डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

आँद्रे लझारिएने ‘घोडय़ाच्या शेपटी’सारखी नस-समूहाची रचना तपशिलात विशद केल्यामुळे आजाराच्या अभ्यासालाही दिशा मिळाली..

‘‘डॉक्टर, कंबरेच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे लैंगिक कार्य व कामजीवनावर परिणाम होऊ शकतो का?’’..  हा प्रश्न गेल्या वीस वर्षांत स्पाइन सर्जरीसाठी आलेल्या अनेकांनी मला अनेकदा विचारला आहे. या विषयाबद्दल अनेक गैरसमज, आख्यायिका आणि वदंता आहेत. अगदी आजच आणखी एका रुग्णाने हा प्रश्न मला विचारल्यामुळे या विषयावर सविस्तर लेख लिहावा असं मला वाटलं. त्याचप्रमाणे मणक्याच्या कंबरेच्या भागातील कॅनॉलमध्ये जो नसांचा पुंजका एकवटलेला असतो आणि जो कॉडा-इक्वायना (घोडय़ाची शेपटी) या नावाने ओळखला जातो त्याविषयी लिहिण्याचासुद्धा विचार होता. योगायोगाने हे दोन्ही विषय एकमेकांच्या अगदी जवळचे आहेत.

मानवी लैंगिक कार्यात शरीरातील इतर अवयवांबरोबरच मज्जासंस्थेच्या जवळपास सर्व भागांचा सहभाग लागतो. मानवी भावना आणि स्पर्श, रस, गंध, दृश्य, ध्वनी या पंचेंद्रियांद्वारे मेंदूपर्यंत पोहोचणारी माहिती ही तर यात महत्त्वाची आहेच, पण प्रत्यक्ष लैंगिक कार्य घडून येण्यासाठी लैंगिक अवयवांतील संवेदना आणि तिथल्या रक्तवाहिन्यांना पुरवठा करणाऱ्या नसांचं करय व्यवस्थित असणं हेही अनिवार्य असतं. हे कार्य करणाऱ्या नसा मणक्याच्या खालच्या म्हणजेच कंबरेच्या भागात एकवटलेल्या असतात.

कदाचित म्हणूनच याविषयीचे अनेक समज-गैरसमज पसरलेले असावेत.

मणक्याची शस्त्रक्रिया केल्यामुळे लैंगिक कार्यावर परिणाम होण्याची शक्यता खूप म्हणजे खूपच दुर्मीळ आहे. खरी गोष्ट अशी की, काही विशिष्ट आजारांमध्ये योग्य वेळेत केलेली मणक्याची शस्त्रक्रिया लैंगिक अकार्यक्षमता टाळू शकते किंवा बरे करू शकते. दुर्दैवाने हे आजार झालेल्या व्यक्तींना आपली लैंगिक अकार्यक्षमता किंवा समस्या ही कंबरेच्या मणक्यातील नसांवरच्या दाबामुळे आहे हेच माहीत नसते. म्हणूनच हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मणक्याच्या काही आजारांमुळे लैंगिक कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

कंबरेच्या मणक्यामधील नससमूहावर गंभीर दाब येण्याच्या आजाराची आज आपण चर्चा करणार आहोत. या आजारावरच्या एका शोधनिबंधामध्ये दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे, या आजारात इतर लक्षणांबरोबर लैंगिक कार्य गडबडण्याचं प्रमाण पन्नास ते साठ टक्के असतं, पण हे लक्षण एक तर रुग्ण स्पष्टपणे सांगत नाहीत किंवा डॉक्टरांकडून तसा स्पष्ट प्रश्न विचारला जात नाही.

मागच्या लेखात इसवी सन पंधराशेच्या आधीची दीड हजार वर्ष धर्मसत्तांच्या निर्बंधांमुळे शवविच्छेदन व शास्त्रीय विचारांना कशी मारक ठरली, हे मी नमूद केलं. शवविच्छेदनं परत जशी सुरू झाली आणि शास्त्रज्ञ मानवी अवयवांचा परत अभ्यास करू लागले त्या काळात म्हणजे सन १६०५ मध्ये आँद्रे लझारिए या शास्त्रज्ञाने मणक्याच्या विविध भागांचं विच्छेदन (डिसेक्शन) करून व तिथल्या रचनेची तपासणी करून ती माहिती ‘अ‍ॅनॅटॉमिका’ या प्रसिद्ध ग्रंथात नमूद करून ठेवली.

