डॉ. जयदेव पंचवाघ

मेंदूतील पोकळीत हवा खेळवायची, त्याचवेळी कवटीचा एक्स रे काढायचा आणि मेंदूच्या आजारांचा अंदाज घ्यायचा हे सुचणंच भन्नाट..

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला

मागच्या काही लेखांचा संदर्भ घेऊन महाराष्ट्रातल्या विविध भागांतल्या लोकांनी काही प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न असा होता की सीटी स्कॅन व एमआरआयसारख्या तपासण्या जर १९८० च्या दशकापासून उपलब्ध झाल्या तर त्याआधी मेंदूतील गाठींचं निदान नेमकं कसं केलं जायचं ?

प्रश्न सयुक्तिक आहे आणि त्याचं मर्यादित उत्तर मी पूर्वीच्या एका लेखात दिलं आहे. ते म्हणजे मज्जासंस्थेच्या कार्याचं उत्कृष्ट ज्ञान असणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाच्या लक्षणांवरून व शारीरिक तपासणीवरून काढलेला निष्कर्ष. परंतु हे खरंच आहे की शरीर न उघडताच आत डोकावून बघण्यासारख्या तपासण्या त्यावेळी नव्हत्या. याला अपवाद फक्त एक्स-रेचा. तोसुद्धा अगदी थोडाच, कारण या तपासणीत हाडं जरी व्यवस्थित दिसत असली तरी इतर अवयव अगदी मर्यादित प्रमाणातच दिसतात. उदाहरणार्थ, कवटीच्या एक्स-रेमध्ये कवटीची हाडे व्यवस्थित दिसतात, पण मेंदूचा कुठलाच भाग दिसत नाही त्याचप्रमाणे मणक्याच्या एक्स-रेमध्ये मणक्याची हाड व्यवस्थित दिसतात, परंतु मज्जारज्जू नसा रक्तवाहिन्या वगैरे महत्त्वाचे भाग अजिबात दिसत नाहीत.

 एक्स-रेचा शोध १८९५ साली लागला. विल्यम रोंटजेन हे तो शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव. १८९६ साली त्याने त्याच्या बायकोच्या हाताचा एक्स- रे जर्मन वैद्यकीय परिषदेकडे पाठवला. ‘अंगठी घातलेल्या स्त्रीचा हात’ म्हणून तो जगप्रसिद्ध आहे. कारण शरीराच्या आतले अवयव मर्यादित प्रमाणात (फक्त बोटांची हाडं) का असेना पण स्पष्टपणे दाखवणारी ही जगातील पहिलीच तपासणी. नवऱ्याने ‘प्रेमाने’ काढलेला पण थोडासा भुताटकीसारखा वाटणारा तो फोटो आणि त्यात दिसणारी हाडं बघून श्रीमती रोंटजेनचे.. ‘मी या फोटोत माझा मृत्यू पाहिला’..असे आश्चर्य आणि विनोदयुक्त संमिश्रित उद्गार वैद्यकीय इतिहासात प्रसिद्ध आहेत.

कवटीच्या एक्स- रेमध्ये मेंदूचा कुठलाच भाग दिसू शकत नसला तरी अपवाद म्हणजे कॅल्शियम साचलेले भाग आणि हवा (एअर) असलेले भाग. एक्स-रेमध्ये कॅल्शियम हाडाप्रमाणेच पांढरं आणि हवा अगदी काळीकुट्ट दिसते. पायनियल ग्रंथीमध्ये वाढत्या वयाबरोबर कॅल्शियम जमा होतं त्यामुळे ती कवटीच्या काही एक्स- रेमध्ये दिसू शकते. त्या काळी मेंदूच्या गाठींमुळे किंवा इतर आजारामुळे जर कवटीच्या हाडांच्या रचनेत बदल झाले तरच निदानासाठी एक्स- रेचा उपयोग व्हायचा. पिटय़ुटरी ग्रंथीच्या गाठींमध्ये मेंदूच्या तळापाशी असलेली व या ग्रंथीचं घर असलेली हाडाची पोकळी ( सेला टर्सिका ) हळूहळू फुगत जाते. तिचा आकार बदलून रुंद होतो. परंतु या गोष्टींचा अगदीच मर्यादित उपयोग निदानासाठी होत असे. यात पहिला बदल वॉल्टर डँडी याच्या अत्यंत महत्त्वाच्या शोधामुळे झाला. डॉ. हार्वे कुशिंग यांच्याबरोबरीने न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात ज्यांचं नाव घेतलं जातं ते हेच डॉ. वॉल्टर डँडी.

