुनरावलोकन करून कार्यक्रम बंद करण्यात येईल, असे चित्ताविषयक कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रत्येक चित्त्याला जीपीएसबंधीत ‘हाय फ्रिक्वेंसी रेडिओ कॉलर’ लावण्यात येणार आहे.

आठ हजार ४०५ किलोमीटरचा प्रवास करून व्यावसायिक किंवा खासगी विमानातून हे चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. १९७०च्या सुमारास इराणमधून आशियाई चित्ता भारतात आणण्याचा प्रयत्न झाला, पण अस्थिर वातावरणामुळे तो प्रयोग फसला. त्यानंतर २००० साली हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युरल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ने इराणमधील आशियाई चित्त्यांचे क्लोन करण्याचा प्रस्ताव मांडला, पण तो ही फसला. त्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेवरून २००९ साली डेहरादून येथील ‘भारतीय वन्यजीव संस्था’ व ‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ यांनी चित्ता अफ्रिकेतून भारतात आणण्यासाठी प्रस्ताव तयार केला. त्यावेळी या निर्णयाला विरोध झाला आणि २०१२ मध्ये हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला भारतात चित्ता आणण्याची परवानगी दिली. आता सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण तरीही संवर्धनाबाबत शंकेला वाव आहे.

ज्यांचा अधिवास ‘गवताळ कुरणे’ हाच असतो, असे अनेक वन्यप्राणी आणि पक्षी भारतातून नाहीसे झाले आहेत. त्यांच्या संवर्धन वा पुनर्वसनाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा स्थितीत चित्त्याच्या पुनर्वसनाबाबत एकीकडे आनंद व्यक्त होत असताना त्याच्या स्थिरावण्याबाबत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. विकास प्रकल्पांमुळे भारतातील गवताळ कुरणे नाहीशी झाली आहेत. त्यामुळे चित्त्याच्या पुनर्वसनावर प्रश्नचिन्ह आहेत. भारतात यापूर्वी जिथे चित्ते होते, त्याच परिसरात त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुघल तसेच ब्रिटिश काळात मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे भारतातून चित्ते नामशेष झाले. मुगल बादशाह काळविटाच्या शिकारीकरिता चित्ते पाळत. १९००पासून भारतात चित्त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. १९४८मध्ये महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी भारतातील तीन शेवटच्या आशियाई चित्त्यांची शिकार केली. या पार्श्वभूमीवर परदेशांतून आणले जाणारे चित्ते भारतात तग धरतील का, त्यांची प्रजा वाढेल का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

rakhi.chavhan@expressindia.com