पाठीच्या कण्याच्या खालच्या म्हणजे कंबरेच्या भागात पाच मणके असतात आणि या मणक्यांच्या कॅनॉलमध्ये मज्जारज्जू नसतो हे त्याच्या लक्षात आलं. प्रौढ व्यक्तींमध्ये मज्जारज्जू कंबरेच्या मणक्याच्या वरच्या भागातच संपतो. (साधारण कंबरेच्या पहिल्या मणक्याच्या भागात). त्या खालच्या कॅनॉलमध्ये मजारज्जू नसला, तरी त्यापासून निघणाऱ्या नसा खचाखच भरलेल्या असतात.  दोनही नितंबांकडे, जननेंद्रियांकडे, मांडय़ा, पोटऱ्या, पावलं यांकडे जाणाऱ्या नसा इथल्या कॅनॉलमध्ये दाटीवाटीने भरलेल्या असतात.

या भागाची संरचना अभ्यासताना तो लिहितो – ‘ज्याप्रमाणे घोडय़ाची शेपटी त्याच्या पाठीच्या मागच्या टोकापासून सुरू होऊन अनेक जाडसर केसांमध्ये विभागते, त्याप्रमाणेच मज्जारज्जू संपून त्यापासून जाड नसांचा पुंजका बाहेर आलेला दिसतो. विच्छेदनात कंबरेच्या मणक्याचा कॅनॉल उघडल्यावर ही रचना अगदी तंतोतंत ‘घोडय़ाच्या शेपटी’सारखी दिसते..’ म्हणून त्याने या नसांच्या पुंजक्याला ‘कॉडा इक्वायना’.. म्हणजेच ‘घोडय़ाची शेपटी’ असं नाव दिलं. कॉडा म्हणजे शेपटी आणि इक्वायना म्हणजे घोडय़ाची. हे नाव १६०५ साली दिलं गेलं असलं तरी आजही न्यूरोसर्जरीमध्ये जसंच्या तसं प्रचलित आहे.

या ‘मणक्यातल्या घोडय़ाच्या शेपटीला’ जर काही गंभीर आजार झाला किंवा त्यावर तीव्र दाब आला तर दिसणाऱ्या लक्षणांच्या गटसमूहाला ‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’ असं नाव आहे. ही लक्षणं झपाटय़ाने (काही तासांच्या कालावधीत!) सुरू होऊन वाढू शकतात किंवा काही दिवसांमध्ये हळूहळू वाढत जाऊ शकतात.

यामध्ये, उभं राहिल्यावर, चालल्यावर किंवा अगदी बसल्या जागीसुद्धा दोनही नितंब, मांडय़ा व पाय जड पडणे, बधिर होणे, त्यातील जीव गेल्यासारखा वाटणे हे प्रमुख लक्षण असतं. (कॉडा इक्वायनामध्ये मांडय़ा, घोटे आणि पावलं यांना शक्ती आणि संवेदना पुरणाऱ्या नसा असतात.)  कंबरेपासून दोनही बाजूला मांडय़ांचा मागचा भाग, पोटऱ्यांमध्ये कळा येणं हे दुसरं लक्षण. लघवी करण्यासाठी खूप जोर द्यावा लागणं, लघवी तुंबून ओटीपोट फुगणं व थोडी थोडी थेंबथेंब लघवी होणं हे या समूहातील तिसरं लक्षण. संडास आल्याची भावना न होणं, नियंत्रण न राहणं हे चौथं लक्षण. जननेंद्रियांमधील आणि  गुदद्वाराभोवतालची जागा बधिर होणे, त्या भागात मुंग्या आल्याची भावना होणे, तिथल्या संवेदना नाहीशा होणे हे पाचवं लक्षण. आणि सहावं लक्षण म्हणजे कामजीवनासाठी लागणारी लैंगिक करय व्यवस्थित न होणं. जननेंद्रियांमधील संवेदना नाहीशा होऊन ती बधिर होण्याचा यात सहभाग असतो तसंच लैंगिक उद्दीपनानंतर जननेंद्रियात होणारे बदल घडून येण्यासाठी लागणाऱ्या नसासुद्धा बधिर झाल्यानं ते कार्यसुद्धा थंड होतं.

