साधकाला वृत्तिपालटासाठी उमदीकर महाराज यांनी जी सूत्रं सांगितली त्यातली मनाचं मुंडण करा आणि दंभाचा त्याग करा, ही दोन सूत्रं आपण पाहिली. आता तिसरं सूत्र आहे ते म्हणजे लोकांच्या बऱ्यावाईट बोलण्याचा अर्थात निंदा आणि स्तुतीचा मनावर प्रभाव न पडू देणं. महाराज समर्थाचं वचन उद्धृत करतात, ‘‘लोकांचे बोली लागला। तो सर्वस्वे बुडाला।।’’ म्हणजे लोकांच्या बोलण्यानं जर कुणी हुरळून जाऊ  लागला किंवा खचून जाऊ  लागला, तर त्याचं सर्वस्व म्हणजे त्याची बुद्धी, आंतरिक शक्ती लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण बहुतेक वेळा काहीतरी स्वार्थ साधून घ्यायचा असतो तेव्हा जग तुमची स्तुती करतं. त्याचप्रमाणे जग निंदा करतं तेव्हा ती खरीच असते, असं नव्हे. बरेचदा द्वेष, मत्सर, ईर्षां, असूया यापोटीही जग दुसऱ्याची निंदा करत असतं. जेव्हा एखादा माणूस चुकीचं वागत असला, पण त्याच्याकडून काही स्वार्थ साधण्यासारखा असला तर इतरजण त्याची स्तुतीच करीत असतात. त्या स्तुतीनं तो जर हुरळून गेला तर आपणच आपला आत्मघात करीत आहोत, हे त्याच्या लक्षातही येणार नाही. जर कुणी एखाद्याची मत्सरानं निंदा करीत असेल आणि त्या निंदेनं व्यथित होऊन तो मनानं खचून गेला तरी त्याची वाटचाल संथ होऊन त्याचा आत्मघात झाल्याशिवाय राहात नाही. तेव्हा लोकांच्या निंदा-स्तुतीला महत्त्व न देता, संत काय म्हणतात त्यानुसार आपलं वर्तन आहे का, याची तेवढी तपासणी करीत गेलं पाहिजे. जगाच्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा संतांच्या बोलण्याला महत्त्व दिल्याशिवाय परमार्थ साधायचा नाही. गोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘जग काय म्हणेल, याचा विचार करून वागणं हा प्रपंच आणि भगवंत काय म्हणेल, याचा विचार करून वागणं तो परमार्थ!’’ उमदीकर महाराज यांनी या सूत्राची मांडणी करताना केवळ समर्थ रामदास यांची काही वचनं उद्धृत केली आहेत. ती अशी : ‘जनी संग सोडूनि सुखी राहावे।’ आणि ‘श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ। कनिष्ठ कार्य करी तो कनिष्ठ’ त्याचप्रमाणे, ‘नेम धरावा निकट, बाष्कळपणाचे वटवट, करूंच नये।’ जन या शब्दाचा अर्थ संत असा धरला, तर ‘जनीं संग सोडूनि सुखी राहावे,’ याचा अर्थ अन्य सर्व संग सोडून संतजनापाशी सुखानं राहावं, असा आहे. जनीं म्हणजे संतजन, हा अर्थ ‘मनोयोगा’च्या विवरणातच आपण पाहिला आहे. ‘जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे, जनीं वंद्य ते सर्व भावे करावें,’ याचं विवरण करताना, संतजनांनी जे त्याज्य सांगितलं आहे ते सोडून द्यावं आणि त्यांनी जे स्वीकारायला सांगितलं आहे ते आचरणात आणावं, हा अर्थ आपण पाहिला होता. तेव्हा नुसतं देहानंच नव्हे, तर मनानंही संतसंगात राहिलं पाहिजे. ते साधलं तरच जगाच्या संगात बुडून वाहवत जाणं थांबेल. तरच योग्य काय आणि अयोग्य काय, हिताचं काय आणि अहिताचं काय, स्वीकारार्ह काय आणि नकारार्ह काय, हे उमजू लगेल. त्यानं योग्य तीच कृती होऊ  लागेल आणि आचरण सुयोग्य झाल्यानं सुखच सुख जाणवू लागेल. योग्य काय आणि अयोग्य काय, हे उमजण्यातच गोंधळ असतो. म्हणूनच जे हिताचं नाही तेच हिताचं वाटतं, जे अयोग्य आहे, तेच योग्य वाटतं आणि त्याच्यासाठी धडपडून दु:खच पदरी पडतं. तेव्हा लोकांच्या बोलण्याच्या द्वंद्वात्मक प्रभावातून सुटायचं तर संत संग हाच उपाय आहे. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे, हा संग नुसता देहानं असून उपयोगाचा नाही, तो मनानंही असला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara loksatta philosophy
First published on: 03-05-2018 at 02:36 IST