प्राण्यांच्या मेंदूमध्ये पोकळय़ांची ( कॅव्हिटी) एक शृंखला असते. त्यात पाण्यासारखं दिसणारं द्रावण भरलेलं असतं. साधारणपणे जसं पाण्यामध्ये साखर व मीठ टाकून मिश्रण केलं तर ते साध्या पाण्यासारखंच दिसतं तसंच हेसुद्धा असतं. सोईसाठी आपण त्याला मेंदूचं ‘पाणी’च म्हणू. मेंदूतल्या या पोकळय़ांमध्ये (व्हेंट्रिकल) रक्तापासून हे पाणी तयार होतं. गुलाबी रंगाच्या हजारो सूक्ष्म फुलांपासून तयार झालेल्या गुच्छासारख्या दिसणाऱ्या ‘कोरॉईड प्लेक्सस’ या भागातून, रक्तापासून हे पाणी तयार होऊन मेंदू व मज्जारज्जूभोवती फिरतं.  म्हणूनच या पाण्याला सेरेब्रो-स्पायनल फ्लुईड (सीएसएफ) म्हणतात. तयार झाल्यानंतर प्रथम ते एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत वाहत जातं व त्यातून बाहेर पडून मेंदू व मज्जारज्जूभोवती फिरतं. सरतेशेवटी ते परत रक्तप्रवाहात शोषलं जातं.

मेंदूतील हे पाणी तयार होण्याचा वेग प्रौढ व्यक्तीत दिवसाला अर्धा लिटर इतका असतो. कवटीचा आकार बघितला तर या पाण्याचं एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत वाहत जाणं आणि नंतरचं अभिसरण यात व्यत्यय आला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल हे उघड आहे. मेंदूतील पोकळय़ांमध्ये हे पाणी साचून राहील आणि त्या पोकळय़ा आकारने फुगत जातील. बंदिस्त कवटीच्या आतला दाब वाढत जाईल. मेंदूच्या महत्त्वाच्या केंद्रांवर दाब येऊन प्रथम ग्लानी व नंतर बेशुद्ध होण्याकडे वाटचाल होईल.

या ‘मेंदूतील पाण्याच्या पोकळय़ा फुगण्या’च्या आजाराला ‘हायड्रोसिफॅलस’ (मेंदूत पाणी साचणे) असं नाव आहे. मराठीत त्याला आपण ‘जलशीर्ष’ म्हणू. जलशीर्षांचे काही प्रकार असतात. उदाहरणार्थ पोकळय़ांमधून पाणी वाहताना त्यात अडथळा आल्यामुळे पाणी तुंबून राहणे. हा अडथळा मेंदूची गाठ, रक्ताची गुठळी, जतुसंसर्ग अशा विविध कारणांमुळे येऊ शकतो. काही कारणाने हे पाणी परत रक्तात शोषण्याची प्रक्रिया अकार्यक्षम झाल्यानेसुद्धा जलशीर्ष होऊ शकते.  जलशीर्षांचे प्रकार, त्याची लक्षणं आणि उपचार हा स्वतंत्र आणि शास्त्रीयदृष्टय़ा अतिशय रोमांचक विषय आहे. पुढच्या लेखामध्ये त्याविषयी विस्ताराने लिहिण्याचा विचार आहे.

इथे जलशीर्षांची ओळख करून देण्याचं कारण म्हणजे वॉल्टर डँडीच्या ज्या शोधाविषयी मी लिहिणार आहे त्यात या आजाराचा महत्त्वाचा भाग आहे. १९१० आणि १९२० च्या दशकात या आजारावर वॉल्टर डँडीने महत्त्वाचं संशोधन केलं.