ही सहाही लक्षणं या आजारात प्रत्येक वेळी असतील असं नाही.. पण यांपैकी तीन किंवा चार लक्षणं असली तरी हे निदान करता येतं. ज्या वेळेला कॉडा इक्वायना सिंड्रोमची लक्षणं दिसू लागतात तेव्हापासून पुढच्या काही काळातच जर त्यावर उपचार झाले तर ही करय परत पूर्वस्थितीला येण्याची शक्यता असते.

कॉडा इक्वायना सिंड्रोम होण्याचं अगदी नेहमी दिसणारं कारण म्हणजे कंबरेच्या दोन मणक्यांमधील डिस्क घसरणे. (स्लिप्ड डिस्क, प्रोलॅप्स्ड इंटर व्हर्टिब्रल डिस्क- ‘पीआयडी’). डिस्क घसरल्यामुळे सर्वसाधारणपणे कंबरदुखी किंवा साएटिकासारखे त्रास होतात. पण काही वेळा डिस्कचा मोठा भाग घसरला आणि तीव्र दाब आला तर गंभीर परिस्थिती म्हणजे कॉडा इक्वायना सिंड्रोम उद्भवू शकते.

या आजाराचं दुसरं कारण म्हणजे ही ‘घोडय़ाची शेपटी’- अर्थात कॉडा इक्वायनातील नसांचा पुंजका ज्या कॅनालमध्ये असतो, त्याचा आकार जन्मत:च लहान असणे. (जन्मत:चा ‘कॅनाल स्टेनोसिस’). जसं वय वाढेल तसा स्पाँडिलोसिसच्या थोडय़ासुद्धा प्रक्रियेने या नसांवर दाब येतो. अशा केसेसमध्ये याची लक्षणं तुलनेने हळूहळू वाढतात. या भागात मणक्याला फ्रॅक्चर होऊन त्याचा तुकडा आत घुसल्यामुळेसुद्धा हा लक्षण समूह दिसू शकतो, तसंच मणक्याच्या या भागात होणाऱ्या गाठी किंवा जंतुसंसर्ग ही कमी वेळा दिसणारी कारणं.

कॉडा इक्वायना सिंड्रोममध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उपचार तातडीने करावे लागतात.

तसंही ज्या मणक्याच्या आजारांमध्ये लवकर शस्त्रक्रियेची गरज असते त्याचे रुग्णसुद्धा विविध उपचारांमागे बहुमूल्य वेळ वाया घालवताना दिसतात. इथे मात्र अशी स्थिती असते की तातडीने व योग्य प्रकारे शस्त्रक्रिया झाली नाही तर दाबल्या गेलेल्या नसांची करय कायमचीच नष्ट होऊ शकतात. त्यामुळे गावात अक्षरश: गवताप्रमाणे फोफावलेल्या आणि नावाआधी ‘शस्त्रक्रियेशिवाय’ अशी उपाधी लावून पुढे ‘अत्याधुनिक’ वाटणारं नाव दिलेल्या केंद्रात वेळ व इतर गोष्टी घालवण्याची मुभा इथे नसते हे नीट समजून घेणं गरजेचं आहे.

झाड वठण्याच्या प्रक्रियेत जसं योग्य वेळेत त्याला पाणी मिळालं तर पुन्हा पालवी फुटू शकते तसं हेही आहे. विशिष्ट वेळ गेल्यावर कितीही पाणी दिलं तरी उपयोग होत नाही. त्यामुळे लक्षणं सुरू झाल्यानंतर ते नसांवरचा दाब काढेपर्यंतचा काळ किती कमी आहे यावर शस्त्रक्रियेचं यश अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत ‘एमआरआय’ तपासणीमुळे या आजाराचं निश्चित कारण आज काही मिनिटांतच समजण्याची आणि त्यावरचे उपाय करण्याची शक्यता निर्माण झाली.

‘टाइम इज मनी’ असं म्हणतात. या आजारात ‘टाइम इज नव्‍‌र्ह’ असं म्हणायला पाहिजे.

कॉडा इक्वायना सिंड्रोम, म्हणजेच मणक्यातील घोडय़ाच्या शेपटीवरील दाब समजून घेणं याच कारणासाठी महत्त्वाचं आहे.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.