या काळात म्हणजे साधारण १९१८ मध्ये एक शोधनिबंध वॉल्टर डँडीच्या वाचण्यात आला डोक्याला मार लागलेल्या व्यक्तीचा एक्स-रेचा अभ्यास त्या शोधनिबंधात होता. उंचावरून पडून डोक्याला मार लागलेल्या या व्यक्तीच्या कवटीला खोक पडली होती. त्यामधून बाहेरील हवा आत गेली होती आणि मेंदूतल्या पोकळय़ा म्हणजेच व्हेंट्रिकल्समध्ये पसरली होती. या आत गेलेल्या हवेमुळे त्या पोकळय़ांचा आकार एक्स-रेवर स्पष्ट दिसत होता, कारण हवा एक्स-रेमध्ये अगदी काळीकुट्ट दिसते. हा एक्स-रे बघता बघता डॉक्टर डँडीच्या मनात विचार आला की अपघाताने मेंदूच्या पोकळय़ांमध्ये हवा जाऊन त्या पोकळय़ांची रचना एक्स-रेवर दिसू शकते तर मग निदान करण्यासाठी मुद्दाम ठरवून थोडी हवा सििरजने या पोकळय़ांमध्ये घालता येईल. गोलाकार कवटीच्या मधल्या भागात या हवेच्या रूपात एक संदर्भ बिंदू (रेफरन्स पॉइंट) तयार होईल आणि त्यामुळे त्याच्या अवतीभवती होणाऱ्या गाठी कुठे आहेत याचा अंदाज बांधणे सोपे पडेल. कुठल्याही शास्त्रीय शोधामध्ये वस्तुस्थितीवर आधारित कल्पकता कशी महत्त्वाची असते याचा हा एक नमुना! वॉल्टर डँडीने या विचाराने प्रेरित होऊन कुत्र्यांच्या मेंदूवर हे प्रयोग केले. त्यात त्याने कवटीला छोटं छिद्र पाडून मेंदूच्या पोकळीमधून काही पाणी काढून घेतलं आणि तेवढीच हवा आत ढकलली. त्यानंतर कुत्र्याच्या कवटीचे वेगवेगळय़ा कोनातून एक्स-रे काढले. या फोटोंमध्ये अपेक्षेप्रमाणेच मेंदूची पोकळय़ांची रचना ( व्हेंट्रिकल्स) स्पष्टपणे दिसली. ही तपासणी न्यूमो-एनसिफॅलोग्राफी (म्हणजेच शब्दश: ‘वायु-मस्तिष्क -चित्रांकन’) तपासणी म्हणून प्रसिद्ध झाली. ‘डोक्यात हवा जाणे’ या वाक्यप्रचाराची ही शब्दश: आवृत्ती. या तपासणीमधला अनुभव जसा वाढत गेला तसं वॉल्टर डँडीने डोक्याला छिद्र पाडून हवा आत ढकलण्याऐवजी कमरेच्या मणक्यामधून हवा आत ढकलण्याची पद्धत सुरू केली.

आपल्याला माहीतच आहे की, हवा कुठल्याही पोकळीत घातली तरी ती हळूहळू वरच्या दिशेने प्रवास करून स्थिरावते. त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागात हवा जाण्यासाठी कधीकधी व्यक्तीला ‘खाली डोकं वर पाय’ अशा स्थितीत ठेवावं लागायचं. कधी डोक्याचा उजवा भाग वर तर कधी डावा भाग वर करून एक्स-रे करावे लागायचे. हे सोपं जावं म्हणून व्यक्तीला तपासणीच्या टेबलाला बांधून ते टेबल वेगवेगळय़ा कोनांतून फिरवण्याची व्यवस्था असलेलं उपकरण डॉक्टर डँडीनं बनवलं. याला नंतर समर-सॉल्ट चेअर असं म्हटलं जायचं. अशा रीतीने मेंदूच्या आजारांसाठीच्या एका नवीन तपासणीचा जन्म झाला होता.

कवटी ही बंदिस्त जागा असल्यामुळे मेंदूच्या गाठींचा आतल्या भागांवर परिणाम असा होतो की मेंदूची केंद्रं गाठीपासून दूर ढकलली जातात. ज्या पद्धतीने मेंदूतील पोकळय़ात घातलेली हवा मेंदूच्या गाठीमुळे विस्थापित होईल त्यावरून एखाद्या भागात गाठ असण्याचं निश्चित अनुमान बांधता येऊ लागलं. हा शोध अतिशय महत्त्वाचा यासाठी होता की हवेसारखी गोष्ट मेंदूतील पोकळय़ात घालून तिच्या विस्थापित होण्याच्या ‘पॅटर्न’प्रमाणे आतील आजारांचे निदान होऊ शकेल हा नुसता विचारच कल्पकतेचा भन्नाट नमुना होता.

दुसरी गोष्ट अशी की, ही तपासणी करणं तुलनेनं सोपं होतं. १८९६ मध्ये एक्स-रेचा शोध लागल्यापासून ते साधारण ५० वर्षांनंतर अ‍ॅन्जिओग्राफीचा शोध लागण्याच्या मधल्या काळात या तपासणीच्या आधारे अनेक निदानं होऊ शकली.

हा शोध ज्यांच्या कल्पकतेने लागला त्या डॉक्टर वॉल्टर डॅंडींचं मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेतील योगदानसुद्धा असामान्य होतं. जलशीर्ष या विषयावरचा त्यांचा अभ्यास गाढा होता व संशोधन अमूल्य होतं. त्याबद्दल पुढच्या आठवडय़ात..

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com